यशोदर्शन-९

११. नाकारलेले आहेर –

दोन तीन वर्षापूर्वीच श्री. यशवंतरावजीच्या पुतणीचे (लीलाबाईचे) लग्न होते अर्थात समारंभाला अतोनात गर्दी जमली होती. प्रत्यक्ष लग्नप्रसंगी तर सारे पटांगण लोकांनी फुलून  गेले होते.
प्रत्येकाने आपापल्यापरी आहेर आणले होते. अंदाजच करायचा झाला तर कमीत कमी पंचवीस हजाराच्या आत बाहेर सारे आहेर वधूपक्षाकडे जमले असते. जो तो त्या आहेर सुपूर्त करण्याचा क्षणाची आतुरतेने वाट पहात होता.

‘यशवंतरावजींचे स्नेहानो नि आप्तेष्टानो!’ यशवंतरावजींच्या वतीने दूरध्वनीतून जाहीर करण्यात आले की, आपण समारंभाला उपस्थित राहून व्यक्त केलेले प्रेम शब्दानं मोजता येणार नाही. यशवंतरावजी आपले अत्यंत आभारी आहेत. त्यांची एकच आग्रहाची विनंती आहे की, वधुपक्षाकडे आलेले आहेर स्वीकारता येत नाहीत. त्यावद्दल दिलगीर वाटते. कोणीही आहेर करण्याचा आग्रह धरु नये.
केवढा हा मनाचा थोरपणा –

संग्राहक  - एकनाथ तातोबा अंबवडे (१०)

१२.  साकार सोज्वलता –

सामान्यपणे पैसा, सत्ता व किर्ती या तिन्हीही गोष्टी मनुष्याजवळ असतील तर तो गर्विष्ठ बनतो हे एक व्यावहारिक सत्य आहे ! पण ही गोष्ट ना. यशवंतरावजींचे बाबतीत मात्र असत्य ठरली आहे.
ना. यशवंतरावजी नुकतेच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले होते व त्यावेळी ते प्रथम क-हाडला आले तेव्हाची गोष्ट ! नेहमीप्रमाणे ते घरी आल्यावर श्री. राजाभाऊ धनी यांचे घरी गेले. श्री. यशवंतरावजी येत असलेले पाहून ‘या या’ बसा असे त्यांचे स्वागत केले. तेव्हा यशवंतरावजी म्हणाले, ‘हे असे काय करता आहात? मी जरी मुख्यमंत्री असलो तरी तुमच्या घरी लहानपणी खेळलेला, बागडलेला खोडकर यशवंताच आहे...’

या त्यांच्या उद्गारातून त्यांचा सोज्वळ निरहंकारी स्वभाव प्रकट होतो नाही का ?

संग्राहक -  अनंत आपटे (१० अ)

१३. थोर मन –

स्वत:च्या देखत स्वत:चा झालेला उपमर्द कोणा राज्यधुरिणाला सहन झाला आहे ? आणि त्याहीपेक्षा अशा व्यक्तिची शक्य तेवढी सेवाच करणा-या विभूति ‘युगायुगातून एक’ या प्रमाणेच संभवतात!
काही कामानिमित्त एक ख्यातनाम वैद्य श्री. यशवंतरावाजींना भेटण्यासाठी आले होते. वैद्यराजांची तपश्चर्या मोठी होती. एक सिध्दहस्त धन्वन्तरी म्हणून त्यांनी मोठी किर्ती संपादन केली होती. अशा वयोवृध्द अंधगलितगात्र वैद्यराजाचा आदर मुख्यमंत्र्यांनी यथास्थित केला. वैद्यराजानी आपल्या आगमनाचा हेतू व्यक्त करताच श्री. यशवंतरावजीनी त्याच्या कामासंबंधी अशक्यता दाखवून दिली व परोपरीने सदरचे कागद अयोग्य व अप्रस्तुत कसे आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. पण महाकोपिष्ट वैद्यराजाना ते सहन झाले नाही. संतापाच्या भरात तोंडून अयोग्य व असह्य विधान बाहेर पडले. श्री. यशवंतरावजीनी अयोग्य काहीही माझ्याकडून अपेक्षू नका असे सांगितले व त्यांना दरवाजापर्यंत आधार देऊन पोहोचवले!
अर्धा तास ही घटना घडून झाला नव्हता एवढ्यात वर उल्लेखलेल्या वैद्यराजांचे एक जवळचे आप्त श्री. यशवंतरावजीना भेटण्यास काही कामानिमित्त आले. श्री. यशवंतरावजीनी झाल्या अनुचित प्रकाराची यत्किंचितही जाणीव न देता त्यांचे काम तातडीने केले !

ज्या वेळी वरील प्रकार उपकृताला नंतर कळला तेव्हा त्याच्या मनाची काय स्थिती झाली असेल ? व त्यांना थोर मनाच्या यशवंतरावजीच्या खंबीर पण निरोगी अंत:करणाची प्रचिती आली असेल !  हे वाचकांना वेगळ्या शब्दात सांगणयाची गरज नाही !

संग्राहक – शशिकांत पलुस्कर (१०अ)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org