अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 8

त्यांच्या कराड येथील घरीं मी अनेकदा गेलों आहे. अगदी साधें व स्वच्छ. ओसरीवर एक सतरंजी अंथरून ठेवलेली व तिच्यावर एक दोन तक्क्ये भिंतीस टेकून ठेवलेले. त्या तक्क्यांकडे पाहून आल्यागेलेल्यांनी आपला मान करून घ्यावा,  व बैठक मारावी. 'या, बसा' हे यजमानाचे गोड शब्द पुरसे वाटतात. चार महिन्यांपूर्वी उत्तर सातारा जिल्ह्यांत एक प्रचारसप्ताह किसन महादेव वीर यांनी आखला होता. कराडलाहि एक निमंत्रितांची सभा त्या सप्ताहाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून ठरविली होती. तेव्हा आम्ही बरेच लोक, त्यांत फलटणचे राजेसाहेबहि होतेच चव्हाणांच्या घरी दुपारी भेजनाकरितां गेलो. भोजनाचा बेत अगदी साधा. दोनच पदार्थ : एक मसालेदार कालवण आणि दुसरा म्हणजे चपात्या. चव्हाण माझ्या घरी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा मीं ब्राम्हणी पद्धतीची मेजवानी दिली. परंतु त्यांत त्यांचे विशेषसें लक्ष दिसलें नाही. त्यांना मिष्टान्नाची महति नाही. सरकारी बंगल्यांतील भोजनांतहि कितीहि विविध पदार्थ केलेले असले तरी त्यांतील थोडे पदार्थ चव्हाण घेतात.

कांही अवास्तव आरोप

यशवंतरावांबद्दल अनेक गैसमज बरींच वर्षे विनाकारण पसरविले जात आहेत. सातारा जिल्हा हा चव्हाणांच्या जन्मापूर्वीपासून गुन्हेगारीसंबंधी, खून, मारामारी, जाळपोळ, दरोडे इत्यादि बाबतींत प्रसिद्ध आहे. गांधीवधोत्तर झालेल्या जाळपोळीच्या प्रकाराचा संबंध सातारा जिल्ह्यांतील कांही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी जोडला जातो व त्या गोष्टीशी खाजगी अप्रत्यक्ष रीतीने चव्हाणांचाहि संबंध सूचित दिसतो. परंतु त्यासंबंधी पूर्वग्रहदोष सोडून शोध करण्याची काळजी कोणीच घेत नाही. अलीकडील एका गुन्हाचाहि बादरायण संबंध ध्वनित केला जातो. त्यासंबंधी नि:पक्षपाती संशोधन करून असाच निर्णय निघतो की, आरोप करणा-यांना कोणा तरी विशेष व्यक्तीच्या माथी दोष मारून त्यांत गोवण्यांत समाधान वाटतें, एवढीच त्या आरोपांच्या मुळाशी असलेलीमनोभूमिका सापडते. चव्हाण तसे आहेत, म्हणून चव्हाणांवर आक्षेप घेण्याची वृत्ति नाही, तर चव्हाण तसे ठरले पाहिजेत, अशी वासनाच त्या आरोपांच्या मुळाशी आहे. आरोप करणा-यांच्या ठायीं न्यायबुद्धि, विवेकांचे महत्त्व व सत्याची चाड असती तर चव्हाणांच्या बाबतींत अवास्तव आरोप करण्यास ते धजलेच नसते. चव्हाणांचा उत्कर्ष अपरिहार्य आहे, ही गोष्टच मनांत सलते. संधि सापडेल तेव्हा असले आरोप करून समाधान मानण्याचा प्रतिपक्षांचा उद्देश असतो. चव्हाण खंबीर मनाचे असल्यामुळेच 'हाथी चलत है अपने गतमें, कुतवा भुकत है भुकवा दे' या कबी-रोक्तीप्रमाणे ते उपेक्षा करीत आहेत, ही गोष्ट फारच चांगली आहे.

कांही अपेक्षा

श्री. चव्हाण हे येत्या निवडणुकीनंतर पुन: मुख्यमंत्री होतीलच ही गोष्ट साधारणपणें ठरलेली आहे, असें गृहीत धरण्यास हरकत नाही. मुख्य मंत्रिपदाच्या स्वीकारानंतर नव्या मुंबई राज्यांत त्यांची जीं भाषणें झाली; त्यावरून एक समतोल व समंजस राज्यकर्ता पुढे आला आहे, असेंच नि:पक्षपाती निरीक्षकांचे मत बनत चाललें आहे. यापुढे स्थिर व दीर्घकालीन मंत्रिमंडळ त्यांनी बनविल्यावर त्यांच्याकडून काय काय योग्य गोष्टी घडाव्या याबद्दल कांही अपेक्षा व्यक्त होऊं लागल्या आहेत; त्यांतील थोड्या मूलभूत बाबींचा क्रमवार निर्देश करून हा लेख संपवितों.

(१) राज्य : प्रांतिक संकुचित वृत्ति व केवळ व्यावहारिक दृष्टिकोण असलेले मंत्री नव्या मुंबई राज्याला आवश्यक असलेल्या व्यापक ध्येयवादी राजकारणाचा पायंडा पाडूं शकणार नाहीत. मंत्रिमंडळाची योग्य निवड ही एक काळजीची गोष्ट आहे. ध्येयवादी व व्यापक दृष्टीचे मंत्री मिळवतां येणें ही मुख्य गरज आहे. सरकारी वरिष्ठ अधिका-यांच्या कामावर योग्य नियंत्रण व मार्गदर्शन करणारे मंत्रीच निवडतां आले पाहिजेत. सरकारी वरिष्ठ अधिका-यांची काम करण्याची पद्धति यांत्रिक व दूरदृष्टीचा पोंच नसलेली असते. मंत्री जर ध्येयवादी दृष्टिकोणाचे व कार्यक्षम नसले तर ते स्वस्थ व तटस्थ राहतात किवा केवळ वशिलेबाजी करीत राहतात; किंवा सत्तेचा मनसोक्त वापर करूं इच्छितात.

(२) शिक्षण : शिक्षणसंस्था, विद्यापीठें व साहित्यिक संस्था यांच्यावर देशाचें मानसिक व बौद्धिक अवलंबून असतें. त्यांच्या वर सरकारी नियंत्रण राहण्यावर भर न देतां सरकारी मदतीने सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणण्याकरितां कार्यक्षम व आत्मविश्वाससंपन्न माणसें व त्यास उपयुक्त अशी विचारसरणी त्या संस्था कशी निर्मितील हा महत्त्वाचा मूलभूत प्रश्न आहे. सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणणें व दैनंदिन राजकारणापासून विद्यार्थी वर्गास अलिप्त ठेवून त्यांचा आत्मविकास साधणें हेंच शिक्षण व साहित्य यांचे मुख्य कार्य आहे. विद्यापीठें स्वायत्त व स्वयंतंत्र रुपाने चालण्यास मदत करणें ही गोष्ट राज्यकर्त्यांना इष्ट वाटली पाहिजे. राज्यकर्त्यापुढे विनाकारण वाकणार नाहीत अशा हिंमतीचे नेते विद्यापीठांत स्थापले पाहिजेत. कारण व्यापक संस्कृति ही सत्तेच्या कमीत कमी नियंत्रणामुळेच योग्य दिशेने कार्य करूं शकते. बौद्धिक व सांस्कृतिक दर्जा असलेले स्वतंत्र बाण्याचे वजनदार लोक विद्यापीठांना लाभले पाहिजेत.

(३) नियोजन : आर्थिक नियोजनांची अंमलबजावणी नोकरशाही मार्फतच विशेषत: होत आहे; लोकांचे सहकार्य हा त्यांतला फार दुय्यम भाग आहे. नियोजनांत लोकनेृतत्व व लोकांचे स्वावलंबी सहकार्य जेव्हा दिसूं लागेल तेव्हाच नियोजनांना साफल्य येऊ लागेल. नाही तर ठराविक रकमा ठराविक मुद्यावर खर्च पडल्या, एवढेंच नियोजनांतून समाधान प्राप्त होईल. लोकांच्या स्वयंप्रेरित आर्थिक व्यवहारांच्या द्वारा बेकारीचे निवारण करण्याच्या प्रयत्नावर भर दिली तरच देशाचा आर्थिक प्रश्न सुटण्याच्या मार्गास लागला असें होईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org