यशवंतराव चव्हाण (33)

ते उपपंतप्रधान असताना या दीर्घ पत्रानंतर दिल्लीहून मला ६ ऑगस्ट १९७९ ला त्यांनी पत्र लिहिलं.

“स.न.वि.वि.

तुमचेपत्र मला मिळाले. माझं पत्र तुम्ही दिल्लीला येण्यास निघण्यापूर्वी मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. परंतु तुमचे आभार मानले पाहिजे. तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही दिवशी माझ्याकडे राहायला या. राजकीय परिस्थितीबाबत तुम्ही कळविलेले चित्र वस्तुनिष्ठ आहे, अनिश्चित भविष्यकाळ तत्त्वाच्या कसोटीवर काढावा लागेल.
कळावे.”

कुठल्या तरी चुकल्या क्षणाला किरकोळ काही होऊन जातं व विपरीत घडून येतं. एखादा चुकलेला भाग आयुष्यभर खिळा घेऊन बसतो. नको ते गैरसमज वाढत जातात. ते वाढीस लावण्याचं काम करणारी स्वतंत्र खास माणसं असतात. हे चालत राहणार. गोविंदराव तळवलकर- यशवंतराव; पु. ल. देशपांडे – यशवंतराव; वसंतदादा पाटील – यशवंतराव; मंगेशकर-यशवंतराव – असे आणखी पुष्कळ. या सगळ्यांशी माझे घनिष्ट कौंटुंबिक संबंध आहेत. दोघा-दोघांमध्ये कुठे कधीतरी अढी आलेली असेल. तुटलेपण आलेलं असेल पण कोणीही एक दुस-यांविषयी वाईट बोललं नाही. वाईटपण वाटू दिलं नाही. उलट एकमेकांच्या त्या त्या क्षेत्रातल्या मोठेपणासंबंधी आदर व्यक्त करताना त्यांना मी पाहिलंय्. यशवंतरावांकडे या मंडळींच्या संबंधी कधी विषय निघालाच तर ते चांगलंच बोलले. थोडी कधी कुठे कटुता आली असेल ती गंगेत सोडली. मनातली अढी काढून टाकली. संयम राखून शातंपणानं यशवंतरावांनी माणसं, त्यांचं मोठेपण जतन करण्याचा प्रयत्न केला. उथळपणा कुठेच येऊ दिला नाही. यशवंतरावांच्या सुजाण संपन्न व्यक्तिमत्त्वात ते कधी नव्हतंच. मी लिहिलेली ‘जैत रे जैत’ची सोळा गाणी व एच्. एम्. व्ही. नं नव्यानं केलेली ‘आजोळची गाणी’ श्रीमती लता मंगेशकरांनी गायिलेली होती. त्यांच्या कॅसेट्स व रेकॉर्ड्स, नवीन कवितांच्या कॅसेट्स मी यशवंतरावांकडे मुंबईला भेटीत देण्यासाठी घेऊन गेलो. यशवंतराव म्हणाले, तुमच्यावर मंगेशकर मंडळीचं खास प्रेम दिसतंय्. चांगली गोष्ट आहे.

त्यांच्याच एका कामाच्या संबंधी तुमच्याशी बोलायला मी आलोय् असं सांगितलं व मुख्य विषय सविस्तर सांगितला. संगीत, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत, गीत, भावगीत व गायकीतल्या इतिहासातले अनेकविध प्रयोग, घटना, गाणारी माणसं, त्यांचा इतिहास, रेकॉर्डिंग वगैरे जतन करून त्याची मोठ्यात मोठी लायब्ररी करावी. संगीताचं सगळं शिक्षण दिलं जावं. रेकॉर्डिंगचं अद्ययावत तंत्र व यंत्रसामुग्री व कमी किमतीत ते कलावंतांना मिळवून देण्यासाठी त्याला जोडून संगीताचं शिक्षण इत्यादी, त्याला जोडून कला-ललित कला ह्यासाठी एक ‘कला प्रकल्प’ मुंबईत करावा व त्यासाठी शक्य ते सर्व करावं अशी श्रीमती लता मंगेशकर ह्यांची इच्छा आहे. त्यांना लीजवर जागा पाहिजे. त्यासाठी चर्चा करायला मी तुमच्याकडे आलो आहे. संगीत ही प्रधान गोष्ट ठरवून ‘कला प्रकल्प’ मुंबईत वांद्र्याला कुठेतरी अर्धा एकर जागा घेऊन करायची त्यांची इच्छा आहे. नाममात्र किमतीत शासनानं जागा लवकर द्यावी. मी मुख्यमंत्री वसंतदादांशी बोललो आहे. आपण मदत करावी. लतादीदी स्वत: आठ-दहा कोटी या प्रकल्पासाठी टाकणार आहेत.

यशवंतराव म्हणाले: एकतर अद्याप महाराष्ट्रासारख्या राज्याकडून साध्या कला अकादमीला मान्यता तुम्ही अनेकदा सभागृहात मांडूनही मिळालेली नाही. त्यांना असलं काही नको असतं. एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करू, किंवा ही कल्पना प्रत्यक्षात घेऊन श्रीमती लता मंगेशकर ‘कला प्रकल्पा’ची योजना पूर्णत्वास नेणार असतील तर त्याच्याइतकी चांगली गोष्ट नाही. पण खरोखरच त्या हे करणार आहेत का?  इतर लक्षावधी माणसांनी हे काम करण्यापेक्षा लताबाईंनी करण्यात फारच महत्त्व आहे. त्याला वेगळं मोल द्यावं लागले. एवढ्या धकाधकीत लताबाईंचं आयुष्य गेलं. आता त्यांना व्याप नको असणार. तरीही त्या करताहेत असं तुम्ही म्हणता. तुम्ही सरळ, साधे कवी. त्यांच्या सहीचे कागद आधी घ्या.

मी श्रीमती लता मंगेशकरांच्या लेटर पॅडवर दोन पेजिसमध्ये ‘कला प्रकल्पा’ चा आराखडा, उद्देश सांगणार व विनंतीवजा असलेला अर्ज लता मंगेशकरांच्या सहीचा होता तो यशवंतरावांच्या समोर ठेवला. ते वाचत असतानाच त्यांच्या चेह-यावर निर्मळ आनंद स्पष्ट दिसत होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org