अभिनंदन ग्रंथ - गेल्या शतकाचा वारसा

गेल्या शतकाचा वारसा

- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

नवी परिस्थिती वा विरुद्ध परिस्थिती उपस्थित होते आणि त्या परिस्थितीचें आव्हान मनुष्य स्वीकारतो तेव्हा इतिहासांत बदल होत असतो. परंपरेचें सातत्य ही जशी प्रगतीची शक्ति आहे तशी ती प्रगतीचा अडथळाहि आहे. भारतीय इतिहासांत नवें संक्रमण व प्रगतिमय स्थित्यंतर हजारों वर्षांनतर ब्रिटिशांच्या राज्यांतच घडून आलें. गेल्या दीडशे वर्षांच्या ब्रिटिश रियासतीच्या काळांत हिंदी जीवनांत ज्या प्रकारचें प्रगतिमय स्थित्यंतर घडून आलें, त्या प्रकारचें स्थित्यंतर हिंदी इतिहासांत हजारों वर्षांत घडलें नाही आणि इतक्या अल्पावधींत तर मुळीच कधी घडलें नाही. या स्थित्यंतराने भारतीय संस्कृतीच्या प्रवाहाची दिशाच बदलून टाकली. ब्रिटिशपूर्व काळाचा भारतीय इतिहास पाहिला तर असें दिसतें की, ऐतिहासिक परिणतिक्रम एक प्रकारें मंदावला होता. एवढेंच नव्हे तर त्यांत अगतिकता निर्माण झाली होती. एकंदरीत आशिया खंडाचाच इतिहास असा दिसतो की, त्यांत युरोपच्या ऐतिहासिक परिणतिक्रमाचे एकामागून एक प्रगट होणारे व्यवस्थित टप्पे सापडत नाहीत. ऐतिहासिक विकासक्रम ही कल्पना आशियाच्या व हिंदुस्थानच्या इतिहासशास्त्रशी जळत नाही.

दोन संस्कृतींचा संघर्ष व संगम

हें जरी खरें मानलें तरी ब्रिटिश राज्यस्थापनेमुळे पाश्चात्य संस्कृतीचा निकट संपर्क निर्माण झाला. अत्यंत प्राचीन अशा भारतीय संस्कृतीशीं अत्यंत आधुनिक व अत्यंत प्रगत अशा पाश्चात्य संस्कृतीचा संघर्ष होऊं लागला व त्या संघर्षातच उभयतांचा संगमहि सुरू झाला. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतींतील अमोल वारसाहि भारताला प्राप्त होऊ लागला. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीला प्रगति करीत असतां जो शक्तीचा वा कालाचा व्यय करावा लागला, संकटें सोसावी लागलीं, त्या व्ययावाचून व संकटांवाचूनच एका वैभवशाली संस्कृतीची मूल्यसंपदा भारताच्या हातीं लागली. यामुळे या स्थित्यंतराचे परिणाम सामाजिक व वैयक्तिक हिंदी जीवनाच्या सर्व अंगावर घडून येऊ लागले. सर्वांगीण जीवन-संक्रमण झाले., या संक्रमणाचा व्याप व व्यास सर्वगामी होता.

संपूर्ण बदललेला बाह्य जीवनक्रम आणि मानसिक मूल्यांतील क्रांति या दोन्ही गोष्टी समाजाच्या सर्वांगीण स्थित्यंतरास समुच्चयाने कारणीभूत होतात. इंग्रजी राज्यामुळे या दोन्ही गोष्टी घडल्या. भौतिक, यांत्रिक सुधारणा आल्या; नवीन पद्धतीचे आर्थिक व्यवहार व जागतिक व्यापार सुरु झाला; नवें संघटित राज्ययंत्र उभारलें गेलें, उदारमतवादी न्यायासन निर्माण झालें, सर्व नागरिकांना समान दर्जा देणारी शिक्षणसंस्था जन्माला आली, आधुनिक पद्दतीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व देणारा, सर्व धर्मीयांना समान लेखणारा कायदा निर्माण झाला, विचारविनिमयाचीं वृत्तपत्रादि प्रभावी साधने उत्पन्न झालीं.

पाश्चात्य संस्कृति आणि भारतीय संस्कृति या मानसिकदृष्ट्या जणू काय आखाशत्थ भिन्न ता-यांवर वसणा-या संस्कृतीप्रमाणे एकमेकीपासून दूर होत्या. या उभय संस्कृतीच्या संघर्षाने व संगमाने भारतीयांच्या संस्कृति मूल्यांत परिवर्तन घडलें. नव्या शिक्षणाची लाभ झाल्याबरोबर येथील शिक्षितांची मनें एकदम विद्युत्संचार होऊन यंऊ थरांरूं लागावे त्याप्रमाणें नवविचारांनी थरारूं लागली. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामुळे बदलून गेला. बुद्धीचें व विचाराचें अगदी नवें असें अधिष्ठान प्राप्त झाले. जीवनाचा अर्थ करण्याची रीतीच बदलून गेली. त्यामुळे सामाजिक व धार्मिक स्थित्यंतरास प्रारंभ झाला. हिंदी समाजाला घुसळून टाकणारी जीं अनेक सामर्थ्यं इंग्रजी राज्यामुळे उत्पन्न झालीं त्यांपैकी इंग्रजी विद्येचं शिक्षण हें एक महत्त्वाचें सामर्थ्य गणलें पाहिजे. सामाजिक, धार्मिक व राजकीय सुधारणा व्हावयास रुढि तोडावी लागते व कायद्याचा विरोध नष्ट व्हावा लागतो. एवढेंच नव्हे तर राज्यसंस्थेचा कायद्याच्या द्वारें पाठिबा मिळावा लागतो. इंग्रजी शिक्षणामुळे रुढीचें मानसिक बंधन शिथिल झाले; आणि इंग्रजी राज्याची मूळची उदारमतवादी परंपरा असल्यामुळे सुधारणाप्रवण कायदे निर्माण करण्यास अनुकूल वातावरण उत्पन्न् झाले. जमातीच्या जाचांतून व्यक्तीला मुक्त करण्याचें कार्य इंग्रजी कायद्याच्या व न्यायालयाच्या संस्थेने केलें. समाजसुधारणेच्या प्रवृत्तींना त्यामुळे मोकळीक मिळाली. जातीच्या सामाजिक बहिष्काराच्या शस्त्राची धार बोथट होत जाऊन शेवटीं ते शस्त्र पूर्ण गंजून पडलें - आणि आचार -विचार-स्वातंत्र्याचें नवीन युग हिंदी समाजांत प्रादुर्भूत झालें. धर्म-सुधारकांची आणि समाजसुधारकांची एक देशव्यापी चळवळ हळूहळू निर्माण होऊ लागली. सभा, परिषदा, संस्था, वृत्तपत्रें यांच्या द्वारें ती प्रसरण पावूं लागली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org