यशवंतराव चव्हाण (12)

एक वाजता सगळे साहित्यिक आपापल्या ठिकाणी गेल्यावर तंबूमध्ये राहिले फक्त वसंदादा पाटील, वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते, वेणूताई व मी. पुन्हा एक विषय यशवंतरावांना संपवून टाकायचा होता. चर्चा साहित्यावरून थेट पर्यावरण, झाडं अशा विषयांवर आली.

वृक्षमित्र मोहिते ह्यांना देवराष्ट्रच्या बाजूच्या डोंगराचा आणखी बराच भाग जंगल वाढविण्यासाठी द्यावा, चांगली वनश्री तिथे व्हावी, हरिणं व इतर श्वापदं, पक्षी अभयारण्य अशी नीट आखणी करून त्यात आर्थिक तरतूद व वाढ करून काही नवे निर्णय घ्यावे. श्री. मोहिते यांना नुसती आर्थिक मदत न देता ह्या कामात रस असलेले कार्यकर्ते जाणीवपूर्वक त्यांच्या पाठीशी उभे करावेत. झाडं, पर्यावरण ह्या कामाच्या संबंधी समाजात, कार्यकर्त्यांत ओढ नाही. हे वाईट आहे, असं काहीतरी वसंतदादा यशवंतरावांना सांगत होते. यशवंतरावांनी वसंतदादांच्या मागणीला दुजोरा दिला. मतं सांगितली. “दादा, नुस्तं फॉरेस्टसुद्धा उपयोगी नाही. आपलं पारंपारिक फॉरेस्ट फार झालं. ते फारच भोंगळ व तकलादू दिसतंय सर्वत्र. परेदशातल्या चांगल्या फॉरेस्टचा आराखडा पाहून आपणही नीट आखणी करून आता जंगल उभं केलं पाहिजे. तीच ती दोनचार जातींची झाडं लावणार. त्यातही योजनाबद्ध असं सुंदर काहीच कुठे नसतं. म्हणून काळजी घेऊनच आता करा. मी काही लोकांशी बोलतो.”

हा विषय पूर्ण करून वसंतदादांना बाजूला घेऊन आणीबाणी, राजकीय स्थिती ह्याबाबत काहीतरी चर्चा चाललेली होती. फार गंभीरपणानं दोघंही बोलण्यातच मग्न होते. जवळपास तासभर. मला निघताना म्हणाले, “तुम्ही भाऊसाहेब खांडेकर, वि. भि. कोलते अशा पाच-सहा लोकांची विशेष काळजी घ्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यांची राहण्याची थोडी गैरसोय झाली होती असं मी ऐकलं. आता अडचण नाही. तरीही काळजी घ्या.”

मी निघण्यापूर्वी यशवंतरावांना म्हणालो, दोन मिनिटं पाहिजेत. रात्रीचे दोन वाजलेले आहेत. तरीही मी काकुळतीनं गडबडून काही बोललोच : ‘लक्तरलेली गोधडी’ या मथळ्याखाली दोन प्रदीर्घ लेख मी महाराष्ट्र टाइम्स मधून लिहिले. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर, सरळसरळ मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर नाव घेऊन फार कठोर लिहिलं. पंतप्रधानांचंही नाव त्यात आहे. ते कोणीही सहन करणार नाही, हे मान्य होत; पण मी सत्यतेच न राहवून लिहिलं. परवा- परवा बडे पोलिस अधिकारी घरी येऊ गेले. काही प्रश्न विचारले. पुन्हा येणार आहेत असं ऐकलं. त्यात पुन्हा विनोबा भावे यांच्याकडे पवनारला पंतप्रधान इंदिरा गांधी येणार आहेत. आणीबाणी व मानवी हक्कांच्या रक्षणासंदर्भात कठोर पत्रक काढलंय्. त्यावर पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, कुरूंदकर व मी अशा सात लोकांच्या स्वाक्ष-या आहेत. पंतप्रधान आता पवनारला येणार नाहीत. पण त्या लिहिण्यामुळे त्या फार चिडलेल्या आहेत. काहींना कारागृहात टाकणार आहेत अशीही अफवा आहे.

यशवंतराव म्हणाले, “तुम्ही आता शांतपणानं झोपा. कशाचीच काळजी करू नका. फार भाबडे आहात. यापैकी कोणीही तुरूंगात जाणार नाही. तुम्ही तर बिल्कुल नाही. तुम्ही काही चुकीचा लेख लिहिलेला नाही. मनातून सगळं झटकून टाका. पहाटे भेटू.”

श्री. गो. नी. दांडेकरांनी मध्यंतरी ‘ललित’ मासिकात ह्या आणीबाणीतल्या पत्रकाचा उल्लेख करून लेख लिहिल्याचं मला आठवतं. पण नंतर माझी अशीही माहिती होती की मी व आणखी एक दोघांनीच फक्त त्या पत्रकारवर सही केलेली होती. बाकीच्यांनी सह्या केल्याच नव्हत्या. अर्थात तो सगळा इतिहास आठवण्यात काही अर्थ नाही. फक्त माझी भूमिका मी यशवंतरावांना सांगितली त्या वेळी त्यांची जी तात्काळ प्रतिक्रिया होती ती मला मोलाची वाटली होती. ही साहित्यिक, सांस्कृतिक आस्था, आणि आणीबाणीचं समर्थन केल्यामुळे एखाद्या बिनकण्याच्या गोंधळ्याला मोठ्या पदावर बसवणा-या इतर राजकीय नेत्यांची तथाकथित आस्था यांच्यातलं अंतर मला जाणवलं ते असं होतं.

एकदा दिल्लीला साहित्यविषयक कुठल्या कार्यक्रमासाठी सात-आठ राज्यांतले सात-आठ कवी बोलविलेले होते. राष्ट्रपती, पंतप्रधान, यशवंतराव असे समारंभाचे पाहुणे होते. ३० व ३१ मे अशी तारीख कळविलेली होती. यशवंतरावांनी पत्र पाठवून आग्रहाचं निमंत्रण मला पाठविलेलं होतं. व्यक्तिगत सविस्तर पत्र त्यासाठी जोडलेलं होतं. दरम्यान काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या निमित्तानं पंतप्रधान इंदिरा गांधी, यशवंतराव, संजय गांधी रशियाच्या दौ-यावर निघालेले होते व ७-८ जूनला परतणार होते. यशवंतरावांचं पुन्हा पत्र आलं – ३० व ३१ मेऐवजी समारंभ १४ व १५ जूनला बहुधा होईल. तसं वेगळं सविस्तर पत्र येईल. पुन्हा नीट तारखा, दिवस व वेळ कळवितो. जरूर या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org