लोकशाही निर्माण करावी लागते.
असा एकजिनसी समाज आहे असें गृहीत धरून सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्या संबंधांचा विचार करावयाचा. या स्थितींत दोन्ही बाजूंनी निव्वळ अडवणूक अथवा आडमुठेपणा दोन्ही पक्षांनी करावयाचा नाही, असा आणखी एक संकेत उभय पक्षांनी पाळला पाहिजे. विधानमंडळासमोर येणा-या कोणत्याहि विषयावर प्रथम पक्षसंघटनेंत चर्चा होऊन निर्णय ठरविले जातात. हे निर्णय कायमचे व पक्के न मानतां विधान मंडळांत खुली चर्चा व विचारविनिमय होऊन उभयपक्षीं एकमेकांच्या मतास मान दिला जातो, असा समज रूढ होईल, असें वर्तन दोन्ही पक्षी इतकें प्रगटपणें झालें पाहिजे की, केवळ विधानमंडळांतच नव्हे, तर विधानमंडळाबाहेर सामान्य जनता, वृत्तपत्रें, विधानमंडळांत न जाणारे विचारवंत, या सर्वांची अशी खात्री पटली पाहिजे कीं, विधानमंडळांतील निर्णय हे केवळ बहुमताच्या अथवा अल्पमताच्या हटवादाने नव्हे, तर एकमेकांचे विचार व व्यवहार समजून घेऊन ठरविले जातात. यामुळे, ज्यांची मतें बनलेलीं नसतात, बनण्याच्या अवस्थेत असतात, त्यांची लोकशाहीनिष्ठा वाढेल. संघसरकारपासून स्थानिक स्वराज्यसंस्थांपर्यंतच्या सर्व विधानमंडळांत अशीच प्रवृत्ति सर्वत्र राहील याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाहीचा गाभा बहुमत विरुद्ध अल्पमत हा नव्हे; तें फक्त एक तंत्र अथवा बाह्य स्वरुप आहे. परस्परांच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास, परस्परांच्या मतांबद्दल आदर व विचारविनिमयांनी निर्णय ठरविण्यावर निष्ठा या गोष्टी लोकशाहीचा गाभा होत. जितक्या मानाने या गोष्टी असतील तितक्याच मानाने ती लोकशाही शुद्ध व सुरक्षित असेल.
विरोधी पक्षांनी राज्यकर्त्या पक्षास कळकळीचें सहकार्य द्यावें अशी प्रेरणा विरोधी पक्षाचे ठिकाणीं निर्माण करण्याची जबाबदारी बहुमतवाल्या पक्षावर विशेष प्रकारें असते. निव्वळ कायदे करण्यांतच नव्हे, तर लोकहिताच्या योजनांची बजावणी करण्यांतहि बहुमतवाला म्हणजे सत्ताधारी पक्ष आपलें सहकार्य घेतो, असें विरधी पक्षाला राज्यकर्त्या पक्षाने अनुभवाने शिकविलें पाहिजे. जिल्हापातळीवरच्या विकासमंडळांत निवडणुकीने सदस्य घेणार, निव्वळ सत्ताधारी पक्षाची भरती करणार नाही, असें महाराष्ट्र सरकारने ठरविल्याचें जें ऐकण्यांत आहे त्यांत धाडस मोठें असलें तरी परिणामीं ती गोष्ट हितकरच ठरेल. यामुळे सत्तेसाठी गटस्पर्धा ज्या होतात त्यांतली तीव्रता, चिडाचीड, विद्वेष, युद्धखोरी या प्रवृत्ति नाहीशा होऊन विधायक विकासकार्याबद्दलची निष्ठा वाढेल. खुद्द राज्यकर्त्या पक्षांतहि कठोर व क्रूर स्पर्धा, क्रूर कारस्थाने चालू असतात. पण मुख्यमंत्री जसा सर्व पक्षसदस्यांनी निवडायचा तसेच बाकीचे मंत्रीहि पक्षसदस्यांनी निवडायचे ठरलें व त्या त्या पातळीवरच्या लोकशाहीवर वरच्या पातळीवरच्या 'लोकशाही'ने दडपादडपी करायची नाही असें ठरलें, तर राज्यकर्त्या पक्षांतील लाथाळी नष्ट होते व त्याचा धडा विरोधी पक्षाला मिळतो. सामान्यत: असें दिसते की, फॅसिस्ट व कम्युनिस्ट यांसारखे लोकशाहीविरोधी पक्ष बलवान नसले आणि बहुमतवाल्या म्हणजेच सत्ताधारी पक्षांत अंतर्गत लोकशाही व खेळीमेळी असून विरोधी पक्षांच्या मताला मान देण्याची प्रवृत्ति असली तर विरोधी पक्षांत राज्यकर्त्या पक्षाशीं सहकार्य करण्याची प्रवृत्ति वाढती राहते. पण वर सांगितलेले लोकशाही संकेत सर्वांनीच निष्ठेने पाळले पाहिजेत. लोकशाही ही निर्मायची असते. ती त्रिकालाबाधित सहजावस्था नव्हे.