अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 7

"आमचा शेतकरी अशिक्षित असला तरी त्यांचे व्यवहारज्ञान पक्कें असतें. तो शेतांतील विहिरीच्या काठाजवळील झाडाच्या शांत सावलीखालीं दुपारी अवजारें ठेवून जेव्हा अंग टाकतो. तेव्हा तो शांतपणे व्यवहाराचा हिशेब करीत असतो व बिनचूक निर्णयाप्रत येऊन पोचतो. राज्य कोणता पक्ष खरोखर करुं शकेल, ही गोष्ट त्याला कळण्यास ग्रंथांची पायारणें करण्याची गरज लागत नाही." हे यशवंतरावांनी स्वत:चेंच चित्र शेतक-यांत कल्पिलें आहे असा माझ्यासारख्याचा ग्रह त्यांचे हे भाषण ऐकतांना होतो.

त्यांच्या ठिकाणीं जशी समतोल व्यावहारिक बुद्धि आहे, त्याचप्रमाणे उदारमतवाद व अलिप्त वृत्ति अंगी बाणावी अशीहि इच्छा आहे. विफलतेला तोंड देण्यास अशी वृत्ति व उदारमतवाद उपयोगी पडतो. म्हणून मतदारांची मनधरणी करतां करतां ते हमेशा असेंहि बोलून जातात की, "तुम्ही पाहिजे तर मला मतें देऊं नका; पटल्यासमला मतें द्या.'जो दे उसका भला, न दे उसका भी भला!' उदारमतवाद अंगी बाणावा अशी त्यांची इच्छा आहे. याचे महत्त्वाचे गमक म्हणजे गेल्या वर्षांत त्यांच्यावर जे वृत्तपत्रांनी, लेखकांनी, चळवळ्यांनी अनेक प्रकारें वाक्यप्रहार केले, पराकाष्ठेची निर्भर्त्सना केली, अपमानकारक निदर्शनें केलीं, तीं सर्व त्यांनी निमूटपणे सहन केली. गालिप्रदान करणारा, त्याच गोष्टीमुळे अमंगळ ठरतो, ही गोष्ट ते जाणून आहेत, म्हणूनहि संयम राखण्याचा ते प्रयत्न करतात.

मनदौर्बल्याचा आरोप.

आज ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बनले. ह्यासंबंधी त्यांनी मनाशी तसा संकल्प करून ठेवला होता, असें म्हणतां येत नाही योगायोगाने अशा गोष्टी घडतात; संकल्प करुनहि उपयोग होतोच असें नाही, असे ते म्हणतात. ते मुख्य मंत्रिपदावर येण्यापूर्वी चार-पाच महिने त्यांचे मित्र त्यांना मुख्य मंत्रिपदाच्या रोखाने पावले टाकण्यासंबंधी वारंवार सूचना देत होते.  त्यांच्या अनेक मित्रांनी त्या दृष्टीने महत्त्वाच्या हालचालीहि केल्या. त्यांच्या दोन-तीन मित्रांनी त्यांना बजावलें की, तुम्ही दुस-या एका महाराष्ट्रीय पुढा-याचा आमचा मुख्य नेता म्हणून वेळीं-अवेळीं निर्देश करतां ही गोष्ट आम्हांस नापसंत आहे; तुम्ही स्वत:च हिंमत धरून पुढे सरा ! परिस्थितीची अनुकूलता वाढत असलेली मित्रमंडळींच्या नरजरेस येत होती. तरी यशवंतरावांनी अखेरच्या क्षणापूर्वीपर्यंत त्या महाराष्ट्रीय नेत्याचीच मुख्य नेता म्हणून प्रशंसा केली. याचे कारण अवास्तव औत्सुक्यास ने बळी पडूं इच्छीत नाहीत, हें होय. चालू क्रमांक विक्षेप उत्पन्न होऊन नसत्या नव्या अडचणी आपल्या वाटेंत उभ्या राहूं नयेत याची वाजवीपेक्षां जास्त दक्षता बाळगण्याकडेच त्यांचा कल असतो.

परिस्थितींत जपून पावलें टाकणें, हा त्यांचा स्वभावधर्म त्यामुळे आहे. त्यांच्यावर कांही मित्र मनोदौर्बल्याचाहि आरोप करतात. ताळमेळ पाहून वागणें, प्राप्त परिस्थितींत फारशी गडबड उडणार नाहीं अशी दक्षता बाळगणें व सहका-यांशी शक्य तितकें जुळवून घेण्याचा प्रयत्न राखणें या गोष्टीमुळे कदाचित् महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांचा उलगडा व अंमलबजावणी करणें आणि कार्यक्षमतेच्या वेग व कौशल्य साधून महाकार्यात साफल्य मिळविणें या गोष्टींत अडचणी उत्पन्न होऊन दौर्बल्य सिद्ध होण्याचीहि शक्यता आहे. सहकारी मित्र व मंत्री अदूरदर्शित्वामुळे व संकुचित वृत्तीमुळे संकटांतहि नेऊन सोडणार नाहीत असें नाही. परंतु या बाबतींत आताच निश्चित विधान करणें फार कठीण आहे. दीर्घकालीन मंत्रिमंडळ बनविल्यनंतरच या बाबतींत त्यांची परीक्षा होऊं शकेल.

यशवंतरावांच्या भाग्यांत मित्रलाभ हा मोठा आहे. जिवाला जीव देणारे, नि: स्वार्थी मित्र त्यांना मिळाले आहेत. सर्व जातींत व सर्व धर्मांत त्यांचे मित्र आहेत, सुशिक्षित व अशिक्षित, पत्रपंडित, लेखक, कवि, प्राध्यापक, व्यापारी, शेतकरी इत्यादि अनेक व्यवसायांतले मित्र त्यांना आहेत. त्या मित्रांना न सांभाळतांच ते मित्र सांभाळले जात आहेत. ह्यामुळे यशवंतरवांना एक प्रकारचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे.

कौटुंबिक जिव्हाळा

त्यांचे खाजगी जीवन गरिबीचें, साधें व प्रेमळ, असेंच अद्यापपर्यंत आहे. प्रथमायुष्यांतील खडतर जीवनक्रमानें त्यांना सोशिक व संयमी बनविलें आहे. पुष्कळ वेळां मनुष्य गरिबीनें कठोरहि बनतो. ते तसे झाले नाहीत. कौटुंबिक भावनेचा जिव्हाळा त्यांच्या ठिकाणीं ओतप्रोत भरलेला आढळतो. वृद्ध मातेवरील त्यांची भक्ति मित्रांशी खाजगी रीतीने बोलतांना प्रसंगाने व्यक्त झाल्याशिवाय राहत नाहीं. त्यांच्या स्वर्गवासी वडील बंधूंच्या अपत्यांचे संगोपन, शिक्षण व लग्नकार्य त्यांनी परम वात्सल्याने साजरीं केली आहेत. कुटुंबसंस्थेचें पावित्र्य हा एक श्रेष्ठ सांस्कृतिक ठेवा होय, असें समजून त्यांचे वर्तन असतें. अशक्य व नेहमी मधूनमधून आजीर पडणा-या पत्नीची काळजी वाहतांना त्यांच्या चारित्र्याच्या पावित्र्याची खूण मनास पटल्याशिवाय राहत नाही. त्यांना स्वत:च्या गरीब स्थितीची पूर्ण जाणीव आहे. त्याबद्दल ते इतर सामान्य चार माणसांप्रमाणेच कसलीहि खंत करीत नाहीत. उदाहरणार्थ, एक गोष्ट नुकतीच घडलेली मला आठवते, ती येथे उद्धत करतो. मुंबईस सहा महिन्यांपूर्वी जे ए. आय्. सी. सी. चें अधिवेशन भरलें त्याच्या नंतर लगेच यशवंतराव काश्मीरच्या छोटया दौ-यावर गेले. तेथून ते परतल्यावर त्यांची माझी गाठ पडली. त्यांना मीं सहज उत्सुकतेने विचारले, "काश्मीरला काय काय खरेदी केली?" त्यांनी उत्तर दिले, "कांही विशेष सांगण्यासारखी नाही. केवळ अपवादच सांगायचा तर एक रेशमी पातळ पत्नीला आणलें. अक्रोड वृक्षाच्या लाकडाचें नकशीकाम आणलें नाही. कारण तें आपल्यावर ठेवायचें कोठे? आपलें कराडचें घर कसें आहे, ते माहीत आहेतच. त्या नकशीकामाचा तेथे अपमानच व्हायचा; भार पश्मिना शाल खांद्यावर टाकून चालण्याइतकी आपली ऐपत नाही. फक्त एवढें खरें की, तेथील निसर्गाचें सौंदर्य व पावित्र्य मनांत साठवून आणलें आहे!"

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org