यशवंत चिंतनिका २९

ग्रंथप्रसार

केवळ उत्कृष्ट साहित्य निर्माण करून भागणार नाही, तर त्याचे सुबक प्रकाशन व स्वस्त पुस्तक योजनांद्वारे त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आता औद्योगिक विस्तार झाल्यामुळे काहीसा सुस्थितीत असलेला नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे. तो वर्ग टेलिव्हिजन जितकी प्रतिष्ठेची वस्तू मानतो, तितकेच त्या वर्गाने स्वत:चे ग्रंथालय असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले पाहिजे. मला असे वाटते, की एक प्रकारची ग्रंथशून्यता आता येत आहे. त्यामुळे पुस्तके खपत नाहीत. हे घातक आहे. ग्रंथालयांना पुस्तकांची आवड निर्माण करता येईल. ‘चिंतनशील साहित्य म्हणजे केवळ धार्मिक साहित्य’ असे समीकरण झाले आहे. हे अपुरे आहे. नवे पदवीधर, नवी विद्यालये नव्या चिंतनशील साहित्याची गि-हाइके आहेत. पण महाराष्ट्रात नवी विद्यापीठे निघूनही ग्रंथांचा प्रसार कां होत नाही, याचा विचार करावयास पाहिजे.