म. गांधींनी एकापाठीमागून दुसरी व तिच्या पाठीमागून तिसरी अशा जनतेच्या देशव्यापी तीन चळवळी वादळापाठीमागून वादळें यावी याप्रमाणे निर्मिल्या. गांधी हा वायुदेवच होता. असहकारिता १९२०-२१ सालीं, कायदेभंग १९३०-३२ साली आणि चले जाव १९४२ ते ४५ सालीं या अशा तीन चळवळींनी सर्व देश बळापासून मंथन होऊन पूर्ण जागृत व साम्राज्यशाहीचीं सर्व प्रकारची बंधने तोडण्यास उभा राहिला या चळवळीचें पथ्य व मार्ग शस्त्रहीन क्रांति हा होता.
भारतांत समाजवादाचा उदय
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या इतिहासांत १९२० नंतर राष्ट्रवादाबरोबरच पाश्चात्य देशाकडून समाजवादी ध्येयवाद आला. या समाजवादी ध्येयाची साम्यवादी स्वरुपांत निर्मिति व संघटना मुख्यत: एम. एन्. रॉय यांनी केली. साम्यवादी किंवा कम्युनिस्ट संप्रदायास महत्त्व न देता समाजवादी ध्येयाचा साररुपाने स्वीकार पं. जवाहरलाल नेहरू यांनी केला. समाजवादी ध्येयवादाने भारतीय राजकारणांत सामाजिक समतेचे नैतिक मूल्य दृढमूल झालें आणि राजकारणाला आर्थिक नियोजनाची जोडहि समाजवादी विचारसरणीमुळे प्राप्त झाली. सामाजिक मूलगामी नवरचना केल्याशिवाय भारतास सामर्थ्यशाली राष्ट्र हे रुप प्राप्त होणार नाही, अशा त-हेच्या विचाराची प्रेरणा समाजवादी ध्येयवादी कारणांत उत्पन्न झाली.
एक राष्ट्राची दोन राष्ट्रे कां झाली ?
भारतीय राष्ट्रवादानेच भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र होत असतां भारताचे दोन भाग झाले. ते दोन भाग अनपेक्षित आणि अनिष्ठ जरी होते तरी ते अपरिहार्यपणें झाले. जणू काय ऐतिहासिक शक्तीपुढे अगतिकपणे नसल्यामुळे पाक व हिंद असे राष्ट्राचे दोन भाग पडले. हा एक प्रकारें दैवदुर्विपाकच म्हटला पाहिजे. कांही विचारवंतांचे असे म्हणणें आहे हे दोन भाग होण्याची एकंदरीत तीन कारणें सभवतात. पहिली नजीकची दोन कारणें म्हणजे ब्रिटिशांची भेदनीति व हिंदी नेत्यांचा आध्यात्मिक राष्ट्रवाद होय. भेदनीतीचा इतिहास आहे. आध्यात्मिक राष्ट्रवादाचें अधिष्ठान हिंदूंच्य उपनिषदांतील, गीतेंतील व पारमार्थिक दर्शनांतील तत्त्वज्ञान होय. या तत्त्वज्ञानाच्या प्रेरणा मुसलमानांचे भावनात्मक एकीकरण करण्यास विरोधी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चळवळींत मुसलमान समाज सामील होऊनहि त्यांचे मन हिंदु मनाशी सांधले गेलें नाही. तिसरें महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या अनेक शतकांमध्ये हिंदु आणि मुसलमान जमाती एकत्र नांदत असूनहि एकाच सामाजिक,आर्थिक व राजकीय जीवनांत जगत असूनहि जमातींत सामाजिक समरसता निर्माण होऊं शकली नाही. सामाजिक समरसता हाच राष्ट्रीच ऐक्याचा आधार होय. सामाजिक समरसतेचा अभाव ही एक ऐतिहासिक दुर्घटना होय. हा ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे निर्वाणीच्या क्षणीं भारतीय राजकारण धोक्यांत सापडलें. हिद व पाक असा भारत कायमचा दुभंगला गेला. एवढेंच नव्हे तर शेजारी शेजारी उत्पन्न झालेलीं हीं दोन राष्ट्रे मित्रराष्ट्रे म्हणून शेजारधर्माने राहणे कठीण आहे, अशा त-हेचा दुस्वास कायमचा निर्माण - आपत्तीची तलवार भारत व पाक यांच्या डोक्यावर किती दिवस लटकत राहणार, याबद्दल भविष्यवाद सांगणें अशक्य झालें आहे. या सामाजिक समरसतेचा अभाव आज दृश्यरुपाने भारत व पाक या विच्छेदनाच्या स्वरुपांतच केवळ छळत नाही; तर या प्रत्येक राष्ट्रांत या दोन जमाती एकत्र राहिल्या आहेत, पण त्यांना राष्ट्रीयत्वाच्या उच्चत्म भावनेने एकत्र सांधलेलें नाहीं. त्यामुळे भारतीयांचें अंतर्गत राजकारणहि दुर्बळ राहणार आहे. या सामाजिक समरसतेच्या अमावाला मूळ कारण हिंदूंची जातिसंस्था होय. ही हिंदूंची जातिसंस्था जोपर्यंत भारतात राहली तोपर्यंत भारताचें राष्ट्रीय ऐक्यहि शिथिल व अदृढ राहून भारतीय ऐक्याचे सुद्धा केव्हा तुकडे करील याचा भरवसा सांगतां येत नाही. या राष्ट्रीय दौर्बल्यामुळे वायव्येकडून व उत्तेरकडून येऊं पाहणारे धोके अधिकच साशंक व भयभीत करतात.