यशोदर्शन-५

नामदार यशवंतरावजी चव्हाण यांच्या आठवणी

१). यश देणारे यशवंतराव!

यशवंतरावाचं वय त्यावेळी दोन दिवसाचं होतं. त्यांच्या मातोश्री स्नानाकरता सकाळी निघाल्या असता त्यांचा तोल गेला. त्यांनी शेजारी असणा-या मोकळया कणगीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे अधिकच तोल जाऊन त्या जमिनीवर कोसळल्या. आघातानं त्यांची दातखिळ बसली. सारे घर भांबावले. काही सुचेना. अनेक उपचार झाले व ब-याच वेळानं यशवंतरावजींच्या आई शुध्दीवर आल्या. सा-यानांच आनंद झाला.

त्यावेळी यशवंतरावजींचे आजोबा म्हणाले, मुलानं आपल्या आईला वाचवण्यात यश दिलं आहे. तेव्हा त्याचं नाव ‘यशवंत’ ठेवा! असे आहेत यशश्री खेचून आणणारे यशवंतराव!!

संग्राहक - शरद कि. घाडगे  (१० अ)

२.) वक्तृत्वाचा अभ्यास-

आपले वक्तृत्व श्री. यशवंतरावजींनी आपल्या शालेय जीवनातच परिश्रमाने संपादन केले. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी वक्तृत्वाचा श्रीगणेशा गिरवला आहे.
दर श्रावणी सोमवारी आगाशिवाच्या डोंगरावर जाण्याची क-हाडला चाल आहे. बालपणी हायस्कूलमध्ये असताना श्री. यशवंतराव आपल्या मित्रांबरेबर आगाशिवाला जात व वाटेवर एक मोठा विस्तीर्ण दगड पडला आहे तेथे हे सर्व लोक थाबंत. त्यावर उभे राहून आसमंतातील वनश्री पुढे कोठल्या तरी विषयावर यशवंतरावजी व्याख्यान देत व मग पुढे वाटचाल होई. यशवंतरावजींचे बालमित्र श्री. बाबुराव मानेवाडीकर ही आठवण सांगताना म्हणाले आजही त्या बाजूस फिरकले तर तो पाषाण पाहून मला या प्रसंगाची आठवण होते.

संग्राहक - कु. उषा शहा

३.) निग्रह-

श्री. यशवंतराव टिळक हायस्कूलमध्ये इंग्रजी ५ वीत होते. त्यावेळी श्री. दुवेदी नावाचे अत्यंत कडक शिस्तीचे करारी मुख्याध्यापक होते. १९२८/२९ चे ऐन आंदोलनापूर्वीचे दिवस होते. अशाच एका दिवशी श्री. यशवंतरावजीच्या वर्गात असणा-या एका विद्यार्थ्याने फळयावर ‘वल्लभभाई पटेल यांना अटक’ असा मजकूर लिहिला. श्री दुवेदी वर्गात आले. त्यांनी वर्गाला जंगजंग पछाडले. कोणीच लिहिणाराचे नाव सांगेना! श्री. यशवंतरावजीचा राष्ट्रीय चळवळीकडे असणारा ओढा थोडा थोडा नुकताच प्रकट होऊ लागला होता. श्री. दुवेदीनी श्री. यशवंतरावाना व त्यांचे मित्र यांना नावे विचारली पण त्यांनी नाव सांगण्याचा साफ नकार दिला. झाले. शेवटी त्या दोघाना पाठीमागे बाकावर उभे राहण्याची शिक्षा फर्मावरली गेली. दोघेही निमूटपणे दिवसभर बाकावर उभे होते. शिक्षा भोगली पण आपल्या वर्गमित्राचे नाव सांगून त्यांनी सुटका करून घेतली नाही.

संग्राहक - ब्रिजलाल चांडक (१० अ)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org