यशवंतराव चव्हाण (19)

“नाही. मंजूर केलेलं छोटं धरण वीस वर्षांत झालेलं नाही.”

“विहिरीचं पाणी, पिण्याचं पाणी कुठून आणता?”

“उन्हाळ्यात फार दूरवर जाऊन शेतातल्या विहिरीतून.”

“शाळा, दवाखाना?”

“मराठी चौथीपर्यंत शाळा आहे. त्या तीन खोल्या दिसताहेत ना, तीच. दवाखाना पंधरा किलोमीटरच्या पलीकडे.”

“विहिरीचं पाणी, पीक कोणतं?”

“इथे काय येऊ शकेल? फारच कठीण आहे. कच्च्या विहिरी आहेत. एका वर्षी पीक येतं, दोन-तीन वर्षे दुष्काळी जातात.”

“कर्ज वेळेवर मिळतं का? त्यात भागतं का? मला तर ही माणसं फारच गरीब, गांजलेली दिसताहेत.”

“दहावीस एकरावालाही इथे मजुरी करतो. बाहेरगावी जातो. कर्जाची जप्ती व बेअब्रू दरवर्षी चालते. ब-यापैकी शेती करणा-या त्या माळीबुवांची पलीकडच्या घरावरली पत्रं भूविकास बँकेनं भर पावसाळ्यात काढून नेली. जप्ती आणली.”

मी ते शेजारचं घर यशवंतरावांना व वसंतदादांना दाखविलं. यशवंतराव, दादा गच्चीवरून गावाचं हे भेसूर वर्णन ऐकताना अवाक् झाले.

कुठला ग्रामीण विकास?
कुठल्या शेतक-यांचं राज्य?
आपण स्वातंत्र्यानंतर कोणासाठी अन् काय केलं?

दादा व यशवंतराव पायाला खाली चटके लागत होते; तरीही उभं राहून पाहत होते. विचारत होते.

दादा, यशवंतराव गच्चीवरून घरात येऊन बसले. समोर बसलेल्या सुंदरराव सोळुंके, नरेंद्र तिडके, बाबुराव काळे आणखी कितीतरी सत्तेच्या नेतेमंडळींना खेड्यातल्या ह्या भेसूर, भयानक उदासवाणेपणासंबंधी गांभीर्यानं बोलू लागले. खिन्न झाले.

बाबांच्या प्रतिमेला यशवंतरावांनी व दादांनी पुष्पहार घातला. बाबांच्या काही अस्थी राखून ठेवल्या होत्या. त्यांची पूजा त्यांनी केली. घरामागच्या पांढरीच्या शेतात त्या ठेवल्या गेल्या. दुपारी जेवणानंतर यशवंतराव घरात चौफेर फिरत राहिले. माझ्या खेडेगावात त्या वेळी एकही संडास नव्हता. नीट बाथरूम नव्हती. टीनच्या पत्र्याच्या घरात त्यांनी जेवण घेतलं होतं. सारवल्या जमिनीवर बसले. फ्रीज, संडास, बाथरूम, पंखा, टेबल-खुर्ची काहीच नव्हतं. सुखाच्या कोणत्याही वस्तू घरात नव्हत्या. तशी माझी परिस्थितीच नव्हती. त्यांनी ते सगळं स्वीकारलं व दिवसभर थांबले. ते तासभर फार तर थांबतील असं सगळ्यांनाच वाटायचं. दुपारी घरभर फिरताना एकाच गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. अनेक ठिकाणी नंतर त्यांनी बाहेर त्या गोष्टीचा गौरवानं उल्लेख केला. माझ्या घरात बाकी काही सुखसोयी मला करता आल्या नाहीत पण निवडक महत्त्वाच्या मराठी ग्रंथांचं मोठं भांडार त्यांना घरात दिसलं. खूप पुस्तकं त्यांनी चाळून काढली. एवढ्या परिस्थितीत पंचवीस-तीस हजार रूपयांची चांगली ग्रंथसंपदा त्यांना आनंद देऊन गेली. त्याचं त्यांना खूप समाधान वाटलं. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आम्ही सगळी भावंडं मोठे झालो. यशवंतरावांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या विचारानं, धाकानं अजून एकत्र नांदतो आहोत. बाबांच्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हांला सर्वतोपरीनं कौटुंबिक आधार दिला. इतरत्रसुद्धा खूप मदत केली. प्रतिष्ठा मिळवून दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org