अभिनंदन ग्रंथ - मराठी भाषिकांचे आशास्थान- 3

पण १९५६ च्या ऑक्टोबरमधील आमच्या भेटींत श्री. यशवंतराव यांच्या मनोगतीची जी कल्पना मला आली होती, तिच्यामुळे माझ्या मनाची अशी खात्री होऊन गेलेली होती की, संयुक्त महाराष्ट्राच्या भूमिकेपासून ते ढळलेले नाहीत. ज्या काँग्रेस संघटनेचे ते सदस्य होते, तिची दृढता आणि शिस्त या दोहोंना आपल्या राजकीय जीवनांत जें पहिलें स्थान त्यांनी पक्षनिष्ठेने दिलेलें होतें, त्यामुळे आणि कदाचित् वैयक्तिक महात्त्वाकांक्षेमुळेहि जरी त्यांनी द्विभाषिक चालविण्याची जबाबदारी शिरावर घेतलेली असली, तरी संयुक्त महाराष्ट्राचें तत्त्व आणि मागणी हीं दोन्ही त्यांनी सोडून दिलेली नाहीत, असा माझा ग्रह पक्का होऊन गेलेला होता. किंबहुना, आजहि जेव्हा चार वर्षांपूर्वीच्या भेटींतील तें संभाषण मला आठवतें, तेव्हा मला रघुवंशांतील 'तस्य संवृत मंत्रस्य गूढाकारेंगितस्य च । फलानुमेया: प्रारंभा: संस्कार: प्राक्तना इव ।।' या मार्मिक श्लोकांचें स्मरण होतें. त्यामुळे यांच्या कारभारांतील कांही गोष्टी जरी मला अतिशय टीकास्पद वाटल्या, तरी त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यांत आपलें कांही चुकलें आहे, असें मात्र कधीच वाटलें नाही. उलट, आम्हा दोघांमधील अविश्वासाचें पटल दूर होऊन आमचे संबंध पूर्ण स्नेहभावाचे झाल्यावर, माझी त्यांचे कर्तृत्व आणि धोरण यांच्याविषयीची आदरबुद्धि आणि खात्री वाढत गेली. "राजकारणांत फक्त उपयुक्ततेला स्थान आणि मान आहे, स्नेहाला नाही," हें ब्रिटिश मुत्सद्दी डिस्त्रयली यांचे नीतिसूत्र मला माहीत आहे. पण, त्याबरोबरच केवळ विधानसभेच्या व्यासपीठावर दिलेला शब्दच नव्हे, तर खाजगी भेटींत दिलेला शब्दसुद्धा श्री. यशवंतराव किती कसोशीने पाळतात, याचा प्रत्यक्ष अनुभव विदर्भांतील एका मंत्र्यांच्या बाबतींत मीं घेतलेला आहे. त्यामुळे, त्यांच्या ठिकाणी जसें संघटनेविषयींचे इमान उत्कटतेने वसत आहे, तसेंच ज्यांना आपण एकदा सहकारी किंवा स्नेही म्हणून जवळ केलें, त्यांच्याविषयींचे इमानहि तितक्याच उत्कटतेने वसत आहे, असें म्हणावयाला मला शंका वाटत नाही. इतकेंच नव्हे, तर काँग्रेसविरोधी पक्षांतीलसुद्धा कांही प्रमुख कार्यकर्त्यांचा जो स्नेह आणि विश्वास त्यानी संपादन केलेला आहे, तो खरोखरी त्यांच्या या असामान्य राजकीय चारित्र्यामुळे ! त्यामुळेच कदाचित् ते इतके मितभाषी आणि संयमी. नेमकें आणि मोजकें बोलणारे व सौजन्याने पण सावधपणाने वागणारे झाले असावेत, असें मला वाटतें. 'सत्याय मितभाषिणाम्' हे कालिदासांचे वचन या दृष्टीने त्यांना यथार्थतेने लागू पडतें.

आचार्य दादा धर्माधिकारी यांचा मुक्काम गेल्या सप्टेंबरमध्ये नागपुरास असतांना दिल्लींतील काँग्रेसश्रेष्ठींच्या गोटांत त्यांच्यासंबंधी असलेल्या आदरबुद्धीविषयी बोलतांना, दादांनी असा उद्गार अगदी सहजगत्या काढला की, "पहिला बाजीराव आणि नाना फडणीस यांच्यांतले गुण यशवंतरावांच्या ठिकाणीं एकवटलेले आहेत." मला दादांचे हें विधान अत्यन्त समर्पक आणि मार्मिक वाटलें. बाजीरावाने मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन मराठी राज्य वाढविलें. व आपल्या संग्राहक धोरणाने सर्व जातींची नवीं सरदार घराणीं निर्माण करून त्या राज्याला बळकटी आणली. बाजीराव हा पराक्रमी असला, तरी हिशेबी नव्हता; धाडशी असला तरी कारस्थानी नव्हता; व दिलदार असला तरी विवेकी नव्हता. उलट. नाना फडणीस हा भित्रा खरा. पण पाताळयंत्री, हिशेबी आणि सावध होता. श्री. समर्थांनी नेमकेपणा म्हणून ज्या गुणांचे वर्णन केलेलें आहे, ते गुण हेंच नाना फडणीसांचे खरोखरी वैशिष्टय होय. श्री. यशवंतराव चव्हाण यांची गेल्या चार वर्षांतली व्यवहार-नीति आणि राज्यकारभार हीं जर दोन्ही पाहिलीं, तर त्यांच्या ठिकाणीं खरोखरीच बाजीराव आणि नाना फडणीस यांचे गुण एकवटलेले आहेत, हा आचार्याचा अभिप्राय पटल्याविना रहाणार नाही. त्यामुळेच गेल्या चार वर्षात, लोकनिंदा आणि विरोध यांच्यावर मात करून, ते आपलें उद्दिष्ट साधण्यांत यशस्वी झाले, व आपल्या राजकीय चारित्र्याचा वचक त्यांनी मित्र आणि शत्रु या दोहोंवरहि सारखाच बसविला. स्वत:च्या शब्दाला जागणारा आणि चारित्र्याला जपणारा इतरा संग्राहक वृत्तीचा पण सावध राज्यधुरीण मीं तरी पाहिलेला नाही.

म्हणूनच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यांत श्री. काकासाहेब गाडगीळ यांचा मुक्काम नागपुरास असतांना मीं त्यांना म्हटले, "यशवंतराव दिल्लीस जातील अशी आज सार्वत्रिक अपेक्षा आहे. पण महाराष्ट्र राज्य जर स्थिर आणि दृढ व्हावयाला हवें असेल तर आणखी पांच वर्षे तरी त्यांच्या राज्यकारभाराचें नेतृत्व त्यांच्याकडेच राहिलें पाहिजे, असें मला वाटतें." त्यावर काकासाहेब उद्गारले "अगदी खरें आहे आणि वरहि तशी जाणीव दिलेली आहे." श्री. यशवंतराव चव्हाण यांना पाठिंबा देणें म्हणजे काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणे नव्हे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्थिरतेला आणि दृढतेला, एकात्मतेला आणि अभिवृद्धीला पाठिंबा देणें आहे, याच एका भावनेने 'तरुण भारत' त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे लोकराधनेचें चातुर्य आणि संग्राहक धोरण हीं महाराष्ट्राच्या एकात्मतेचा परिपोष करून त्याच्या पुनर्घटनेचा आणि प्रगतीचा मार्ग निष्कंटक करतील. अशी मला खात्री वाटते; व त्यामुळेच, काँग्रेस पक्षाविषयीचे एरवीचे सगळे मतभेद बाजूला ठेवून, त्यांना पाठिंबा देणें अवश्य आहे असें मी समजतों. महाराष्ट्रांत तरी आज काँग्रेसइतका प्रबळ पक्ष दुसरा नाही; व त्यामुळे महाराष्ट्र राज्य सुस्थिर आणि यशस्वी होणें, हें त्या पक्षाच्या शासकीय नेत्याच्या मुत्सद्देगिरीवरच मुख्यत: अवलंबून आहे. या बाबतींत श्री. यशवंतराव चव्हाण यांची मुत्सद्देगिरी ही कसोटीला उतरलेली आहे, असें म्हणावयाला शंका वाटत नाही. कारण, काँग्रेसेतर पक्षांचा विरोध आणि महाराष्ट्रांतील प्रादेशिक भेदभाव या दोहोंवरहि मात करून, हे राज्य एकीकरणाच्या आणि उन्नतीच्या मार्गाला लावण्यांत आपण यशस्वी होऊं, अशी आशा त्यांनी उत्पन्न केली आहे. ती आशा सफल झालेली पाहावयाला मिळो, एवढीच या मंगल समयीं प्रार्थना.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org