सह्याद्रीचे वारे - ९६

स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय नागरिक स्वतंत्र झाला असला, तरी ख-या अर्थांने तो अजून भारतीय बनावयाचा आहे. भारत हें राष्ट्र बनलें असलें तरी प्रत्येक भारतवासी जातपात विसरून ख-या अर्थानें जेव्हां भारतीय बनेल तेव्हांच राष्ट्र पदवीला आमचा देश पात्र होणार आहे. कांहीं लोकांना, पूर्वी जातिधर्म हाच आमचा धर्म असें वाटत होतें. परंतु ऋग्वेदकाळीं जातिसंस्था अस्तित्वांत नव्हती ही गोष्ट संशोधनानें आतां शाबीत झाली आहे. त्यानंतर त्या त्या परिस्थितींत गुणकर्मविभाग म्हणून वर्ण आले. आपल्या कार्यानें वर्ण बदलहि येत असत ही गोष्ट विश्वमित्राच्या उदाहरणावरून दिसून येते. पुढें तर गुणकर्माचीहि कल्पना गेली व जन्मावरून दर्जा ठरविण्याचा हास्यास्पद प्रकार सुरू झाला. हा मुलगा अमुक खोलींत जन्मला म्हणून उच्च, तर दुसरा अमुक खोलींत जन्मला म्हणून कनिष्ठ, असा भेदभाव आपल्या मुलांमुलांतच एखादें कुटुंब करूं लागलें म्हणजे तें कुटुंब रसातळाला जाणारच. अशाच प्रकारची जातिभेदानें आमच्या राष्ट्रकुटुंबाची हानि केली आहे. सुदैवानें भूतदया, समाजसुधारकांचे कार्य, पुरोगामी राजकारण वगैरे गोष्टींमुळें जातिभेदावर आधारलेल्या आमच्या समाजाची अधोगति थोडीफार थोपविली गेली. आतां तर सामाजिक समतेवर आधारलेली राज्यघटना भारतानें मंजूर केली आहे. त्यामुळें जातिभेदाच्या भिंती ढासळण्याच्या मार्गावर आहेत असेंच कोणीहि अनुमान काढील. परंतु लोकशाही समतेवर आधारलेली घटना असूनहि आणि त्याप्रमाणें समाजाला पुढें नेण्याचे प्रयत्न चालू असूनहि या काळांत जातिभेदाचे भेसूर परिणाम कांहीं प्रांतांत आजहि आपणांस पाहावयास मिळत आहेत. त्यामुळें जातिभेदनिर्मूलनाचें कार्य हें आज ऐतिहासिक निकडीचें कार्य झालें आहे. परंतु जातीय संघर्षाला कधीं कधीं जें आवाहन करण्यांत येतें त्यामुळें राजकीय सुधारणेच्या कार्याला वाहून घेतलेले लोकच अशा प्रसंगीं नवा विश्वास व सामाजिक एकतेची नवी जाणीव समाजाच्या गळीं अधिक चांगल्या प्रकारें उतरवूं शकतील असें मला वाटतें.

अस्पृश्यतानिवारणाचा मोठाच प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यासाठीं सरकारनें अनेक कायदे केले आहेत. प्रत्येक गावांतील सार्वजनिक विहिरी व मंदिरें हरिजनांसाठीं कायद्यानें खुलीं झालीं आहेत. परंतु अद्यापिहि अशीं अनेक गांवें आहेत कीं जेथें हरिजनांना हे हक्क आज सुद्धां उपभोगतां येत नाहींत. याचें कारण हें आहे कीं कायदा हा अनुज्ञापक स्वरूपाचा असतो. जो कोणी हक्क धसाला लावील त्याच्या रक्षणासाठीं कायदा उभा आहे. नाहीं तर कायदा कांहींच करूं शकत नाहीं. सामाजिक सुधारणेच्या खास प्रयत्नांनीं आपण ही उणीव भरून काढली पाहिजे. आपले हक्क आपण बजावूं शकूं असा हरिजनांत विश्वास निर्माण करणारें वातावरण पैदा व्हावयास पाहिजे. हें महान् कार्यहि सामाजिक परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून अधिक चांगल्या प्रकारें होऊं शकेल. भगिनीवर्गाच्या बाबतींतहि हा न्याय लागू करतां येईल.

आदिवासी लोकांची परिस्थिति तर फारच केविलवाणी आहे. पगार घेऊन सुद्धां आदिवासी भागांत काम करण्यास फार थोडे समाजसेवक धजावतात, हें पाहिलें म्हणजे सामाजिक सुधारणेचें कार्य कसें असिधाराव्रताप्रमाणें आहे याची साक्ष पटते. हे सर्व समाज आपल्याला आवाहन करीत आहेत आणि त्या आवाहनाला साथ देण्यासाठी आपण येथें जमलेलों आहोंत. या आवाहनानें आपल्या हृदयांतील तार छेडली आहे हें मी जाणतों. परंतु हें कार्यच एवढें महत्त्वाचें आणि बिकट आहे कीं सातत्यानें काम चालविण्यासाठीं अनेक कार्यकर्ते आपणांला शोधावे लागतील व या कार्यास सतत नियमानें जुंपून घ्यावें लागेल. भारत हा खेड्यांचा देश आहे व म्हणून ग्रामीण भागांतून सामाजिक सुधारणेचे पाट आपण कसे खेळवतों यावर सामाजिक क्षेत्रांतील आपल्या श्रमांचें साफल्य अवलंबून आहे. सामाजिक परिषद ही केवळ परिषद न राहतां त्यांतून खेड्यांपाड्यांतील अज्ञान, रूढि व दारिद्र्यग्रस्त जनतेच्या सुधारणेची गतिमान प्रक्रिया निर्माण व्हावी या उद्देशानें आपण येथें जमलों आहोंत. बुद्धिनिष्ठा व समाजनिष्ठा या दोहोंचा योग्य मेळ घालून सामाजिक सुधारणेचें कार्य आपणांस प्रभावीपणें करावयाचें आहे. आपण सामाजिक सुधारणेच्या कार्यांत रस घेणारे आहांत व त्या क्षेत्रांतील आपला अभ्यास व अनुभवहि माझ्यापेक्षां अधिक आहे हें मी जाणतों. समाजकल्याणाच्या श्रद्धेनें आणि समाजसुधारणेच्या विवेकाने आपण सर्वजण काम करूं लागलों तर सामाजिक परिषदेचें कार्य अधिक प्रभावी बनूं शकेल. त्यासाठीं सामाजिक परिषद कार्याची आंखणी करीलच. म्हणून परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करीन, कीं परिषदेनें ठरविलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीं आपण सातत्यपूर्वक प्रयत्न करावेंत. अशा प्रकारचे प्रयत्न आपणांकडून नेटानें व निष्ठापूर्वक होतील असा माझा विश्वास आहे. शेवटीं मला हा उद्घाटनाचा मान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या परिषदेचें उद्घाटन झालें असें मी जाहीर करतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org