अभिनंदन ग्रंथ - राजकीय सहयात्री - 5

रॉयवादाकडून नेहरूवादाकडे

खेड्यापासून शहरापर्यंत राजकीय संघटना कशी करावी याचा उत्कृष्ट  अनुभवहि त्यांना दीर्घकालपर्यंत मिळाला आहे. सातार जिल्ह्यांतील काँग्रेस संघटनेंत १९३० ते ३८ पर्यंत आत्मारामबापू पाटील हे बहुजन-समाजाचे प्रतिनिधी म्हणून नेतृत्व करीत होते. त्यांचे सहकारी म्हणून यशवंतराव त्या संघटनेंत प्रथम भाग घेऊं लागले. १९३७ सालची आत्मारामबापू पाटलांची गाजलेली निवडणूक मोठ्या यशानिशी जिकण्यांत यशवंतरावांचे चातुर्य उपयोगी पडलें. समयोचित वक्तृत्व, संघटना-कौशल्य व राजकीय धोरणीपणा हे त्यांचे गुण याच सुमारास व्यक्त होऊ लागले. त्यावेळीं आत्मारामबापूंचा यशवंतरावांवर फार लोभ होता; यशवंतराव चांगले सुशिक्षित बनून आपल्या बौद्धिक प्रभावाने समाजाचें नेतृत्व करतील, अशी भविष्यवाणीहि त्या समयीं आत्मारामबापू माझ्यापाशीं बोलल्याचें मला आठवतें.

एम् एन् रॉय यांच्या रॅडिकल काँग्रेसजनांत यशवंतराव कांही काळ दाखल झाले होते. परंतु १९४० सालीं रॉय यांचा महायुद्धविषयक धोरणांसंबंधी काँग्रेसशीं मतभेद झाला, म्हणून रॅडिकल काँग्रेसजन काँग्रेसमधून बाहेर पडले. यशवंतराव मात्र काँग्रेसमध्येच राहिले. याचें निदान यशवंतरावांच्या व्यावहारिक व वस्तुवादी दृष्टिकोण होय, असें कांही जण सांगतात. माझ्या मतें त्यांच्या लहानपणापासूनच्या मानसिक संस्कारांत काँग्रेसचें मूळ फार खोल गेले; राष्ट्रवादी भावनेच्या बलामुळे ते काँग्रेस सोडूं शकले नाहीत. त्यांची पुरोगामी विचारसरणी व क्रांतिकारक ध्येयवाद यांस पूरक असें पं. नेहरूचें आलंबन त्यांना काँग्रेसमध्येच गवसलें. राष्ट्रीयत्व, लोकशाही आणि समाजवाद यांचा समन्वय त्यांना पं. नेहरुंत सापडला. त्यामुळे ते एकाअर्थी नेहरुवादी बनले. रॉयमध्ये त्यांची विचारसरणी उगम पावली व नेहरूमध्ये ती परिणत झाली, असा क्रम लावला तर यशवंतरावांच्या राजकीय वर्तनाला उलगडा होऊं शकतो. माझ्यासारखे लोक ध्येयवादाला व्यावहारिकपणाची जोड व तडजोडीची वृत्ति असाहि याचा अर्थ करुं शकतील.

'चलेजाव' चळवळंत आणि नंतर

१९४२ च्या 'चलेजाव' च्या चळवळींत सातारा जिल्ह्यांतील भूमिगत कार्यकर्त्यांचे मुख्य मार्गदर्शकत्व यशवंतरावांकडे होते; ही गोष्ट, त्या चळवळीशीं माझा संपूर्ण मतभेद होता तरी, मला कळत होती. कारण प्रत्येक खेडें हें स्वयंशासित लोकशाहीचें केंद्र बनलें पाहिजे, या कल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न त्यांत होत होता. ह्या कल्पनेची व्यवस्थित तात्त्विक बैठक जाणणारे यशवंतरावांशिवाय दुसरे कोण असू शकणार, हें आमच्या लक्षांत सहज आलें होतें. तेव्हा यशवंतरावांना अत्यंत निधड्या छातीचे व निर्धाराचे सहकारी पुष्कळ मिळाले. त्यांत माझे फार जुने राजकीय सहकारी किसन महादेव वीर अग्रगण्य होते. किसन वीर हे अत्यंत श्रद्धाशील, निष्ठावंत व जिवास जीव देणारे मित्र लाभल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत यशवंतराव मोठ्या आणीबाणीच्या प्रसंगींहि नेटान धीर धरूं शकले. किसन वीरांच्या अभावीं सातारा जिल्ह्यांतील काँग्रेस संघटनेचे काय झालें असतें हें सांगणेंहि फार कठीण आहे. यशवंतराव हे भावनाविवश क्वचितच होतात. वस्तुवाद व व्यवहार यांची राजकीय ध्येयाशीं सांगड घालण्यांत त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे 'चलेजाव' ची चळवळ खाली जाऊं लागणार, ही गोष्ट ४३ सालींच त्यांच्या लक्षात आली; लगेच त्यांनी आपला भूमिगत राहण्याचा मनसुबा सोडला व कारागृहवास पत्करला.

१९४५ नंतर यशवंतराव महाराष्ट्रांतील काँग्रेसनेत्यांच्या प्रभावळीत दिसावयास लागले. थोड्याच अवधींत काँग्रेसच्या हातीं ब्रिटिशांनी भारताची सत्ता सोपविली. १९४७ सालापासून गेलीं दहा वर्षे काँग्रेस शासनायंत्रनारुढ झाली असतां यशवंतरावांनी शासन-तंत्राचा अनुभव घेतला. सत्तेचें राजकारण कसें चालतें व तें कसें चालवावें याचें प्रात्यक्षिक, कसलेल्या प्रशासक मित्रांच्या सांनिध्यांत, त्यांनी जवळून पाहिलें व त्यांत भागहि घेतला. हा दहा वर्षाचा कालखंड अनेक आणीबाणीच्या प्रसंगांनी व नाजुक प्रश्नांच्या गुंतागुंतींनी भरलेला असतांना त्यांना पाहावयास मिळाला व त्यांत प्रत्यक्ष हालचालीहि करण्यास त्यांना मिळाल्या. गेलीं पांच वर्षे तर ते मुंबईच्या मंत्रिमंडळांत प्रत्यक्ष राज्यकारभार करीत होते.

मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळांत गेल्या पांच वर्षात गुजराती व महाराष्ट्रीय अशी फळी पाडण्याचा प्रसंग यशवंतराव नसते तर टळला नसता. एकमुखी मजबूत सहकार्य व जुळवून घेण्याची प्रवृत्ति या गोष्टींवर मंत्रिमंडळाची बैठक स्थिरावते. ही मुंबई राज्याची बैठक बिघडण्याची कारणें मंत्रिमंडळाच्या बनावाच्या पहिल्या क्षणींच पांच वर्षापूर्वी उत्पन्न झालीं. घटनात्मक पेचप्रसंगहि त्यांतून उद्भवला असता. तो यशवंतरावांनी दूरदर्शित्वाच्या योगाने हिंमतीने टाळला. नंतर खाजगी रीतीने त्यांच्या विरुद्ध विषारी प्रचार सुरु झाला. त्यांनी निमटपणे धैर्याने त्याला कांकूं न करतां तोंड दिलें.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org