अभिनंदन ग्रंथ -महाराष्ट्राच्या इतिहासाची सामान्य रेखा 1

वाकाटक राजवट

याच काळांत विदर्भांत वाकाटकांचे राज्य स्थापन झालें. तें सुमारे अडीचशे वर्षे टिकले. वाकाटक वंशाच्या चार शाखा झाल्या होत्या असें पुराणांतील उल्लेखांवरून समजतें, पण त्यापैकी नंदिवर्धन (रामटेकजवळील नन्दवरधन ) आणि वस्तगुल्म ( अकोला जिल्ह्यांतील वाशीम ) या दोन शाखांचेच लेख आतांपर्यंत मिळाले आहेत. नंदिवर्धन शाखेचा उत्तरेंतील गुप्त वंशाशी वैवाहिक संबंध होऊन सख्य झालें होते.

गुप्त सम्राट द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याने आपली कन्या प्रभावतीगुप्ता हिचा विवाह वाकाटक नृपति द्वितीय रुद्रसेन यांच्याशी केला होता. विवाहानंतर लौकरच रुदसेन स्वर्गवासी झाला तेव्हां प्रभावतीगुप्ता आपल्या अल्पवयी दिवाकरसेन नामक पुत्राच्या नांवे निदान तेरा वर्षे राज्य करीत होती. तिच्या मदतीकरिता द्वितीय चन्द्रगुप्ताने आपले विश्वासू सेनापति व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यांमध्ये कविगुलगुरू कालिदास हाहि होता असें दिसतें. वाकाटकांची राजधानी नन्दिवर्धन येथे असतां कालिदासानें आपलें विश्वविख्यात मेघदूत काव्य रचले. त्यांत निर्वासित यक्षाचें निवासस्थान म्हणून वर्णिलेला रामगिरि हा नन्दिवर्धन (नन्दवरधन) जवळचें रामटेक होय.

वस्तगुल्म शाखेचा शेवटचा राजा हरिषेण याच्या काळी वाकाटक साम्राज्य पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस बंगालच्या उपसागरापर्यंत आणि उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलें होतें. वाकाटक नृपतींनी हिंदुधर्म, संस्कृत व प्राकृत वाङ्मय आणि स्थापत्य, शिल्प, चित्र इत्यादि कला यांस उदार आश्रम दिला, इतकेंच नव्हे तर स्वत:ही संस्कृत व प्राकृत काव्यें रचलीं, वाकाटक नृपति सर्वसेन याचें हरिविजय आणि द्वितीयप्रवरसेन यांचें सेतुबंध या प्राकृत काव्यांची स्तुति अनेक कवींनी व आलंकारिकांनी मुक्तकंठाने केली आहे. त्या काळी विदर्भात इतकी उत्कृष्ट संस्कृत काव्ये रचली गेली कीं, त्यायोगे वैदर्भी नामक रीति सर्व मान्यता पावली. अजंठ्याची सोळा, सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी वाकाटक कालांतच कोरलीं गेली व चित्रशिल्पादिकांनी विभूषित केली गेली. त्या काळी अनेक हिंदु देवालयें बांधली होती. त्यांपैकी एकाचे अवशेष वाकाटक राजधानी प्रवरपूर (सध्याचें पवनार ) येथें श्री. विनोबांच्या आश्रमाच्या परिसरांत सांपडले आहेत.

वाकाटकांच्या काळी दक्षिण महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, दौड या  भागांत एक राष्ट्रकूट घराणे उदयास आलें. त्याचें कांही ताम्रपट त्या प्रदेशांत मिळाले आहेत. त्यांना कुंतलेश्वर म्हणत. त्यांच्या दरबारी द्वितीय चन्द्रगुप्त-विक्रमादित्याने कालिदासास आपला वकील म्हणून पाठविलें होतें अशी आख्यायिका राजशेखर, भोज इत्यादि आलंकारिकांनी उल्लेखिली आहे.

चालुक्य, राष्ट्रकूट व शिलाहार

वाकाटकांच्या अस्तानंतर सन ५५० च्या सुमारास माहिष्मती ( सध्यांचे महेश्वर) या कलचुरींचे राज्य महाराष्ट्रांत प्रस्थापित झालें. त्यांचे लेख व नाणी नाशिक, मुंबई, अमरावती जिल्ह्यांतील धामोसी, नागपूरजवळचें नन्दिवर्धन येथें सापडलीं आहेत. कलचुरींनी कोकणांत मौर्य घराणें मांडलिक म्हणून स्थापन केलें. त्याकाळी मुंबईजवळची सुप्रसिद्ध घारापुरी लेणीं कोरली गेलीं.

सातव्या शतकाच्या प्रथमार्धांत उदयास आलेल्या बदामीच्या चालुक्यवंशी द्वितीय पुलकेशी राजाने कलचुरी नृपति बुद्धराज याचा पराभव करून कुन्दल ( दक्षिण महाराष्ट्र) पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असे तीन महाराष्ट्र आपल्या राज्यास जोडले. त्याचे वर्णन त्याच्या ऐहोळे येथील शिलालेखांत पुढीलप्रमाणें आलें आहे :

अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणां.
नवनवतिसहस्त्रग्माभाजां त्रयाणाम् ।।

( जो पुलकेशी नव्याण्णव हजार गांवे असलेल्या तीन महाराष्ट्रांचा स्वामी झाला )

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org