यशवंतराव चव्हाण (27)

एकदा सहज बोलले :

“माझे बंधू अकाली गेले. त्यांच्या मुलांचं, कुटुंबाचं मीही शक्य ते केलं. त्यांच्या अडचणी होत्या. त्यांना मदत केली. वेणूताईंनीही त्यांच्यासाठी जीव टाकला. त्यांच्या संसाराचा आम्हांलाही ध्यास होता घरचं हे असं चालतच राहणार. ते व्यवस्थित ठिकाणावर येत राहतं. त्यात तुम्ही अधिक गुंतल्यानं साहित्याकडे खूप दुर्लक्ष करीत आहात. विशेषत: विधान परिषदेतल्या कामकाजात थोडीही कुचराई नको. खूप काम करायला त्या ठिकाणी वाव आहे, महाराष्ट्रात, देशात त्यासाठी फिरायला, काम करायला तुम्हांला वाव आहे. तुमच्यासारख्याला खूप नवीन पाहता येईल, ऐकता येईल. या दालनात तुम्ही अधिक बहुश्रुत होता. समृद्ध होता. नवीन प्रदेश पाहण्याची संधी आमदाराला खूप असते. तुमच्यासारख्यानं हे खूप पाहावं, पचवावं. त्यात सतत सहभागी असावं. भैरवीचे सूर कमी करा. आता आनंदभैरवीचे सूर पाहिजेत.”

७ डिसेंबर १९८० चा दिवस. श्री. शरदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी निघाली होती. त्या वेळी शेतीचे प्रश्न एकाएक खूप अंगावर आले होते. दररोज जवळपास पंधरा किलोमीटर चालत जायचं. पुढे मुक्काम करायचा. खेड्यातल्या लोकांशी चर्चा करून, सभासंमेलनं करून शेतीचे प्रश्न सांगत राहायचे. सुरूवातीला पाच-दहा हजार शेतकरी दिंडीत असायचे. अकोला, अमरावतीपर्यंत सभेच्या ठिकाणी लाखाच्या पुढे लोक एकत्र येत. प्रचंड स्वागत करीत असत. दिल्लीत भजनं, भारूडं, गीतरचना, प्रास्ताविक इत्यादी सभेच्या सुरूवातीला करून सभा यशस्वी करण्याचं माझ्याकडे सोपविलेलं होतं. माझ्या खेड्यातली चौतीस मुलं माझ्यासोबत शेतकरी कलापथकात होती. शेतकरी समाज पार मोडून गेलेला होता. विस्कटलेला होता. शेतीत दुष्काळ, त्यातच एका रात्रीत खतांच्या खूप किमती वाढवलेल्या होत्या. बियाणं चांगलं मिळत नव्हतं. त्यामुळे शेतकरी दिंडीचं शेतक-यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, बापू काळदाते, देवालाल, कर्पूरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, यशवंतराव चव्हाण, ए. पी. वर्धन असे देशातेल कितीतरी ज्येष्ठ नेते, शेतकरी दिंडीत असायचे. अमरावतीला दिंडी आली तेव्हा स्वागताला दीड लाखापेक्षा अधिक लोक होते. दुस-या दिवशी जॉर्ज फर्नाडिस पायी चालले व त्यांनी मार्गदर्शन केलं. सायंकाळी यशवतंराव चव्हाण मुक्कामाला अमरावतीला येणार होते व दिंडीत सामील होणार होते. आदल्या दिवशी रात्री पुन्हा नागपूरला रातोरात मला बोलावण्यात आलं म्हणून मी शरदरावांकडे जाऊन आलो. कुठे अटक झाली व दिंडी अडविली तरी विधान भवनावर खलिता घेऊन दिंडीकरी पोहोचले पाहिजेत. श्री. अरूण मेहता व मी त्याची आखणी करण्यासाठी लोकमत कचेरीजवळ डॉ. कोलवाडकरांच्या घरात गुप्तपणे योजना आखीत होतो. भल्या पहाटे पुन्हा शरदराव, कॉ. सुदाम देशमुख व ग. प्र. प्रधान असे घाईघाईत नागपुरहून एका गाडीत निघून अमरावतीला दिल्लीकडे सामील व्हायला निघालो. रस्त्यात बरीच व्यूहरचना केली गेली. शरदरावांवर खूप पाळत होती. परंतु त्यांनी आपली मुख्य गाडी रेस्ट हाऊसच्या समोर ठेवून मागच्या बाजूनं अंधारात जीप घेऊन स्वत: चालवून तिस-याच ठिकाणावरून देशभर फोनाफोनी करून व आडाखे आखून शरदराव पोलिस अधिकारी व मुख्यमंत्र्यांची प्रचंड फिरवाफिरव करीत नाकीनऊ आणत होते. इतर कोणालाही इतकं शक्यच नाही. पोहराबंदी जोगलं ते चांदूर रेल्वे अशा दिंडीच्या दिवशी यशवंतराव दिंडीत सामील झाले. धसकटांच्या शेतामधून शेतक-यांचा जयघोष करीत अमर शेखचं क्रांतीचं गाणं शेतकरी दिंडी निघाली. आदिवासी बंजारा समाजानं नृत्य, गाणं म्हणून उत्स्फूर्त स्वागत केलं. सगळं पाहून यशवतंराव उल्हासित झाले. आम्ही त्यांना चालताना दिंडीतल्या मागच्या दिवसांचा वृत्तांत सांगू लागलो. सर्वश्री. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, अरूण मेहता, राजारामबापू पाटील असे आम्ही दिंडीतले कायमचे रोजचे वारकरी त्यांच्यासोबत होतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org