महाराष्ट्राचें स्वराज्य १८१८ मध्यें अस्तास गेल्यापासून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये त्याच्या हानीची हळहळ चालू होती. इंग्रजांच्या राज्यकारभाराचें निर्भेळ प्रेम जनतेच्या ठिकामी वसत असल्याचे पुरावे फार थोडे सापडतील आणि ते विशिष्ट हेतूचे सापडतील. स्वराज्याच्या अंतकालीन अंधाधुंदीतून इंग्रजांनी सोडविल्याचे समाधान जनतेच्या कांही थरांत दिसलें, म्हणून स्वराज्याची हानि ही देवाची कृपा असें मानण्याइतका इंग्रजी राज्यकारभाराविषयींचा आदर महाराष्ट्रीय जनतेच्या सर्व थरांत पसरला होता अशी समजूत करून घेतल्यास ती आत्मवंप्वना ठरेल. याचें एक प्रमाण म्हणजे गोपाळराव देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे इ. स १८४८ तींल लेख हें आहे. मराठेशाही लोपून १८४८ मध्यें अवघीं तीसच वर्षे उलटलीं होती. या अल्पावधींत इंग्रजी राज्यासंबंधाचा आदर -हास पावण्याऐवजीं उत्कर्षास चढलेला असणें हें अधिक संभवनीय असतांहि इंग्रजांचे राज्य शे-दोनशे वर्षांत आटपेल व भारतामध्यें पार्लमेंटरी धर्तीचे राज्य अस्तित्वांत येईल असें भविष्य लोकहितवादींनी १८४८ सालीं निस्संदिग्ध शब्दांमध्ये व्यक्त केलें आहे. स्वराज्याकांक्षेचा इतका जुना स्पष्ट उल्लेख भारताच्या इतर प्रदेशाच्या राजकीय वाड्मयांत सांपडणें कठिण आहे. लोकहितवादींनी स्वदेशी व्रत, कारखानदारी वगैरे अनेक विषयांचे प्रतिपादन ब्रिटिश वर्चस्व कमी करण्याच्या हेतूनें १८४८ पासून पुढें अखंड चालविलें होतें.
१८४८ नंतर थोड्याच वर्षांनी ज्योतीबा फुल्यांनी अस्पृश्यताविनारणाचें कार्य हातीं घेतलें. त्यांनी अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी जी शाळा घातली ती विलक्षण धाडसाची होती. फुल्यांचे सामर्थ्य या धाडसाला पुरून उरण्याइतकें मोठें नव्हतें. तथापि ज्योतीबांनी त्या शाळेच्या रुपानें जो सामाजिक समतेचा पाया घातला तो सा-या देशाच्या इतिहासांत अपूर्व गणला जाण्यासारखा आहे. त्यांच्या धाडसाला हातभार लावण्याला ब्राह्मणहि पुढें आले हें या संदर्भात मुद्दाम लक्षांत ठेवणें अवश्य आहे. ज्योतीबा अस्पृश्य वर्गातले नव्हते, याबरोबरच त्यांनी कडव्या पुराणमताभिमानाच्या पुणें शहरांत आपल्या संस्थेला जन्म दिला हा एक त्यांच्या धाडसाचा विशेष जमेस धरल्याशिवाय गत्यंतर नाहीं. त्यांच्या शाळास्थापनेमागून सुमारे साठ वर्षांनी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्योद्धाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहिली अस्पृश्यता थोड्या फार प्रमाणामध्ये सा-या देशांत पसरलेली होती. ब्रह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, थिऑसफी हे धर्मसुधारणावादी पंथी सामाजिक विषमतेबद्दल तीव्र विरोध दर्शवीत असले तरी यांतल्या एकाहि संस्थेशीं संबंध नसलेल्या ज्योतीबांनी हा विरोध कार्यात उतरविला. ज्या काळांत ज्योतीबांची शाळा अवतरली त्या काळी भारतामध्ये कुठेंहि तशी शाळा दाखवितां येणार नाही.
१८५७ सालीं इंग्रजांच्या नोकरींतल्या शिपायांनी जो उठाव केला, त्याच्यामागील प्रेरणेबद्दल किंवा दृष्टीबद्दल मतभेद असला तरी त्या उठावांत नांवाजले जाणारे पुढारी ( उत्तरेकडील झाशींची राणी, बिठूरचे नाना आणि तात्या टोपे ) महाराष्ट्रीय असावे हा योग नजरेआड करण्यासारखा नाही. शिपायांच्या त्या उठावांत महाराष्ट्रीयांच्या गळ्यांत अग्रगण्यत्वाची माळ पडते, ती त्यांच्यासंबंधांतील शिपायांच्या मनांत वावरणा-या अपेक्षेची साक्ष म्हणावी लागते.
यापुढील राजकीय घटनांचा आढावा घेतांना १८७८ सालांतील वासुदेव बळवंत फडके यांची चळवळ आणि १८९७ मध्यें दोघां इंग्रज अधिका-यांचा चाफेकरबंधूंनी केलेला वध यांच्याकडे दृष्टिक्षेप करायला हवा. फडके आणि चाफेकरबंधु यांची कृत्यें अपूर्वतेच्या सदरातील आहेत. जेव्हां तीं घडली तेव्हां इंग्रजी राज्यविरुद्ध हत्यार उपसण्याची व हत्यार उपसण्यावरच न थांबवतां तें चालवून इंग्रज अंमलदारांना ठार मारण्याची स्वप्नें पाहणें देखील भारताच्या महाराष्ट्रेतर प्रदेशांत अशक्यप्राय होतें. ज्या वर्षांत फडक्यांनी धामधूम केली आणि चाफेकरांनी इंग्रज अंमलदारांचे प्राण घेतले, त्या वर्षाच्या अवधीत अशी कृत्ये करणारे सा-या भारतांत दुसरे कोणी नव्हते. अंमलदारांना मारण्याच्या कृत्यांशी द्रवीडबंधूंचा प्राणघात जोडला पाहिजे. खुदीराम बोसाचा बाँबगोळा १९०८ मध्ये - चाफेकरांमागून दहा वर्षांनी उडाला व त्याच्यांतून निघालेल्या खटल्यांतील माफीचा साक्षीदार त्यानंतर कटवाल्यांच्या शस्त्राला बळी पडला. पण चुगलखोरांना देहान्त प्रायश्चित देण्याचा धडा चाफेकरांनी द्रवीडबंधूंना मारून महाराष्ट्रांत निर्माण केला. यामुळे कालक्रमानुसार बंगालमधील व महाराष्ट्रांतील अधिका-यांना मराण्याच्या (वीर सावरकरांदि ) कटाचें गुरुस्थान महाराष्ट्रीयांना द्यावें लागतें.