अभिनंदन ग्रंथ - लोकमान्यांनंतर

लोकमान्यांनंतर

भाई माधवराव बागल

श्री. यशवंतरावाजी चव्हाण यांनी इतक्या अल्पावधींत इतक्या विरोधाशीं टक्कर देऊन जी लोकप्रियता मिळविली आहे ती निव्वळ कौतुकास्पद नाही, तर आश्चर्यकारक आहे. आज ते महाराष्ट्राचे सर्वमान्य नेते झाले आहेत. आपल्या सौजन्याने, प्रामाणिकपणाने, चारित्र्याने आणि कर्तृत्वाने त्यांनी आपला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा दर्जा महाराष्ट्रांतच नव्हे तर भारतांत वाढवला आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी जानेवारी महिन्यांत (१९६१) दिल्लीस गेलो असतां मला आला. प्रत्यक्ष दिल्लींत मंत्रिपदावर नसतांना जाणत्या लोकांत त्यांनी स्वत: विषयी आदर निर्माण केला आहे. दिल्लींत महाराष्ट्राला स्थान नव्हतें तें मिळवलें आहे. पं. नेहरुंचेंहि प्रेम संपादन केलें आहे. ही केवढी अभिमानाची गोष्ट ! लोकमान्यांच्या नंतर महाराष्ट्रांत पडलेली पुढारीपणाची पोकळी त्यांनी भरून काढली आहे. त्यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचें आणि कर्तृत्वाचें दर्शन घडविणारा ग्रंथ प्रकाशित करण्याची कल्पना अत्यंत स्तुत्य आहे.

यशवंतरावजींची व माझी ओळख ते एक सामान्य कार्यकर्ते म्हणून झाली होती. त्यावेळीं माझ्या डायरींत 'कराडचा एक होतकरु कार्यकर्ता' एवढाच उल्लेख मीं केला होता. एक शेतकरी परिषद घडवून आणण्यांत त्यांनी त्यावेळी बराच पुढाकार घेतला होता. त्या परिषेदेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी माझें स्वागत केलें होतें. त्या तरुणाला संयुक्त महाराष्ट्राचा मुख्य मंत्री म्हणून कोल्हापूरच्या प्रचंड जाहीर सभेंत मानाचा मुजरा करण्याचे भाग्य मला लाभावें याचा मला अभिमान वाटतो. केवढें स्थित्यंतर झालें हे यशवंतरावजींच्या स्थानांत !

द्विभाषिकाच्या वेळी मी त्यांचा कट्टर विरोधी. अत्यंत प्रखर टीकेचा माझ्यापासूनच सुरुवात झाली म्हटलें तरी चालेल. त्या वेळचे द्विभाषिकाचे पुरस्कर्ते म्हणून मी त्यांचा द्वेष करीत होतों. कारम मी होतों संयुक्त महाराष्ट्राचा वेडा ! तो माझ्या जीवनमरणाचा लढा असें मी मानीत होतों.

यशवंतराव आणि पक्षनिष्ठा

रशियाचे मुख्यमंत्री बुल्गानिन यांनी मुंबईस भेट दिली त्या वेळचा प्रसंग मी त्या वेळी मुंबईस होतो. यशवंतरावाना मी शत्रु म्हणूनच मानीत होतो. त्याच रागाच्या भरांत मी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मलबारहिलच्या बंगल्यावर गेलों. तोंडसुख घ्यावे हा इरादा होताच. वडीलकीच्या तो-यांतच गेलो होतों. मला जराहि वाट पाहावी लागली नाही. लगेच बोलावणें आलें. माझ्या टीका त्यांच्या कानांवर गेल्या असणारच. पण त्याची जाणीव त्यांनी मला करून दिली नाही. आदरानेच वागवले. ते म्हणाले,

"माधवरावजी, महाराष्ट्राचा अभिमान आम्हांला काय वाटत नाही ? संयुक्त महाराष्ट्र होऊं नये असं का आम्हांला वाटतं? पण शंकरराव देवांनी द्विभाषिकाला मान्यता दिली. तें आमच्या गळ्यांत बांधलं आणि मग पक्षशिस्तीला बांधून गेल्यामुळें त्याचा पुरस्कार करणं हें आता आमचं कर्तव्य आहे."

अन् या पक्षशिस्तीसाठी त्यांनी महाराष्ट्राच्या टीकेचा गहजब आपल्यावर ओढवून घेतला. टीका, शिवीगाळ, निर्भर्त्सना, प्रत्यक्ष हल्ले, हें सर्व सहन करावें लागलें. या लोकक्षोभांतून ते डोकें वर काढतील व पुन: लोकप्रियता व लोकादर संपादन करतील असें स्वप्नांतहि कोणाला वाटलें नसतें. पण संयमाने धैर्याने आणि निश्चयानें राज्यधुरा चालवून व आपली पक्षनिष्ठा शाबूत ठेवूनच त्यांनी श्रेष्ठींचे मन वळवलें, संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल करून घेतलें आणि चळवळीला यश मिळवून दिलें ! त्यांची असामान्य अशी ही कामगिरी इतिहासांत नमूद करावी लागेल. शत्रूलाहि ती मान्य करावी लागेल. पण निव्वळ संयुक्त महाराष्ट्र हें ज्यांचेपुढे ध्येय नव्हतें व सत्ता संपादन करण्याचाच तो एक मार्ग वाटत होता त्यांना तें श्रेष्ठत्व आणि त्यांची कामगिरी मान्य करण्याची बुद्धि केव्हाच होणार नाही. याचबरोबर यशवंतरावजींनी पक्षनिष्ठेचा एक आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. पण दिलेलीं कांही आश्वासने कांही वेळी यशवंतरावांना पक्षनिष्ठेमुळे पाळतां आली नाहीत हें मला बरें वाटलें नाही. त्यामुळे अनेक व्यक्ति नाराज झाल्या. त्यांपैकी मी एक होतो. पक्षनिष्ठा की आश्वासन असा प्रश्न उभा राहिल्यास आश्वासनाला मी स्वत: अधिक महत्त्व देईन- अर्थात् माझें हें मत मी स्वत: कुठल्याहि पक्षांत नसल्याने पक्षपाती असूं शकेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org