यशोदर्शन-८

त्या हस्तकाने आपली बॅग बाकावर ठेवली आणि तो फलाटावर उतरला. गाडीला टेकून गाडीच्या खिडकीजवळ कोणाशी तरी बोलत तो उभा राहिला होता. यशवंतरावांनी हा कोणाशी बोलतोय हे पाहण्यासाठी हळूच डोळ्यावरची धाबळी दूर करून सटकन पाहिले. तो त्यांना कोण आढळले म्हणता! त्या हस्तकाचे जीवलग दोस्त असलेले  कुप्रसिध्द फौजदार! फौजदार आणि तो हस्तक यांचे खलबत फलाटावर चालू होते. त्यांचे भाषण काही यशवंतरावांना नीट ऐकू येत नव्हते. पण ते अशा चळवळ्या लोकाना पकडण्याबाबत काही तरी हिकमत लढविण्याबाबत असावे असे मात्र यशवंतरावांनी ओळखले. त्या फौजदारांना पाहिल्यापासून यशवंतरावांना धडकी भरली होती. फौजदार आणि हस्तक यांना ते भीत होते असे नव्हे तर आपण जर पकडलो गेलो तर चळवळीच्या आपल्या योजना धुळीस मिळणार या कल्पनेची त्यांना भीती वाटत होती.

तो हस्तक आणि तो फौजदार हे दोघेही गाडीत बसणार की काय याची शंका त्यांच्या मनात आली आणि त्यांना अस वाटले की आता आपली अवस्था क्रुर श्वापदाच्या घशात अचानकपणे पडणा-या एखाद्या सावजाप्रमाणे झाली आहे. त्यामुळे ते फारच अस्वस्थ झाले. गाडी कराड स्टेशनवर जवळ जवळ २० मिनिटे थांबते ती एकदा केव्हा सुटेल असे वाटले. ते फौजदारही गाडीत येतात की काय याबद्दल ते संचित होते. एवढेच नव्हे तर डब्यातल्या प्रवाशांची ते चौकशी करतात की काय अशी शंका यशवंतरावजींना आल्यावाचून राहिली नाही. डोक्यातील अशा त-हेच्या शंका आणि मनातील वाढती भीती या अवस्थेत ते असताना गाडीची शीटी वाजली. गाडी चालू झाली. फलाटावर उभे असलेल्या फौजदाराचा त्या हस्तकाने ‘अच्छा’ म्हणून घेतलेला निरोप यशवंतरावांनी ऐकला आणि क्षणार्धात त्यांना कळले की आपल्या खालच्या बाकावर एकटा तो हस्तक पथारी पसरत आहे. यशवंतराव धाबळीत उघडलेल्या डोळ्यांना त्या हस्तकाची हालचाल पहात होते. तो हस्तक पथारीवर झोपला असल्याचे यशवंतरावांनी पाहिले. पण त्यानेही आपल्या सारखीच झोपेची बतावणी केली आहे की काय याची ही शंका त्यांना येत होती. अखेर कोरेगाव स्टेशन जसे जवळ येऊ लागले तसे त्यांनी तो हस्तक निश्चिंत झोपला असल्याची खात्री करून घेतली आणि गाडी स्टेशनवर थांबताच हळूच फलाटावर ते उतरले.

पुण्याला जाणा-या यशवंतरावांना कोरेगावला उतरायला लागले. कारण त्या हस्तकाच्या नजरेला पडले असते ते गिरफदार झाले असते, आणि पुढच्या सर्व योजना बारगळल्या असत्या. यशवंतरावांना पकडणे हा त्यावेळी पोलिसांचा पुरूषार्थ होता. आयती पकडण्याची संधी या हस्तकाला चालून आली होती. पण यशवंतरावांचे नशीब सिकंदर म्हणून आणि प्रसंगावधान राखल्याने ते या गंभीर प्रसंगातून निभावून नेले आणि तो हस्तक देशद्रोही कमाईला उंचवला. अशा देशद्रोहींचा धिक्कार असो. आणि अशा कर्तबगार नेत्याचा सदैव विजय असो. अशीच प्रार्थना खरा भारतीय परमेश्वरापाशी करील यात शंका नाही!

संग्राहक -  देवदत्त ऊर्फ अनिल श्री. देशपांडे (१० अ)

१०. गुणग्राहकता

१९५७ च्या गणेशोत्सवातील खुद्द मुंबईत निवासस्थानी घडलेली घटना आहे ही! श्री. यशवंतरावजींच्या घरी गणपतीपुढे रोज एका अभिजात कलावंताचा कार्यक्रम होत असे. त्या दिवशी महाराष्ट्राचे ख्यातनाम वयोवृध्द गानसम्राट बालगंधर्व यांचा कार्यक्रम होणार होता. श्री. नारायण राजहंसाचे स्वागत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दाराशी येऊन केले. नारायणरावांना वायुमुळे चालता येणे कठीण होते. स्वत:च्या हाताने आधार देऊन यशवंतरावानी त्याना गणेश हॉलमध्ये नेले. पहिल्या पदातच बालगंधर्वानी सारा श्रोतृवर्ग भारून टाकला होता. पण त्यांच्या वयामुळे व शारीरिक क्षीणतेमुळे त्याना गाणे त्रासाचे होत असावे, असे यशवंतरावजीना वाटले. त्यांनी नारायणरावांना संकोच होऊ नये म्हणून म्हटलं,’ आपण आता लवकर थकता पुरे झाले!’ पण नारायणरावांनी तक्याचा आधार घेऊन थोडा वेळ पुन्हा गणेशाची सेवा केलीच, शेवटी स्वत: यशवंतरावजीना हार घालण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा यशवंतरावजी म्हणाले,’ आज तुम्ही माझ्या घरी आला आहात तेव्हा मीच तुमचा पुष्पहार घालून सत्कार करणार, आपण हे उलट कसं अपेक्षिता ?’ तेव्हा नारायणरावानी सांगितलं,’ आपण मुख्यमंत्री झाल्यापासून मी या गोष्टीची आत्यंतिक मनिषा बाळगून आहे. तेव्हा माझी एवढी इच्छा पूर्ण होऊ द्यावी.’

ना. यशवंतरावजींचा नाईलाज झाला. उठण अशक्य असणा-या श्री. नारायणरावांचा उठण्याचा प्रयत्न पाहून पुढे स्वत:च जाऊन त्यांना वाकून त्यांच्या हारांचा स्वीकार केला व नारायणरावाना उठण्याची तसदी पडू दिली नाही.

सोज्वल सत्तेचा कलेनं केलेला सत्कार पाहून उपस्थितांचे मनात आनंदाचा सागर हेलावला आणि कलेपुढे विनम्र झालेली सत्ता पाहून कोणाही रसिकाला केशवसुतांच्या खालील ओळी आठवल्या असत्या –
‘गाणे जे परिसावया कविपुढे राजेश ही वाकले’

संग्राहक – अशोक प्र. करंबेळकर (१० अ)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org