यशवंतराव चव्हाण (36)

अशोक जैन व नरेश परळीकर ह्यांना मी पत्रं लिहिली. दिल्लीतला चार-पाच दिवसांचा कार्यक्रम त्यांनी पक्का ठरविला. जागतिक कवी संमेलनासाठी माझ्या कवितांची इंग्रजी, हिंदी भाषांतरं चार महिन्यांपूर्वीच केली गेली होती. संयोजकांचं तसं पत्र आलेलं होतं. तीनमूर्ती भवनला तीन दिवस सारखं काव्यवाचन, काव्यचर्चा कवींच्या भेटीगाठीत कवितेवर टिपणं असा योजनाबद्ध सुरेख आखलेला कार्यक्रम होता. राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, उपराष्ट्रपती व्यंकटरमण उद्घाटक व प्रमुख अतिथी होते. देशातले कित्येक कवी, काव्यप्रेमी रसिक तीन दिवस कविता व कवींमध्ये पार एकरूप झालेले होते.

मी व माझी पत्नी असे मिळून आम्ही दिल्लीला गेलो होतो. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ, शिवराज पाटील, काही सचिव, पत्रकार अशा खूप जवळच्या भेटी दोन-तीन दिवसांत झाल्या. अशोक जैन, नरेश परळीकर ह्यांच्या सोबत दिल्लीतली भटकंती रात्रंदिवस चाललेली होती. साहित्य संस्था, सांस्कृतिक केंद्र अशा दिल्लीतल्या भेटीनं मी ताजातवाना झालो.

वेणूताई व यशवंतरावांनी एका सायंकाळी त्यांच्या बंगल्यावर माझ्या काव्यवाचनाचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवलेला होता. मी माझ्या एकट्याच्या कविता वाचायच्या नाहीत असं ठरविलेलं होतं. कवयित्री बहिणाबाई चौधरी जन्मशताब्दी दोन वर्षांपूर्वी साजरी केली गेली होती. शेतक-यांची कवयित्री म्हणून मी माझ्या पळसखेडला एका मोडक्या गोडाऊनचा पुनरूद्धार करून एक लहानसं सांस्कृतिक सभागृह बांधून द्यावं व त्याला बहिणाबाई चौधरी स्मारक म्हणावं असं योजिलेलं होतं. ते मी पूर्ण केलं. त्या निमित्तानं १८८० ते १९८० अशी शंभर वर्षांतली खेड्यातली मराठी कविता असा दोन तासांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम आखलेला होता. ‘खेड्यातली मराठी कविता’ असा कार्यक्रम मी कालक्रमानं सादर केला.

सायंकाळी दिल्लीतला अख्खा महाराष्ट्र प्रातिनिधिक पद्धतीनं खूप गर्दी करून जमला. जागा कमी पडली इतका. यशवंतराव व वेणूताई कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अर्धा तास दरवाजाजवळ स्वागतासाठी उभे होते. त्यांनी हात जोडून सगळ्यांचं मन:पूर्वक स्वागत केलं. लेख, साहित्यप्रेमी, पत्रकार, सचिव व खूप राजकारणी आले. वसंतदादाही आले. त्यांचं स्वागत वेणूताईंनी व यशवंतरावांनी केलं. दादा माझ्याजवळ आले. त्यांनी खिशातून दोन रेल्वेची परतीची आमची तिकिटं काढून ती मला दिली. ‘दादा तुम्ही कशाला आणलीत? यशवंत (दादांचा पी. ए.) घेऊन येणार होता ती’ – मला खूप लाज वाटली.

दादांच्या पी. ए. ला नरेशनं आमची परतीची तिकिटं करायला दिलेली होती. दादांच्याकडे आम्ही सकाळी खूप गप्पा मारल्या होत्या. पण दादा इकडे येतील हे शक्यच नव्हतं. कुणालाही ते पटत नव्हतं. निदान ज्यांना माहीत होतं त्यांना दादाचं यशवतंरावांकडे येणं फारच नवलाईचं वाटलं.

पुलोद शासनाची स्थापना झाल्यावर शरदराव मुख्यमंत्री झाले. ‘मला धोका देऊन हे झालं. त्यात यशवंतरावांचे आशीर्वाद होते’ असं दादांचं स्पष्ट मत होतं. ते बदलत नव्हतं. तेव्हापासून दादांनी यशवंतरावांशी बोलणं, फोन वगैरे तर टाळलं होतंच, पण ते यशवंतरावांना कधी भेटलेसुद्धा नाहीत. खूप मोठ्या लोकांनी समजूत काढून सलोख्याचे प्रयत्न केलेले होते. पण दादा खूप रागावलेले होते. नेहमी दूर राहिले. माझ्या काव्यवाचनासाठी दादा यशवंतरावांकडे अबोला मोडून आले व मनातली अढी पहिल्यांदाच तिथं कमी केली. एका साध्या कवीमुळे हे झालं म्हणून लोकांनी मला धन्यवाद दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org