अभिनंदन ग्रंथ - महाराष्ट्रांतील बुद्धिवाद - 3

याच कार्यकारणभावाच्या विपर्यासामुळे आपला आत्मविश्वास नष्ट झाला आहे. या समर्थनपर बुद्धिवादाने आपल्या विचाराला सरकारवर विसंबून राहण्याचें वळण लावलें. राजकीय सत्तेमुळे आपली सामाजिक अवनति झाली असें मानल्यानंतर, सामाजिक उन्नतीची राजकीय सत्ता ही कारक शक्ति आहे असें मानलें जातें. आपलें काम फक्त सरकारवर टीका करण्याचें. समाजांत काही बिघडलें तर त्याला सरकार जबाबदार आहे या टीकेंतील गृहीतकृत्यच मुळाच सरकारने सामाजिक उन्नतीसाठी सारी खटपट केली पाहिजे असें आहे. आपले विचार सरकारग्रस्त झालेले आहेत. त्याचबरोबर सरकारचे समर्थन करणेंहि आपणांस पसंत नाही. कारण सरकारकडून कांही लभ्यांश असल्याखेरीज कोणी सरकारच्या बाजूला जाणार नाही ही आपल्या विचाराची स्वातंत्र्यपूर्व काळांतील बैठक अद्यापि ती कायमच आहे. सरकारविरोध हा निस्पृहता, सचोटी, विचारस्वातंत्र्य ला सद्गुणांचे प्रतीक झालेला आहे. सरकारविरोधकांना सरकारकडून लभ्यांश नको असतो असें नाही. किंबहुना लांचलुचपत, वशिलेबाजी, भ्रष्टाचार इत्यादि दुर्गुणांविरुद्ध मोठा आवाज काढणारापैकीं बरेचसे मागील दाराने याच वाममार्गाचा अवलंब करीत असतात. पण मुखवटा सरकारविरोधाचा असला पाहिजे. सरकार कांही चांगल्या गोष्टी करूं शकतें असें सिद्ध होणें मोठी आपत्तीच होय. अशा प्रकारें सरकारग्रस्त आणि सरकारविरोध या दोन परस्परविरोधी प्रवाहांनी आपल्या विचारावर आक्रमण केलें आहे. वास्तविक राज्यसत्तेच्या कक्षेहून सामाजिक जीवन आणि व्यक्तिजीवन किती तरी मोठें आहे. परंतु स्वातंत्र्यपूर्वकालांत राजकारणाला जें अवास्तव महत्त्व आलें, त्याचे अवशेष अद्यापि कायम आहेत.

समुदायवादाचें युग

सुमारें १९३५ पासून देशांत समुदायवादाच्या युगाला प्रारंभ झाला. तेल्यातांबोळ्यांचे राजकारण जाऊन त्याच्या जागी बहुजनसमाजाचें राजकारण आलें. याच महाराष्ट्रांत मार्क्सवादी विचारसरणीची छाप त्या वेळेच्या तरुण पिढीवर बसली. मार्क्सवादी स्वत:ला बुद्धिवादी म्हणवीत असत. गेल्या तीस वर्षांच्या इतिहासाने त्यांचा हा दावा खोटा पाडला. याच सुमारास श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांचे या विषयावर जेधे मॅन्शनमध्ये झालेलें एक व्याख्यान मला पक्कें आठवतें. या देशांतील मार्क्सवाद्यांनी श्रद्धेची खांदेपालट केली असून त्यांची मनूऐवजी मार्क्सवर श्रद्धा बसली आहे, अशी त्यांनी त्या वेळीं टीका केली होती. पुढील इतिहासानें ही टीका किती योग्य होती, हें सिद्ध केलें आहे. परंतु या तीस-पस्तीस वर्षांत आपल्या विचारावर यासमुदायवादी विचारसरणीचा बराच प्रभाव पडला आहे हें नाकारतां येणार नाहीं. समुदायशक्तीला आवाहन करतांना असें घडणें स्वाभाविक असेल. पण त्याचा परिणाम बुद्धिवादाची पीछेहाट होण्यांत झाला.

सार्वजनिक जीवनांत असहिष्णुता फार वाढली. काँग्रेस, मार्क्सवादी, मुस्लिम लीग आणि हिंदुमहासभा हे राजकीय पक्ष अधिक आक्रमक बनले. राष्ट्रद्रोही, भांडवलदारांचे बगलबच्चे, काफर, धर्मद्रोही किंवा मुसलमानधार्जिणे अशी एकमेक एकमेकांची संभावना करूं लागले. बुद्धिवादाच्या पीछेहाटीचेंच हें लक्षण नव्हे काय? 'द्रोह' या कल्पनेंत विश्वासघात येतो. द्रोह हें धार्मिक दृष्टया पाप आहे आणि सामाजिक दृष्ट्या तो गुन्हा आहे. प्रामाणिक मतभेदाला अशा रीतीनें पापाचें वा गुन्हायाचें स्वरुप प्राप्त झाल्यानंतर, विरोधक पापी अथवा गुन्हेगार बनला तर नवल कोणतें? अर्थात् गुन्हेगाराशी विरोध करावयाचा नसतो, त्याला शिक्षा करावयाची असते, गुन्हा जेवढा मोठा तेवढी शिक्षा कडक. राष्ट्रद्रोह, धर्मद्रोह हे तर देहांत प्रायश्चित्ताचे गुन्हे, म्हणून सार्वजनिक जीवनांत विरोधकांची रेवडी उडविणें, त्यांना बदनाम करणें, त्यांच्या सभा उधळणें, दहशत बसविणें या प्रकारांना या काळांत ऊत आला. युक्तिवादाची जागा शक्तिवादानें घेतली. तात्त्विक टीकेला शिवराळ टीकेनें शह  दिला. मतप्रदर्शन मागें पडून शक्तिनिदर्शनें पुढें आलीं. मोर्चाचे, संपाचे युग सुरु झालें. जनतेच्या आवाज उठूं लागला. गुणांच्या जागी संख्या आली. समुदायानें व्यक्तीवर मात केली. या काळांत सभा किती उधळल्या गेल्या, निदर्शने किती झाली, मोर्चे किती निघाले, जनतेचे आवाज कसे उठविले गेले इत्यादींची आकडेवारी कोणी सादर केली तर ती फार उद्बोधक ठरेल.

गेल्या तीस-पसतीस वर्षांतील महाराष्ट्राचे वैचारिक जीवन आशादायक होतें असें दिसत नाहीं. समाजांतील शिक्षितांचा वर्ग बुद्धिवादाचा वारसदार असा युरोपचा इतिहास. महाराष्ट्रांतहि पहिल्या पिढीने हा वारसा स्वीकारला. बहुजनसमाजाच्या राजकारणांत त्याची हेटाळणी होत गेली. आणि राजकारणांत शिरलेल्या कांही कल्पना त्याच्या बुद्धीला पटेनात. तेव्हां हा बुद्धिमंतांचा वर्ग सामाजिक जीवनापासून सर्वसाधारणपणें अलिप्त राहिला असें आढळून येतें. समुदायशक्तीच्या आक्रमणाला निष्ठेने तोंड देऊन बुद्धिवादाची पताका फडकत ठेवण्याचें कार्य या सुशिक्षितांना करतां आलें असतें. पाश्चात्य देशांतील अनेक शास्त्रज्ञांनी आणि विचारवंतांनी सामाजिक छळ, बहिष्कार आणि प्रसंगी देहदंड देऊनहि ही कामगिरी बजावली होती. पण येथील सुशिक्षितांचा वर्ग तसा एखाद्या 'मिशन'ने भारलेला नव्हता. जात्या दुबळा असल्याने त्यानें पलायनवादाच सोयिस्कर मार्ग स्वीकारला असें दिसतें. अर्थात्, राजकारणाच्या महारकींत कोण शिरतो, असें तो स्वत:चें सांत्वन करून घेत होता. पण आपल्याला जें जमत नाही त्याचा 'द्राक्षें आंबट' म्हणून अधिक्षेप करण्याची प्रवृत्ति जुनीच आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org