यशवंतराव चव्हाण (29)

त्याच वेळी भंडा-याचे कलेक्टर व पोलिस अधिकारी धावाधाव करीत आले. त्यांच्यासोबत शरदराव होते. नागपूर भंडा-याहून बरेच लोक गर्दी करून झुंबडीनं आलेले होते. सगळ्यांना थोपविणं कठीण होत होतं. कलेक्टर काहीतरी कळवळून सांगत होते. पण त्यांचं म्हणणं आम्हाला नीट समजत नव्हतं.

“साहेब, आम्ही तुम्हांला अटक केलेलीच नाही.” कलेक्टर कळवळून बोलले. यशवंतराव म्हणाले:

“असं कसं? कागदपत्रांवर सह्या घेतल्यात. आम्ही लिहून दिलं. मला इथे आणलं. वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी सगळं अटकसत्राचं प्रसिद्धीला दिलं. तुम्हांला नेमकं काय म्हणायचं आहे तेच कळत नाही.”

“साहेब, सगळ्यांना अटक केली हे खरं आहे, पण चांदूर रेल्वेला तुम्हाला आम्ही अटक केलीच नाही.”- पुन्हा कलेक्टर. मग शरदरावांनी खुलासा केला.

“पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिल्लीला पार्लमेंटमध्ये व प्रेसला खासदार यशवंतराव चव्हाण यांना अटक केलीच नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे. तसं नागपूरला मुख्यमंत्री व संबंधितांना कळविलं आहे. लगेच नागपूरला जाऊन तुम्हांला दिल्लीला त्वरित विमानानं बोलविलं आहे.”

यशवंतरावांना नागपूरला घेऊन जायला गाडी आलेली होती. ते गाडीत बसायला लागले तेव्हा, त्यांच्या औषधी - गोळ्या मी त्यांच्याजवळ दिल्या. ‘रस्ता फार खराब आहे, मी नागपूरपर्यंत येऊ का’ असं त्यांना म्हणालो. तेव्हा यशवंतराव माझ्याकडे पाहून मंद हसले, “मला अटक केलेली नाही असं ते म्हणातहेत. तुमच्यासाठी इथून हलायला मोकळीक नाही. तर मी एकटाच निघतो.”

त्या दोन दिवसांत यशवंतरावांसाठी मला व्यक्तिगत खूप करता आलं याचं समाधान वाटलं. नंतर अटक केलेल्या दिंडीतल्या सगळ्यांना बोंबलत चांदूर रेल्वे या मूळ अटक केलेल्या प्रदेशात घेऊन जाण्यात आलं. दिंडीच्या बाजूनं कोर्टात निकाल लागला होता.

एस. एम. जोशी यांच्या हातून शेतक-यांच्या मागण्यांचा खलिता दिंडीतल्या शेतक-यांनी, शरदरावांनी नागपूरला विधान भवनावर लावला. दिंडीची सांगता झाली.

शरदराव मुख्यमंत्री असलेलं पुलोदचं सरकार केंद्रानं रद्दबातल केलं. लगेचच सत्ता ज्याच्या हाती आहे तिकडे लोक नेहमीप्रमाणे भराभर गेले. विधानसभेत विधान परिषदेचे आमदार हळूहळू दुसरीकडे गेले. यात नवीन काहीच नव्हतं. राजकारणातले अलीकडचे दिवसच तसे आहेत. त्यावर वेगळं बोलायचं कारण नाही. शरदराव यांची होईल तेवढी कुतरओढ करण्याची संधी अनेकांनी घेतली. शरदरावांना सोडून जाताना पुष्कळदा ‘यशवंतराव आता स्वगृही जातात म्हणून आम्ही जात आहोत, यशवतंरावांचं मोठेपण आपण टिकवलं पाहिजे व त्यांना भक्कम पाठिंबा पाहिजे म्हणून जात आहोत’ अशी भाषणं सुरू झाली होती. शरदरावांचे अत्यंत जवळचे, विश्वासातले सगळे ते पुन्हा सत्ता येताच ‘काँग्रेस आय’ मध्ये गेले. फक्त आठ आमदार त्यांच्या जवळ राहिले. सातारला त्या वेळी फार मोठी मीटिंग् करून आले तेव्हा मी बारामती कृषी प्रतिष्ठानवर माझ्या खाजगी कामासाठी आलो होतो. त्यांना कळल्यावर ते तिथे आले. श्री. प्रतापराव भोसले त्यांच्यासोबत होते. तेसुद्धा लगेच निघून गेले. श्री. आप्पासाहेब पवार, शरदराव व आम्ही दोघं-तिघं तेवढे तिथं दोन-तीन तास थांबलो. पाच वाजता शरदराव मला घेऊन पुण्याला आले. यशवंतरावांचे पुतणे पुण्याला राहतात त्या टेकडीजवळच्या बंगल्यावर यशवंतरावांना शरदराव व मी भेटलो. बाहेर दोन-तीनशे कार्यकर्ते उगाचच फार गंभीर होते. शरदराव, प्रतापराव, यशवंतराव खूप वेळ आत बोलत बसलेले होते. मी बाहेर थांबलो होतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org