सह्याद्रीचे वारे - ९८

महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर संपूर्ण महाराष्ट्राकरितां व्यापक स्वरूपाची योजना आंखण्याचा आम्हीं प्रयत्न केला असून त्यासाठीं शक्य ती सर्व तरतूद करण्यांत आली आहे. महाराष्ट्राचे मराठवाडा, कोंकण, विदर्भ असे अनेक विभाग असून त्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. या सर्व प्रश्नांचा व मागण्यांचा अभ्यास करून या विभागांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनें संतुलित स्वरूपाचा कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न आम्ही तिस-या पंचवार्षिक योजनेंत केला आहे. या विभागांचा विकास, त्यांच्या आकांक्षा व त्यांच्या मागण्या ह्या सर्वांचें प्रतिबिंब येत्या पंचवार्षिक योजनेंत पडावें, असा आमचा कटाक्ष असून त्याप्रमाणें पावलें टाकण्याचा आम्हीं प्रयत्न केला आहे.

नागपूर शहर ही एक महत्त्वाची बाब आहे. नागपूरची राजधानी गेली हें मला मान्य आहे. पण याचा आपण निराळ्या दृष्टीनें विचार केला पाहिजे. नागपूरचें महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीनें मी कोणाच्याहि मागें राहिलों नाहीं. राजधानीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता. नागपूर कराराप्रमाणें येथें कांहीं दिवस राजधानी असावी व विधानसभेची बैठक व्हावी असा लोकप्रतिनिधींनीं जो कौल दिला, त्याची अंमलबजावणी आज होत आहे. जनतेचे प्रश्न, त्यांच्या भावना, त्यांचा आकांक्षा समजावून घेऊन त्या सर्वांना मूर्त स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करीत आहोंत व करीत राहूं. परंतु याकरितां आपली भावना आणि दृष्टि बदलली पाहिजे. लोक म्हणतात, नागपूरवर चव्हाणांचें राज्य आहे. पण आपण असें कां समजतां ? आपण असें कां नाहीं म्हणत कीं नागपूरवर कन्नमवारांचे राज्य आहे. वस्तुस्थिति अशीं आहे कीं हें राज्य व्यक्तीचे नाहीं. महाराष्ट्राच्या साडेतीन कोटि जनतेचें हें राज्य आहे. तें यशस्वी कसें होईल याचा व्यापक दृष्टिकोनांतून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. एकमेकांचे अनुभव एकमेकांच्या विकासाकरितां उपयोगी पडले पाहिजेत. आपल्या अनुभवाची देवाणघेवाण झाली पाहिजे. राज्य शेवटीं माझें किंवा एकदोन माणसांचे नसून तें आपल्या सर्वांचे आहे अशी आपुलकीची भावना वृद्धिंगत झाली पाहिजे.

राज्यपुनर्रचनेचा प्रश्न मीं मूलभूत असा कधींच मानला नाहीं. देशापुढें उपस्थित होणारे प्रश्न सोडविण्याचें आणि देशाचा विकास व समृद्धि घडवून आणण्याचें राज्य हें एक साधन आहे. जनहिताचे प्रश्न त्वरित सोडवितां यावे व राज्याचा विकास साधावा या दृष्टीनें राज्य व राज्ययंत्रणा प्रयत्न करीत असते. त्या दृष्टीनें राज्याचा एक प्रभावी साधन म्हणून आम्ही वापर करीत असून जनतेचे प्रश्न शक्य तो त्वरित सुटून हें राज्य आपल्या सर्वांचे कसें होईल याचा विचार माझ्या मनांत सतत सुरू आहे. विदर्भाचा, विशेषतः नागपूरच्या प्रश्नांचा, आम्ही उत्कटतेनें विचार करूं इच्छितों. नागपूर शहरांत अनेक प्रश्न आहेत. त्यांपैकीं नागपूर शहराचा विकास हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण शहारचा विकास म्हणजे रस्ते मोठे करणें नव्हे. नागपूर शहराचा विकास म्हणजे तेथील जनतेचा विकास होय. त्यासाठीं येथील लहान लहान धंद्यांचा विकास झाला पाहिजे. उदाहरणार्थ, येथील विणकरांच्या धंद्याचा विकास झाला पाहिजे; त्यांच्या योग्य मागण्यांची आम्हांला पूर्ति करतां आली पाहिजे; त्यांच्यांतील अज्ञान आम्हांला नाहींसें करतां आलें पाहिजे. यांतूनच या शहराचा विकास होणार आहे. लोककल्याणाच्या दृष्टीनें छोट्या छोट्या धंद्यांची आंखणी झाली पाहिजे आणि त्यांची वाढ झाली पाहिजे. त्याशिवाय त्यांचा विकास होणार नाहीं. मोठमोठ्या उद्योगधंद्यांसंबंधींची जनतेची जी मागणी आहे त्याची सरकारला जाणीव असून या धंद्यांच्या विकासासाठीं सरकार आपल्या आर्थिक मर्यादा लक्षांत घेऊन योग्य ते प्रयत्न करीलच. पण त्याकरितां अनुकूल वातावरण निर्माण व्हावयास पाहिजे. मोठा धंदां काढला कीं काम संपलें असें नाहीं. लोकांनीं एकत्र येऊन लहान लहान उद्योग सुरू करण्याच्या बाबतींत पुढाकार घेतला पाहिजे.

महाबळेश्वर येथें झालेल्या शिबिरांत अनेक मूलभूत मूल्यांचा विचार करण्यांत आला. नवा समाज नव्या प्रयत्नांनी निर्माण करावयाचा आहे, असा विचार प्रसृत करण्यांत आला. त्याकरितां विकासाचे विविध प्रश्न व ते सोडविण्याचे मार्ग ह्या मूल्यांच्या अनुरोधानें विचारांत घेण्यांत आले. महाराष्ट्राची सर्वांगीण उन्नति, सर्वांगीण विकास, हीच त्याच्या मागची मूलभूत प्रेरणा असून महाराष्ट्र समृद्ध कसा होऊं शकेल ह्या प्रश्नाचा आतां आपण विचार केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org