सह्याद्रीचे वारे - ९७

जगन्नाथाचा रथ

उद्यांपासून महाराष्ट्राच्या कायदेमंडळाचें अधिवेशन नागपूर येथें सुरू होत असून त्यासाठीं मी येथें आलों आहें. अधिवेशनास सुरुवात होण्यापूर्वी नागपूरच्या जनतेला भेटण्याची मला ही संधि मिळाली त्याबद्दल मला आज अतिशय आनंद होत आहे. कांहीं विशिष्ट कामें मनाशीं ठरवून मी येथें आलों असून त्या कार्याला आजच्या ह्या सभेपासूनच सुरुवात होत आहे असें मला वाटते.

नागपूर कराराप्रमाणें नागपूर येथें महाराष्ट्र कायदेमंडळाचें एक अधिवेशन व्हावें असें ठरलें होतें. त्या करारांत नागपूरच्या जनतेला दिलेलें वचन आज पूर्ण होत आहे. त्या वचनपूर्तीमुळे मला आज मोठें समाधान वाटत असून मला होत असलेला आनंद कसा व्यक्त करावा तें मला समजत नाहीं, त्याकरितां मजजवळ पुरेसे शब्द नाहींत.

उद्यांपासून नागपूरच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासांतील एका नवीन खंडास प्रारंभ होत आहे. जनतेच्या नेत्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीं नवीन पद्धत व मार्ग स्वीकारलेला असून महाराष्ट्र राज्याकडून जनतेच्या कल्याणाचा हा नवा उपक्रम सुरू होत आहे. अशा रीतीनें लोकशाहीचा आम्ही कटाक्षानें पुरस्कार करीत आहोंत याबद्दल मला आनंद होतो. विदर्भांतील विशेषतः नागपुरांतील - लोकांच्या भावना वेगळ्या आहेत हें मी नाकबूल करीत नाहीं. मी त्यांच्या भावना समजतों. माझ्याबद्दल त्यांच्या कदाचित् विरोधी भावना असतील, पण माझ्या मनांत त्यांच्यासंबंधीं विरोधाची यत्किंचितहि भावना नाहीं. माझ्याविषयीं कांहीं लोकांच्या मनांत द्वेषहि असेल, पण त्या लोकांविषयीं माझ्या मनांत तिळमात्र द्वेष नाहीं. हें जनतेचें राज्य आहे म्हणून या राज्यांत लोकांची विविध मतें असणें स्वाभाविक आहे. माझ्या मताशीं ते सर्वस्वी सहमत राहतील असें मी समजत नाहीं. मतभिन्नता असूं शकते, पण त्यांत द्वेषबुद्धि नसावी. कारण तशी द्वेषबुद्धि असली तर लोकशाही नांदूं शकणार नाहीं.

चौदा वर्षांपूर्वी या हिंदुस्तान देशांत एक महान क्रांतिकारी घटना घडून आली आणि त्या घटनेमुळें हिंदुस्तानांत जनतेचें राज्य स्थापन झालें. चौदा वर्षांपूर्वीं आम्हांला लोकशाहीचा हा जो वारसा मिळाला त्याच्या मुळाशीं हें भारतीय जनतेचें राज्य आहे हीच प्रेरणा आहे. हें जें महान मूल्य आहे त्याची आपण जोपासना केली पाहिजे, त्याचा आपण विकास केला पाहिजे. त्यासाठीं देशाच्या भवितव्याचा प्रश्न नजरेसमोर ठेवून त्याच्या समृद्धीसाठीं आवश्यक असलेल्या भावनांची आपणांस पूर्ति करतां आली पाहिजे. एकमेकांविषयीं प्रेमाचा, एकमेकांशी सहकार्याचा, मार्ग अवलंबून आपल्या रास्त आचरणानें लोकांत आपण विश्वास निर्माण केला पाहिजे. महाराष्ट्राचें राज्य हें जनतेचें राज्य आहे, तें जनतेचें कल्याणकारी राज्य आहे असा महाराष्ट्र राज्याचा दावा आहे. त्यासाठीं आम्ही प्रयत्नशील आहोंत.

महाराष्ट्र राज्याचा हा दावा आपल्यापैकीं प्रत्येकाचा असला पाहिजे. मराठवाडा, पुणें-सातारा, कोंकण आणि विदर्भ या सर्वांचा हा दावा असला पाहिजे. महाराष्ट्राचें हें राज्य मराठवाड्याचें आहे, कोंकणचें आहे, विदर्भाचें आहे, सर्व मराठी जनतेचें आहे. जोंवर हें राज्य जनतेच्या कल्याणासाठीं कार्य करीत आहे, तोंवर महाराष्ट्र राज्य कायम राहील. परंतु हें कार्य होणार नसेल, तर महाराष्ट्र राज्य राहूं शकणार नाहीं, ही मूळ प्रतिज्ञा लक्षांत घेऊनच मी बोलत आहें. आमच्यासमोर लोकशाहीचीं मूलभूत मूल्यें आहेत. ह्या मूल्यांचा विकास होण्यासाठीं, नव्या मार्गांचा अवलंब करून जनतेचें जीवन समृद्ध केलें पाहिजे, नवा समाज निर्माण केला पाहिजे. या तत्त्वाचा महाराष्ट्र राज्यानें स्वीकार केला असून त्या दिशेनें आमचें पद्धतशीर पाऊल पडत आहे, असें मी आपल्याला नम्रपणें सांगू इच्छितों. पण हें सर्व साधण्यासाठीं भावनात्मक ऐक्य निर्माण झालें पाहिजे. तें निर्माण करण्यासाठीं मी सतत प्रयत्न करीत राहीन. या प्रयत्नांत जर मला अपयश आलें तर तो माझा पराभव ठरेल, सर्व महाराष्ट्राचा पराभव ठरेल. परंतु माझें उद्दिष्ट साध्य करण्यांत मी हार जाणार नाहीं. ह्याकरितां कोणता मार्ग काढावा याचा विचार सतत माझ्यासमोर आहे. त्यासाठीं अनेक कार्यक्रम हातीं घेण्यांत आले असून यापुढें असेच आणखी कार्यक्रम हातीं घेण्यांत येतील. जनतेनें ह्या दृष्टीनेंच आमच्या ध्येयधोरणाचा आणि आम्ही अंमलांत आणीत असलेल्या कार्यक्रमांचा विचार केला पाहिजे. कार्यक्रमांसंबंधींच्या आमच्या कांही उणीवा असतील तर त्या जनतेनें आमच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org