यशवंतराव चव्हाण (23)

क-हाडच्या साहित्य सम्मेलनातून जी शिल्लक रक्कम राहिली होती. तिच्या व्याजातून दरवर्षी एका चांगल्या पुस्तकासाठी ‘क-हाड पुरस्कार’ द्यावा. त्या पारितोषिक मिळालेल्या पुस्तकाच्या वाड्मय प्रकारासंबंधी पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी दीर्घ चर्चा व्हावी, त्या साहित्यिकाचा सन्मान चांगल्या पद्धतीनं करून मानचिन्ह व पाच हजार रूपये रोख असा आग्रह असावा. त्या वेळी साहित्य अकादमीच्या पुरस्काराची रक्कम तेवढीच होती. असं पारितोषिकाचं स्वरूप खूप मेहनतीनं आखणी करून यशवंतरावांनी केलं. तीन सदस्यांची समिती नेमली व त्या समितीचा निर्णय जो राहील त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही, असा निर्णय घेतला. व्यंकटेश माडगूळकर, म. द. हातकणंगलेकर, गो. मा. पवार अशी पहिली समिती नेमली. त्यांनी पहिल्या वर्षीचं पारितोषिक ‘कवितेनंतरच्या कविता’ ह्या दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांच्या काव्यसंग्रहाला दिलेलं होतं. दिलीप चित्रे यांचा हा काव्यसंग्रह भालचंद्र नेमाडे व मित्रमंडळींच्या ‘वाचा’ प्रकाशनानं प्रकाशित केलेला होता. श्री. दिलीप चित्रे पारितोषिक स्वीकारायला क-हाडला आले. प्रकाशक नेमाडे आला नाही. त्यानं चंद्रकांत पाटीलला ‘वाचा’ प्रकाशनाचा प्रतिनिधी म्हणून पाठविलं. मला क-हाड साहित्य सम्मेलनासारखंच यशवंतरावांचं व्यक्तिगत आग्रहाचं निमंत्रण होतं म्हणून मी क-हाडला गेलो होतो.

अतिशय आतिथ्यशील यशवंतराव सगळ्यांच्या स्वागताला उभे होते. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पहिल्या ‘क-हाड पुरस्काराचा’ अतिशय सुंदर देखणा गौरवसमारंभ झाला. यशवंतराव चव्हाण, दिलीप चित्रे, चंद्रकांत पाटील हे तिघं कवितेवर खूप चांगलं, मोजकं व अभ्यासपूर्ण बोलले. कवितेवरची अशी भाषणं क्वचितच ऐकायला मिळतात. सतत दिल्लीहून महत्त्वाचे फोन येत होते. खूप व्याप व अडचणी दिल्लीत असाव्यात. परंतु क-हाड पुरस्काराला लेखकांच्या स्वागताला काही झालं तरी आपण स्वत: हजर राहावं असं पक्क ठरवून यशवंतराव आलेले होते. दिलीप चित्रेनं त्याच्या कविता वाचल्या. दिलीपची कविता तशी अवघड, पण दिलीपनं तिथं वाचण्यासाठी ज्या कवितांची निवड केली होती त्या तिथल्या श्रोत्यांना विलक्षण भावल्या. पारितोषिक समितीचे सदस्य बोलले. दिलीप चित्रे ह्यांच्या कवितेवर बोलण्यासाठी मुद्दाम पुण्याहून एका प्राध्यापकाला आणण्यात आलं होतं. समारंभाच्या वेळी हे प्राध्यापक यशवंतरावांसमोर लोकांमध्ये बसलेले होते. रात्री काव्यवाचनानंतर साहित्यावर पुन्हा खूप चर्चा झाली. त्या चर्चेत साहित्याची जाण, त्याचबरोबर पुष्कळच नवीन पुस्तकं यशवंतरावांनी वाचलेली होती हे स्पष्ट दिसत होतं. रात्रीच्या चर्चेत पुण्याच्या प्राध्यापकानं तुकाराम व रामदास अशी तुलना करताना रामदास तुकारामापेक्षा श्रेष्ठ कवी होता असं काहीसं मांडलेलं होतं. चर्चा खूप वेळ चालली. चर्चेत दिलीप चित्रेही होताच. तुकाराम त्याच्या खास अभ्यासाचा विषय होता. त्यावर त्यानं बरंच लिहिलेलं होतं, तुकारामाची इंग्रजी भाषांतरं केलेली होती. रात्री उशिरा चर्चा-गप्पा संपल्यावर मी आणि चंद्रकांत यशवंतरावांच्या घरी थोडा वेळ गेलो होतो. साहित्य चळवळीवर व नव्या लिहिणा-या लेखकांच्या संबंधात यशवंतराव बोलले. वाडमयीन मासिक व अनियतकालिकासंबंधी चर्चा केली. चंद्रकांतनं लघुनियतकालिकांचा सगळा मोठा पसारा व कार्य समोर मांडलं तेव्हा यशवंतरावांना आश्चर्य वाटलं. लघुनियतकालिकांमधूनच मोठं साहित्य व साहित्यिक उद्याला आले हे आपल्याला माहीत नाही असं प्रामाणिकपणानं सांगितलं व आणखी त्यासंबंधात विचारपूस केली व या कार्यक्रमाला मुंबईहून भाऊ पाध्येही आलेला होता. भाऊबद्दलही त्यानं यशवंतरावांना सांगितलं. चंद्रकांतचं इंग्रजी-हिंदी वाचन खूप होतं हे त्यांना जाणवलं. चंद्रकांत सायन्सचा प्राध्यापक, मराठीचे पुष्कळ प्राध्यापक आपल्याला ते वाचण्याची गरज नाही असंच समजून असतात असं यशवंतराव हसून म्हणाले. यशवंतरावांनी पुण्याच्या प्राध्यापकांत मत, ते आपल्याकडे पाहुणे म्हणून मुद्दाम बोलविलेले आहेत म्हणून, संपूर्ण खोडून काढलं नाही. यशवंतराव म्हणाले, तुकाराम व रामदास ह्यांची तुलनाच चुकीची आहे. रामदास निश्चितच मोठा आहे, परंतु जीवनाच्या सर्वसामान्य अंगाला स्पर्श करून, लोकजीवनातल्या सर्व थरांना कवटाळून तुकाराम त्याच्या साध्या, सोप्या अभंगांनी लोकांना, समाजाला जास्त जवळचा आहे. त्यांना लोकांमध्ये मला दुखवायचं नव्हतं. म्हणून मी तुमचं मतही तसं पुष्कळ बरोबर आहे असं सांगितलं. हे सामंजस्य, न दुखवण्याचं कौशल्य, नीती यशवंतरावांजवळ होती. ते तिचं सर्वच वेळी सर्वांसाठी व्यवस्थित पालन करीत असत.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org