यशवंतराव चव्हाण (18)

बाबांच्या मृत्यूचं पत्र यशवंतरावांकडे गेलं. यशवंतरावांनी स्वत:च्या हस्ताक्षरात एकापाठोपाठ एक अशी दोन पत्रं पाठविली. २७-७-१९७७ ला लिहिलेलं पहिलं पत्र.

“प्रिय नामदेवराव यांसी स.न.वि.वि.

बाबा गेल्याचे दु:खदायक वृत्त देणारे तुमचे पत्र आताच हाती आले. बद्रीनारायणाच्या यात्रेस जाताना ते भेटले किती जिव्हाळ्याने! प्रकृतीही उत्तम दिसली. शेवट इतक्या नजीक असावा अशी पुसटही शंका कुणाच्याच मनाला शिवलीही नसेल.

तुमचे दु:ख अपरिमित आहे. भावंडांचे व दोन्ही आयांचे सांत्वन शब्दांनी कसे करणार. पत्र वाचल्यापासून मीही अस्वस्थ आहे. १ तारखेला येऊ शकणार नाही. त्यामुळे तर आणखीनच बेचैन आहे. पण पार्लमेंटचे सेशन संपल्यावर तुमचे घरी येऊन भेटेन. तुमच्या या घोर कौटुंबिक दु:खात मी सहभागी आहे. मृतात्म्यास शांती प्रार्थितो.”

९ ऑगस्ट १९७७ ला यशवंतरावांचं पुन्हा पत्र आलं.

“प्रिय नामदेवराव,

माझे यापूर्वीचे पत्र तुम्हाला मिळाले असेलच. पळसखेड्याला येण्याचा कार्यक्रम मी नक्की केला आहे. २० ऑगस्ट रोजी मी येथून निघून औरंगाबादला येणार आहे. १० वाजता मी तिथे पोहोचत आहे. त्यानंतर तिथून मोटारीने निघून ११-३०, १२ पर्यंत पळसखेडे येथे पोहोचेन. तुमच्या घरी येऊन तुम्हांला व तुमच्या कुटुंबीयांना भेटणे हाच माझा औरंगाबादला येण्याचा उद्देश आहे. ५ वाजेपर्यंत मी औरंगाबादला परत पोहोचेन. नित्याप्रमाणे ५ नंतर काही कार्यक्रम स्वीकारणे अपरिहार्य आहे. २० तारखेला तुम्ही घरी असावे म्हणून हे पत्र लिहीत आहे.”

२० ऑगस्ट ७७ ला यशवंतराव पळसखेडला आले. सोबत मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील दहावीस मंत्री, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खूपच खूप मोठी पुढारी मंडळी होती. यशवंतराव औरंगाबाद विमानतळावरून सरळ कुठेही न जाता पळसखेडला ११ वाजता वसंतदादांसमवेत आले. सकाळी अकरापासून दुपारी चार वाजेपर्यंत माझ्या घरी थांबले. दोघी आयांना व भावंडांना घरात खूप वेळ घेऊन बसले. त्यांना खूप समजावलं. त्यांच्याशी बोलताना, माझ्याशी बोलताना त्यांना खूप कठीण गेलं. दोनदा त्यांनी स्वत:ला सावरूनही त्यांच्या डोळ्यांतून पाणी ओघळलं. मला त्यांच्याशी बोलणंच शक्य नव्हतं. मी फक्त रडत राहिलो होतो. वसंतदादा, यशवंतराव खूप वेळ घरात बोलले. तिथेच आमच्यासोबत साधं जेवण घेतलं. औरंगाबादेला व सर्वत्र यशवंतरावांनी आधीच कळविलेलं होतं. मी व्यक्तिगत दु:खासाठी जाणार आहे. त्या रस्त्यावर व पळसखेडला कुठेही कमानी, हारतुरे, स्वागत, छायाचित्रं मला अजिबात नको आहे. त्याची काळजी घ्या. त्याप्रमाणे सगळ्यांनी पाळलं होतं. तरीही माझ्या घरासमोर हजार – दीड हजार लोक बसलेले यशवंतरावांनी पाहिले. नाइलाजानं सभा झाली. वसंतदादा बोलले, यशवंतराव बोलले. माझ्यासंबंधी व माझ्या कवितेसंबंधी जे बोलायचं ते बोलले. बाबांच्या दिल्लीतल्या भेटीसंबंधात बोलले. “तुम्ही नामदेवराव व त्यांची कविता यांची जपणूक करा. त्यांचं नुस्तं कुटुंब नव्हे तर सगळं गाव ते सांभाळीतल. बाबा गेल्याचं दु:ख विसरणं त्यांना शक्य नाही. पण आपण सगळे मिळून ते हलकं करण्याचा प्रयत्न करू. त्यांना आधार देऊ.” आख्खं खेडं बाया-माणसांसकट समोर होतं. आजूबाजूच्या गावांचे लोक होते. यशवंतराव पंधरावीस मिनिटं आत्मीय भावनेनं खूप खूप बोलून गेले. विश्वास ठेवावा की ठेऊ नये, पण समक्ष सगळे पाहताहेत, ऐकताहेत. एखाद्या कवीसाठी यशवंतराव एवढा जीव टाकू शकतात?

दुपारी दोनच्या सुमारास माझ्या घराच्या गच्चीवर यशवंतराव उभे राहिले व पळसखेडची चौफेर पाहणी करू लागले. त्यांच्या पायांत चप्पल नव्हती, चटके बसत होते. पण ते तसेच थांबले. मोडकळीस आलेली घरं, तुटलेले खांब, भिंती, नवीन बांधकाम नाही. उदासवाणं स्वातंत्र्यातलं खेडं पाहून, त्याची अवकळा पाहून ते खिन्न झाले. काही प्रश्न विचारले, “हलकी बरड जमीन आहे. कुठे धरणपाट आहेत का?”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org