अभिनंदन ग्रंथ - राजकीय जीवना चलच्चित्रपट -2

मला वाटतें, १९५५ साल असावें. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचें त्या वेळीं दिसत होतें, म्हणून मुंबईशिवाय महाराष्ट्राचा स्वीकार करावा असा एक निराश विचार अनेकांच्या मनांत येत होता. महाराष्ट्र काँग्रेसचा पाठपुरावा करणा-या एका वृत्तपत्राने तर जाहीर रीतीने तसें सुचविलें होतें. अशा वातावरणांत कांही कामासाठी मी कोरा ग्रामोद्योग केंद्रांत गेलों होतों. तेथून परततांना श्री. चव्हाण यांनी मला फोर्टपर्यंत 'लिफ्ट' दिला. त्या एक तासांत मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोललो. मध्येच मुंबईशिवाय महाराष्ट्र स्वीकारावा काय असें मीं त्यांस विचारलें. ते म्हणाले: 'संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची ज्यांना घाई झाली असेल अशांच्याच मनांत ही कल्पना येईल, थोडी वाट पाहिली तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवितां येईल.' यानंतर दुस-या अनेक विषयांवर आमचें बोलणें झालें. पण त्यांची ही वाक्ये माझ्या स्मरणांत चांगलींच राहिली.

दुसरा प्रसंग १९५६ सालचा फलटण प्रकरण त्यावेळी गाजत होतें. श्री. चव्हाण फलटणहून परतल्यावर मी त्यांची मुलाखत घ्यावयास गेलो होतों. त्यावेळी छापून आलेल्या मुलाखतीपेक्षा बरीच अधिक माहिती त्यांनी मला सांगितली. दिल्ली येथे श्री. शंकरराव देव यांच्या काँग्रेस नेत्यांशी वाटाघाटी चालू असतां एकाएकीं त्यांनी विशाल द्विभाषिकाची सूचना केली होती. श्री. चव्हाम म्हणाले, "ही सूचना मला मुळीच मान्य नव्हती, पण आपल्या नेत्याला खाली पहावें लागूं नये म्हणून मी बोललों नाहीं. पण मन स्वस्थ नव्हतें. म्हणून आम्ही पत्ते आणले आणि रमी खेळत बसून रमींत मन रमविलें." जसा मुंबई शिवाय संयुक्त महाराष्ट्र घेणें त्यांना पसंत नव्हतें, तसेंच मोठें द्वैभाषिकाहि त्यांना मान्य नव्हतें. त्या मुलाखतीनंतर माझी तशी खात्री पटली होती. पण यानंतरच्या घडामोडीच अशा वेगाने घडत गेल्या की कांही काळ चव्हाणांना मुंबईशिवायच्या महाराष्ट्रास मान्यता द्यावी लागली व कांही काळ तर त्यांना मोठ्या द्वैभाषिकाचा कारभारहि करावा लागला !

मुंबईशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा विधानसभेंत पुरस्कार झाल्यावर माझ्या कांही पत्रकार मित्रांसह मी श्री. चव्हाणांना त्यांच्या कार्यालयांत भेटलों होतों. मुंबई महाराष्ट्रांत यावी असें आपणासं वाटतें ना, असा प्रश्न विचारल्यावर ते उत्तरले : "अर्थात्. एक महाराष्ट्रीय म्हणून असें मला कसें वाटणार नाही? मुंबईसह वैभवसंपन्न असा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला पाहण्याचें प्रत्येक महाराष्ट्रीयाचें स्वप्नच आहे. पण ज परिस्थितीच अशी आली आहे की मिळतें तें घेतलें पाहिजे."

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा हा कट्टर पुरस्कर्ता मुंबईशिवाय महाराष्ट्राचा स्वीकार करावयास तयार होतो व नंतरच्या काळांत मोठें द्वैभाषिक राबवावयाचा प्रयत्न करतो अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती ?

१९५२ ते ५६ या काळांत श्री. भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र काँग्रेसच्या संघटनेवर दुस-या कांहींची जबरदस्त पकड होती. या मगरमिठींतून महाराष्ट्र काँग्रेसची सुटका झाल्याशिवाय नव्या महाराष्ट्रास उपकारी ठरेल अशी ती संघटना ठरणार नव्हती.  अखिल भारतीय राजकारणांत महाराष्ट्राची सर्वत्र बदनामी झालेली होती. इतर प्रांतांत महाराष्ट्राविषयीं व महाराष्ट्रीयांच्या कर्तबगारीविषयी भयंकर गैरसमज माजले होते. अशावेळी प्रथम संघटनेवर पकड बसवून व नंतर महाराष्ट्राबद्दलचे गैरसमज दूर करूनच महाराष्ट्र मिळविला पाहिजे याची सर्वांत प्रथम जाणीव श्री. चव्हाण यांना झाली व त्यांनी त्या दिशेने कांही पावलें टाकावयास सुरुवात केली. 'महाराष्ट्रापेक्षा मला नेहरु प्रिय' या त्यांच्या गाजलेल्या विधानाचा या संदर्भांत विचार करावयास हवा.

१९५२ ते १९५६ या काळांत त्यांनी शासनावर पकड बसविली त्यांच्या खात्याचें काम नेहमी चोख असे. पुरवठा खातें गैरकारभाराबद्दल अगदी नांवाजलेलें असतां श्री. चव्हाण यांनी त्या खात्याला शिस्त लावली. पत्रकार म्हणून सर्व मंत्र्यांना भेटावयाची मला नेहमी संधि मिळे. या सर्व मंत्र्यांत चव्हाणांचे वैशिष्टय चकटन लक्षांत येत असे. तें म्हणजे त्यांच्या प्रशस्त टेबलावर फायलींचा गठ्ठा कधीहि नसे. याउलट इतर महाराष्ट्रीय नेत्यांचे बाहेर जास्त लक्ष लागल्यामुळे शासनाकडे थोडेंफार दुर्लभ झालें. या काळांत एक कर्तबगार कारभारी म्हणून चव्हाणांनी नांव कमावलें.

याच काळाच्या शेवटच्या कालखंडांत त्यांनी काँग्रेस संघटनेवर पगडा बसवावयाचा प्रयत्न केला, व त्यांत जबरदस्त यश मिळविलें. प्रथम त्यांनी एका गटास हाताशीं धरलें व नंतर आस्ते आस्ते सर्व संघटनेवर पगडा बसविला. म्हणूनच १९५६ च्या मोठ्या द्वैभाषिकाच्या काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षनेता म्हणून निवड केली. त्या वेळीं अनेकांना आता चव्हाण मोठें द्वैभाषिक राबवणार असें वाटलें. हें द्वैभाषिक अडीच वर्षे चालवून महाराष्ट्रांतील जनता द्वैभाषिकाला कधीच तयार होणार नाही हें ओळखून त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींना त्याची स्पष्ट जाणीव दिली. मध्यतंरीच्या काळांत महाराष्ट्राविषयीचे अनेक गैरसमज त्यांनी स्वत:च्या कर्तबगारीने दूर केले होते. महाराष्ट्रीयांच्या कर्तबगारीविषयी एक नवा दबदबा अखिल भारतांत निर्माण झाला होता. अशा वेळीं महाराष्ट्राची मागणी नाकारणे काँग्रेसश्रेष्ठांनाहि अशक्य झालें. अशा सुयोग्य वेळेचीच ते वाट पाहत होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org