यशवंतराव चव्हाण (13)

यशवंतरावांना मी पत्र लिहिलं :

७ जूनच्या जवळपास पावसाळा सुरू होतो. मृग नक्षत्र लागतं. शेतीच्या पेरणीला सुरूवात होते. घरात प्रेत असलं तरी ते झाकून पेरणी आधी करावी असं पेरणीचं महत्त्व तुकारामानं लिहिलेलं आहे. ते बरोबरच आहे. माझे वडील शिकले-सवरलेले नाहीत. पण खूपच बहुश्रुत संपन्न व विचारशील आहेत. सुरूवातीला ते शेतमजूर होते. नंतर थोडी बरड शेती विकत घेतली. स्वत: आई – वडिलांनी विहीर खोदली. खूप कष्ट केले. आता मुलाबाळांनी जमिनीत कष्ट करून तिचं उत्पन्न वाढवावं व सुखानं दोन घास खावेत. आर्थिक परिस्थिती पुन्हा खालावली तर कोणीच विचारणार नाही. म्हणून शेती व तिच्या उत्पन्नात मी गढून जाणं एवढंच आता नीटपणानं करावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. एवढ्याशा माझ्या खेड्यातल्या लिहिण्याला फार मोठ्या दुनियेत कोण विचारणार? लिहिणं-वाचणं पोटापुरतं झालेलं आहे, ते पुष्कळ झालं. पुन्हा वाण्या बाम्हणासारखं कविता इत्यादी लिहून व्यर्थ वेळ घालवू नये. ह्या-बाम्हणाऊ गोष्टी बाम्हण इत्यादी लोकच करू शकतात. ते आपलं काम नाही. पुन्हा त्या नादी लागून शेतीबीडी पडित पडली तर काय? माझ्या मुलांच्या नशिबी पुन्हा दु:खदारिद्र्य नको. मी फार भोगलंय्.

कवितांना पारितोषिकं मिळाली होती. त्या रकमेचा शेतीसाठी खूप अडचणीत उपयोगही झालेला होता, पण बाबांचं मन बदलत नव्हतं. गावातली व जवळपासची सुशिक्षित मंडळीसुद्धा ह्या कवितेच्या नादानं मी बिघडेल असंच सतत सांगत होती. ७ जूनच्या पेरणीच्या वेळी कुठेही जाऊ नये. पेरणी-प्रपंचाचं आधी पाहावं ह्या बाबांच्या विचाराच्या शिस्तीनं, कठोर आदेशामुळे मी दिल्लीच्या कार्यक्रमास ३०-३१ मे ला आलो असतो पण, १३-१४ जूनच्या जवळपास केव्हाच शक्य नाही.

असं सविस्तर पत्र मी यशवंतरावांना लिहिलं व काही कवितांच्या ओळी लिहून पाठविल्या. तुम्हीसुद्धा तुमच्या कर्तव्यनिष्ठेमुळेच रशियाला जात आहात, मीही कर्तव्यनिष्ठा व उपाय नाहीत म्हणून इथे ह्या दिवसांत शेतीत राहिलं पाहिजे असलं काहीबाही पुष्कळदा लिहिण्याचं तारतम्य व भान नसायचं. दिल्लीला जायची खूप खूप इच्छा होती. एवढा मोठा समारंभ. मनाची खूप गुंतागुंत होत होती, पण काहीच उपाय नव्हता. मनमोकळं असं पहिल्यांदा त्यांना लिहिलं. नंतर असं लिहिल्याचं मला खूप वाईटही वाटत राहिलं.

महाराष्ट्रातल्या दोन-तीन समारंभांमध्ये यशवंतरावांनी माझा गौरवपूर्ण उल्लेख करताना वरीलप्रमाणे मी लिहिलेल्या काही खाजगी गोष्टीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.

‘संसार करावा नेटका | मग साधावी परमार्थ घुटिका ||’

अशी तुकारामाची ओळ त्यांनी त्या वेळी पुष्टीसाठी दिली. महानोर दिल्लीला आल्यानं जो आनंद झाला असता, त्यापेक्षा अधिक आनंद न आल्यानं झाला. माझ्या पत्राचा आशय ते कुठेतरी सांगत असत. लोकांची मग पत्रं येत. काही लोक मला वृत्तपत्रांची कात्रणं पाठवीत होते. यशवंतराव व मी असे एकमेकामध्ये गुंतून चाललो होतो. एकाच कुटुंबातले झालेले होतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org