नव्या पिढीकडून अपेक्षा
मला वाटते, विशाल आणि विधायक विचाराची स्वप्ने साकार करावयाची, प्रत्यक्ष कृतीने दर्शवायची, तर त्यासाठी आणखी काही आत्मसात करावे लागत असावे. ज्यांनी ही स्वप्ने साकार केली, प्रत्यक्ष कृती केली, त्यांनी आपले विचार मेंदूत अडकवून ठेवले नाहीत. ते रक्तात भिनविले. म्हणूनच त्यांच्याकडून विधायक कृती घडली असली पाहिजे. क्रांतिकारकांनी इतिहास घडविला, तो त्यांचे रक्त तापलेले होते, असे आपण म्हणतो. याचा खरा अर्थ, त्या तरूणांनी देशाच्या स्वातंत्र्याचे विचार रक्तात भिनविले होते, असाच केला पाहिजे. देश सर्वार्थाने सुखी बनविण्याचा विचार स्वातंत्र्योत्तर नव्या पिढीने असा रक्तात भिनविला, तर नव्या पिढीकडून विधायक कार्य घडू शकेल, यावर माझा विश्वास आहे.