यशवंतराव चव्हाण (15)

यशवंतरावांच्या डोळ्यांत पाणी आलं. ते थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. सुन्न झाले. मला पुन्हा उभारी दिली. आधार दिला. “हे संसारात चालतच राहणार. मी मदत करीन, काळजी करू नका. सगळ्या कुटुंबाला घेऊन चला. त्यांना विश्वास द्या. कुणालाही अंतर देऊ नका. कितीही कष्ट पडोत, त्यांच्यासाठी जास्ती काम करा. एवढी शेतीची सेवा करता ती तुम्हांला चांगले दिवस देईल. दु:खातल्या परिस्थितीला सामोरं जाण्यातच कर्तृत्व आहे. तुम्ही खूप अस्वस्थ दिसतो. दिल्लीला माझ्याकडे आठ दिवसांसाठी या. तुम्हांला बरं वाटेल.”

थोड्या वेळानं मंत्री, पुढारी, कार्यकर्ते आमच्याजवळ घरात आले. पुन्हा गर्दी झाली. खाजगी सगळं मी बंद केलं. पुन्हा सगळ्यांशी माझा परिचय करून दिला गेला. यशवंतराव संरक्षणमंत्री असताना निफाडजवळचा नांदुर्डी गावाचा मुलगा पाकिस्तानच्या आक्रमणाच्या लढाईत हुतात्मा झालेला होता. त्याच्या नावानं नांदुर्डीला वाचनालय काढायचं ठरलेलं होतं. त्या गावी जाऊन यशवंतरावांनी वाचनालयाचं उद्घाटन केलं. चीन-पाकिस्तानच्या आक्रमणांची आठवण देऊन लोकांच्या काळजाला हात घालणारं सुंदर भाषण त्यांनी केलं. वाचनालयं, ग्रामीण वाचनालयं, खेडी, ती सुसंस्कृत, सुशिक्षित व्हावी म्हणून मनानं समृद्ध व नव्या दुनियेची ओळख त्यांना व्हावी म्हणून वाचनालयाच्या गरजेचं त्यांनी सुरेख प्रतिपादन केलं, मंदिरं उशिरा करा पण वाचनालयाची मंदिरं अगोदर गावोगाव करा, असा आग्रह व्यक्त केला.

सायंकाळई छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभात श्री. बाबासाहेब पुरंदरे व इतर वक्ते होते. यशवंतरावांनी शिवाजीमहाराजांच्या जीवनावर, राजकीय धुरंधरपणावर व दूरदृष्टीवर समाजाभिमुख निर्णयांवर पुराव्यानिशी नवा प्रकाश टाकला. प्रत्येक ठिकाणी नव्या विषयावर बोलताना यशवंतरावांचे नवीन मुद्दे होते. संदर्भाशिवाय व अभ्यासाशिवाय ते कधी बोललेच नाहीत.

१९७७ साली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माझे वडील, धाकटी आई, थोरली आई, माझा सर्वात लाहन भाऊ कृष्णा, माझ्या भावाचे सासरे काशिनाथ पाटील वगैरे बद्रीनारायण हरिद्वारच्या तीर्थयात्रेसाठी गेलेले होते. वजिलांची खूप दिवसांची इच्छा होती. हिमालयातली व बाजूची जवळपासची बरीच तीर्थक्षेत्रं पाहून झाल्यावर दिल्लीला दोन दिवस सगळे थांबले. राष्ट्रपती भवन व दिल्लीतली काही महत्त्वाची ठिकाणं पाहण्याची त्यांची इच्छा होती. परवानगी मिळेना. कोणीतरी म्हणालं, तुमच्या नामदेवचा यशवंतराव चव्हाणांशी परिचय आहे. यशवंतरावांनी मदत केली व फोन केले तर हे होऊ शकेल.

एक-दोघं यशवंतरावांकडे त्यांच्या बंगल्यावर गेले. माझी ओळख सांगितली व चिठ्ठी मागितली. यशवंरावांनी माझे आईवडील कोणत्या ठिकाणी आहेत त्याची विचारपूस केली व त्यांना घेऊन येण्याची व्यवस्था केली. यशवंतरावांनी १८ व १९ मे असे दोन दिवस त्यांच्याकडे आईवडिलांना थांबवून घेतलं. मनापासून त्यांचं स्वागत-आदरातिथ्य केलं. खूप पाहुणचार केला व दिल्लीतली महत्त्वाची ठिकाणं दाखविण्याची सगळी व्यवस्था केली. राष्ट्रपती भवन, राजघाट, पार्लमेंट, लाल किल्ला इ. सगळं काही दाखविलं गेलं. इंदिरा गांधी व काही नेत्यांच्या भेटी घालून दिल्या. स्वत:च्या घरी आईवडिलांच्यासोबत त्यांनीच फोटो काढून घेतले. यशवंतरावांचे टोपी न घातलेले समुदायातले क्वचितच फोटो असतील. तसे अगदी समोरच्या बागेत टोपीशिवायचे त्यांचे फोटो आहेत. या सगळ्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांशी दोन्ही आईशी खूप खूप बोलले. कुठलाही आडपडदा न ठेवता. माझ्यासंबंधी, माझ्या कवितेसंबंधी यशवंतरावांनी आईवडिलांना काय काय सांगितलं असेल, कसं सांगितलं असेल देव जाणे! त्यानंतर बाबांच्या मतांचं संपूर्ण परिवर्तन झालेलं होतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org