यशवंतराव चव्हाण (30)

श्री. ना. ग. नांदे हे विधान परिषदेचे सदस्य होते व माझी त्यांची खूपच चांगली मैत्री होती. आम्ही तसे खूप जवळ होतो. शरदराव व यशवंतरावांच्या ते अतिशय विश्वासातले होते. घनिष्ट संबंध होते. नांदे यांनी मला गाडीतून बाहेर नेलं, माझ्याशी बोलले व पुन्हा आम्ही दोघं त्या बंगल्यावर आलो.

मी शरदरावांना सोडून आय् काँग्रेसमध्ये यावं, यशवंतरावांना बरं वाटेल. जवळपास सगळे आलेले आहेत. उशिरा येऊन उपयोग नाही, तुम्ही फार विचार करू नका या कागदावर सही करा, उद्या मी जाहीर करतो. ना. ग. नांदे यांनी खूप काही मला सांगितलं त्यातला आशय असा होता. मी यशवंतरावांना भेटतो व मग सांगतो, एवढंच मी बोललो.

मी आत यशवंतरावांना भेटायला गेलो. ते म्हणाले, “नामदेवराव, आज भेटू नका. मी फार गडबडीत आहे.”

“आजच मला तुम्हांला भेटायचं आहे.” मी आग्रह धरला. दोघं- तिघं तिथे होते ते बाहेर गेले.

“तुमच्यासाठी मी आय् काँग्रेसमध्ये यावं असं लोक म्हणताहेत, ना. ग. नांदेसुद्धा बोलले. मी शरदरावांसोबतच राहावं असं मला वाटतं. यशवंतराव फारच अबोल व सुन्नपणानं बसले होते त्यांचा थोडाही ब-यापैकी मूड नव्हता. तरीही ते माझ्याशी बोलले:

“बाकीच्यांचं ठीक आहे. रोज आमदार, खासदार, कार्यकर्ते येताहेत. काहीतरी भूमिका मांडताहेत. शरदराव, शरदरावांचं पाहून घेतील. त्यांचीही अवस्था फार वाईट आहे. माझी थोडीही काळजी करण्याचं कारण नाही. निदान तुम्ही तरी करू नये. आयुष्यात मला खूप काही मिळालं. मी खूप काही पाहिलं, भोगलं. आता कशासाठी काय करायचं याचा हिशेब व गणित लावू नये. ते व्यर्थ आहे. माझ्या मनाच्या अडचणी फार भिन्न आहेत. सगळं सांगणं कठीण आहे व कारणही नाही. आयुष्यभर मी काँग्रेसमध्ये राहिलो. यापुढेही मुख्य प्रवाहात राहावं. बाहेरचे कोणीही काही करून देश व राज्य नीट चालवू शकत नाहीत. त्यांना खूप मर्यादा आहेत. मी इतरांमध्ये कोंडल्यासारखा होण्यापेक्षा इथे कसाही चांगला आहे. मला आता काही एक मिळवायचं राहिलेलं नाही.

तुम्ही शरदरावांना सोडून इकडे आलात तर काही राजकीय स्वार्थासाठी, मतलबासाठी आलात असा अर्थ होईल. तुमच्याबाबत असं मत होऊ नये. तुमच्यावर तसं कोणी लिहू नये. तुम्ही आहात त्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीनं राहा. काम करा. तुम्हांला फरक पडणार नाही. कविता ही तुमची खरी शक्ती आहे. राजकारण नव्हे. एका मर्यादेपलीकडे तुम्हांला ते मानवणारंही नाही. मला उलट तुम्ही तिथे राहण्यातच आनंद वाटेल. शरदरावांनाही तुम्ही एकटेपणी त्यांच्यासोबत असल्यानं बरं वाटेल कुणाचं ऐकू नका. मी सांगतो तसं करा.”

मी यशवंतरावांचं हे खरंखुरं प्रामाणिक मत ऐकून चकित झलो. मला त्याआधी त्यांच्या नावावर माझ्या विश्वासातल्या व जवळच्या आमदार – खासदारांनी, कार्यकर्त्यांनी मी यशवंतराव चव्हाण काँग्रेस आय – ‘मध्ये आल्यावर त्यांच्यासोबत त्यांची शक्ती वाढवायला न येता शरदरावांबरोबरच राहतो आहे, यामुळे यशवंतराव माझ्यावर खूप नाराज आहेत, असं ठासून ठोकलेलं होतं. ते संपूर्ण खोटं होतं.

शरदरावांची सत्ता गेल्यावर रोज सगळे त्यांना सोडून चालल्यावर मी त्यांना एक सविस्तर आंतरदेशीय पत्र लिहिलं होतं. आताचे आठ आमदारही गेले तरी फक्त मी व प्रतिभावहिनी तुमच्यासोबत असू. कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये त्या पत्राचं वाचन झालं होतं. असं मला कोणी तरी नंतर सांगितलं.

शरदरावांसोबत पक्कं राहायचं या माझ्या मनात मी कधीच बदल केला नव्हता. एका माजी मुख्यमंत्र्यांनं बरंच सत्तेचं आमिषही मला हस्ते-परहस्ते व स्वत:ही दाखविलेलं होतं. तरीही मी माझ्या भूमिकेशी अगोदरपासूनच पक्का होतो. यशवतंरावांनी जेव्हा मला खरं ते सांगितलं तेव्हा माझ्या पक्क्या विचारांचंच मला खूप बरं वाटलं. समाधान वाटलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org