यशवंतराव चव्हाण (37)

शरदराव पुलोदचे मुख्यमंत्री होते. नागपूरच्या डिसेंबरातल्या पहिल्याच अधिवेशनात सत्ता शरदरावांच्या हाती आल्यावर इकडचे आमदार तिकडे पळापळ करून गेले. हे नेहमीचंच आहे. वसंतदादा खूप चिडलेले होते. मी त्याच वेळी राज्यपाल नियुक्त आमदार झालो. व पहिल्यांदा अधिवेशनाला आलो होतो. आमदार निवासाच्या पहिल्या विंगजवळ लिफ्टच्याजवळ वसंतदादा दुस-या माळ्यावर जाण्यासाठी उभे होते. त्यांची प्रकृती खूप खराब होती. ते आजारीच होते. शरदरावांना कळेल एवढ्या खोट्या भावनेपायी जवळून जाणारा कोणाताही आमदार दादांच्या लिफ्टजवळ थांबत नव्हता व त्यांना टाळून पुढे जात होता हे मी पाहिलं. मी दादांना लवून नमस्कार केला. लिफ्ट थांबवली. दुस-या माळ्यावर डाव्या कोप-यात दादांना दोन खोल्या दिलेल्या होत्या त्या ठिकाणी सांभाळून घेऊन गेलो. माझ्यासोबत माझा मित्र चंद्रकांत पाटील होता. पहिलंच अधिवेशन, कुणीतरी आत्मीय जवळ असावं म्हणून मी चंद्रकांतला बोलावून घेतलेलं होतं.

वसंतदादांनी आम्हांला खूप वेळ खोलीत थांबवून घेतलं. घरचं – दारचं विचारलं. रात्र खूप झाली पण दादांची बोलण्याची इच्छा होती. शालिनीताईंना माझी ओळख करून दिली. त्यांनी ओळखलं नाही किंवा त्यांना माझी माहितीच नसावी. पण दादा त्यामुळे शालिनीताईंवर थोडे रागावले. मी यशवंतरावांच्या खूप जवळ असलेला. शरदराव मुख्यमंत्री झाल्यावर मला त्यांनी आमदार केलेलं. ह सगळं असूनही दादांनी खूप आत्मीय भावनेनं त्यांचं दु:ख दोन-तीन तास आमच्याजवळ व्यक्त केलं. सगळा दरम्यानचा इतिहास सांगितला. खूप खूप हळहळ करून ते मोकळं होत राहिले. मी संबंधितांशी बोलणार नाही. त्यात कुठली मध्यस्थीही नव्हती. माझ्याशी बोलून काही काही उपयोगही नव्हता. उलट नकोच होतं, हे त्यांनाही माहीत होतं. तरीही दादा बोलले व मन मोकळं केलं. मी माझ्यापरीनं दादांची समजूत काढली व त्यांना शांत केलं.

यशवंतरावांच्यासोबत मी असताना अनेक ठिकाणी दादा होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असताना दादा माझ्या घरी आलेले होते. का कुणास ठाऊक वसंतदादा माझ्याशी खूप जिव्हाळ्यानं बांधले गेलेले होते. (माझं भाग्यच असं होतं की वसंतराव नाईक, वसंतदादा, शंकरराव चव्हाण, आणि एका घटनेनंतर बॅ. अंतुले यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं होतं. मी यशवंतराव, मी शरदराव अशा संबंधांचा राजकराणाचा कुठलाही संबंध आड न येऊ देता शंकरराव – अंतुले यांनी मला नेहमीच आत्मीयतेनं वागवलं!)

भारतीय बैठक. श्रोत्यांसमोर लहान व्यासपीठावर मी कवितेची पुस्तकं घेऊन बसलो. यशवंतरावांनी व्यासपीठावर माझ्याजवळ वसंतदादांना व त्या वेळचे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांना आग्रह करून बसविलेलं होतं. अशोक जैन यांनी पाच मिनिटांचं प्रास्ताविक केलं. वेणूताई सगळ्यांचं स्वागत करून झाल्यावरही सभागृहाच्या दरवाजाजवळच बसल्या. उशिरा येणा-या प्रत्येकाचं पुन्हा उठून त्या स्वागत करीत होत्या. यशवंतराव व कित्येक रसिक समोर बसलेले होते. ‘खेड्यातली मराठी कविता’  हा कार्यक्रम मी मनसोक्त, कुठेही ढिला न होऊ देता पावणेदोन तास श्रोत्यांना सादर केला. बहिणाबाई चौधरी, बालकवी, ग. ल. ठोकळ, ना.घ. देशपांडे, भालचंद्र लोवलेकर, बी. रघुनाथ असे अकरा कवी मी वाचले. प्रत्येक कवीचा वाड्मयीन परिचय, पाच – सहा कविता व गरज असल्यास थोडी टिप्पणी. सगळ्या श्रोत्यांनी उत्स्फूर्त, प्रचंड दाद दिली. शंभर वर्षातलं खेडं, तिथळी माणसं, जीवन, संस्कृती, सौंदर्य व दु:ख, भावभावना त्या कवितांमधून रसिकांपुढे ठेवल्या. श्रोत्यांच्या मनात त्या कोलवर घर करून राहिल्या. भालचंद्र लोवलेकर, बी. रघुनाथ, ना. घ. देशपांडे यांच्यासारख्या तिथे जमलेल्या ब-याचशा श्रोत्यांना नव्या, अनोळखी वाटणा-या कवींना मी अशा पद्धतीनं सादर केलं की आजही त्यांच्या कवितांच्या आठवणी ते लोकं दिल्लीत गेल्यावर काढतात. यशवंतरावांनी या कवींच्या कवितेचं सौंदर्य व लय ह्याची आठवण नंतर गप्पांमध्ये सतत काढली व पुन्हा पुन्हा त्या कवींविषयी विचारपूस करून माहिती करून घेतली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org