यशवंतराव चव्हाण (26)

‘विरंगुळा’ वर रात्री नऊ वाजेपर्यंत ते सगळ्यांशी बोलले. नंतर भेटी बंद केल्या. यशवंतराव, वेणूताई, त्यांचा आवडता डॉक्टर पुतण्या (जो नंतर अपघातात वारला) व सूनबाई असे रात्री जेवणाच्या टेबलावर बसलो. पुन्हा इथे राजकराणातले दिवसभरातले यशवंतराव कुठेच नव्हते. अगदी कौटुंबिक घरातले यशवंतराव. वेणूताई टेबलावर आम्हांला वाढत होत्या.

“आज वेणूताईंनी तुमच्यासाठी खास पाहूणचार केला आहे.” डॉक्टर व मी टेबलावर गप्पा मारीत बसलो होतो. जेवण वाढून झाल्यावर माझी चाळवाचाळव सुरू झाली. “ मी भात, चटणी व थोडी चपाती घेतो. हे बाकी चिकन वगैरे काढून घ्या.”

वेणूताईंनी खूप मेहनत घेऊन नॉनव्हेज केलेलं होतं. पण मी कधीच ते खाल्लेलं नव्हतं. मला चालत नव्हतं. सगळेच थोडे नाराज झाले. यशवंतरावांनी जेवणापूर्वी औषधी, गोळ्या घेतल्या होत्या. ते जेवायचे थांबले. डॉक्टर व सूनबाई थांबले. वेणूताईंनी ताबडतोब हिरव्या वाटाण्याची भाजी व एकदोन पालेभाज्या तयार केल्या. मग आम्ही सगळे बरोबर जेवलो. यशवंतरावांना खूप विनंती करूनही ते जेवले नाहीत. वीस मिनिटं थांबले. आमच्यासोबत जेवले. थोडंसंच नॉनव्हेज घेतलं. मग मटार व हिरव्या भाज्या चवीनं त्यांच्या ताटात घेतल्या व जेवले. मग सगळेच आम्ही या प्रकाराला खूप मनापासून हसलो. व्हिजिटेरियन कवीसुद्धा कसा त्रास देतो पहा असं ते सहज बोलून गेले. आमचं हे सगळं मनसोक्त गप्पागोष्टींमध्ये चाललेलं होतं. खूप नवे विषय डॉक्टर व मी त्यांच्यासोबत बोलत राहिलो. त्यांनाही दिवसभराचा थकवा असून तजेला वाटला. यशवंतरावांच्या मनाच्या तळात किती गूढ कसरती व त्रासाचं सगळं चाललेलं होतं हे मी जवळून पाहिलं. त्यांच्या कसरतींच्या, वेदनांच्या संदर्भात आपलं कुठेच काही नाही तरीही आपण खूप स्वत:ला मोडून टाकतो व कोंडूनही घेतो. एवढ्या अडी-अडचणीत, राजकीय गुंतागुंतीच्या त्यांच्या वाईट काळात ते खिन्न होतात पण पुन्हा मनाची नवी उभारणी करतात, लोकांशी बोलतात व नवा विचार मांडतात. मी तीन- चार दिवस जवळून सगळं पाहत होतो. ‘विरंगुळा’तल्या या दीर्घ मुक्कामात यशवतंरावांबद्दल खूप नवी माहिती मला मिळाली. त्या प्रदेशातल्या त्यांच्या जवळच्या मंडळींकडून भेटती अनेक खाजगी घटना मी ऐकल्या. त्या मला नवीन होत्या. श्री. कोतलवा, श्री. बाबूराव काळे, श्री. संभाजी बाबा थोरात अशी कितीतरी मंडळी जिव्हाळ्यानं सगळं सागंत होती. देवराष्ट्र- सागरेश्वरापासून विठाईच्या व यशवंतरावांच्या वडिलांच्या दारूण दु:खांचं, भावंडांच्या अकाली मृत्यूचं, स्वातंत्र्य-चळवळीत झोकून दिलेल्या तारूण्याचं सगळं काही ऐकत होतो. तिथले माझे तीन-चार दिवस मला खूप काही देऊन गेले.

शतीव्यवसायात पाऊसपाणी व अनिश्चित उत्पन्न दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. उत्पन्नाच्या मानानं खर्च वाढत चाललेला आहे. बहुसंख्य लोक शेतीपासून दूर चाललेले आहेत. मी या काळात उलटा अधिक शेतीकडे झुकलो आहे. विहिरी केल्या, पाणी संपलं. पुन्हा खोदल्या. रूंद केल्या. पाईपलाईन, नवीन यंत्रसामुग्री करताना कर्ज वाढलं; पण त्याशिवाय मार्ग नव्हता. पीकपद्धतीत परिवर्तन केलं. श्री. शरदराव पवार, त्यांचं कृषी प्रतिष्ठान, त्यांच्यासोबत देशात फिरताना नवी दृष्टी आली व शेतीत नवीन योजना घेऊन मी पुन्हा उभा राहण्यासाठी तयार झालो. सभागृहात स्वत:पुरतं न बोलता महाराष्ट्रातल्या पाणी-योजना, शेती, अर्थव्यवस्था, त्यासाठीचे निर्णय शासनानं घ्यावेत म्हणून सतत बोलत राहिलो. ठराव मांडत राहिलो. वृत्तपत्रातून सतत त्यावर लिहीत गेलो. या सगळ्या गोष्टींच्या मागे यशवंतरावांची मुख्य प्रेरणा होती. त्यांचा व्याप कितीही असो, ते मला आठवणीनं वेगवेगळ्या पद्धतीनं शक्ती देत राहिले.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org