सह्याद्रीचे वारे - ९२

सुदैवानें या देशाला समाजसेवेची प्रदीर्घ परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचा व विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा असा जो पन्नास वर्षांचा काळ आहे त्या काळांत सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांत सुधारणा घडवून आणण्यासाठीं या देशांत एक महान् चळवळ झाली. महाराष्ट्रामध्यें ज्योतिबा फुले, न्या. रानडे, डॉ. भांडारकर, आगरकर, गोखले यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकांनीं प्रस्थापित हितसंबंधाच्या प्रखर विरोधास तोंड देऊन व प्रसंगी त्यांचें वैमनस्यहि पत्करून आपल्या ध्येयसिद्धीसाठीं सतत कार्य केलें. या समाजसुधारकांनीं केलेल्या कार्यांचे या ठिकाणीं मूल्यमापन करण्याचा माझा इरादा नाहीं. परंतु समाजाच्या भौतिक, नैतिक व वैचारिक प्रगतीवर या सुधारकांचा फार मोठा प्रभाव पडला आहे. एवढेंच मीं येथें सांगितलें तरी तें पुरेसें आहे. तथापि, समाजसुधारणा व समाजसेवा यांमध्ये फरक असून हा फरक आपणांस कदाचित् सूक्ष्म अगर तात्त्विक स्वरूपाचा वाटेल. जीवनाच्या एकंदर पद्धतीलाच एक नवीन वैचारिक आशय देऊन तिच्यांत बदल घडवून आणणें हें समाजसुधारणेचें उद्दिष्ट असतें, तर समाजसेवा ही जीवनाच्या कांहीं व्यवहार्य अंगांपुरतीच मर्यादित असून, व्यक्तिगत किंवा व्यक्तिसमूहाचे दुःख किंवा त्यांच्या अडचणी दूर करण्याचा हेतु तिच्या मुळाशीं असतो. सामाजिक सुधारणा घडवून आणणें हें जनमताचें नेतृत्व करण्या-या नेत्यांचे कार्य असतें तर समाजसेवा करण्यासाठीं योग्य प्रकारें शिक्षण घेतलेल्या माणसांची जरुरी असते. यामध्यें व्यवसायिक समाजसेवकांचाहि समावेश करतां येईल. या दोहोंमधील विभाजक रेषा अर्थात् अतिसूक्ष्म असते हें खरें आहे. कारण महात्मा फुले हे महान समाजसुधारकहि होते व त्याचबरोबर ते निष्ठावंत समाजसेवकहि होते व तथापि, हा फरक आपण स्पष्टपणें लक्षांत घ्यावयास पाहिजे. कारण समाजसेवेची जी पद्धत आपल्याला निर्माण करावयाची आहे ती त्यामुळें आपणांस नीटपणें समजूं शकेल व तिच्यामध्यें समाजसेवकांचें स्थान कोणतें आहे हेंहि आपल्या लक्षांत येईल.

मीं आतांच सांगितल्याप्रमाणें आपले प्रश्न अनेकविध असून ते सोडविण्याच्या कामीं समाजसेवक यथाशक्ति हातभार लांवू शकतील. या प्रश्नांचे स्थूल मानानें मी दोन प्रकार करतों. पहिल्या प्रकारांत, हालअपेष्टा व सामाजिक अन्याय यांची झळ ज्यांना लागली आहे अशाना मदत देण्यासंबंधींचे प्रश्न येतात, तर दुस-या प्रकारांत विकास कार्याशीं संबंधित असलेल्या प्रश्नांचा समावेश होतो. पहिल्या प्रकारांत मुख्यतः शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले, भिकारी, बालगुन्हेगार, वेश्या, स्त्रियांचा अनैतिक व्यापार करणारे व अमली पदार्थांचें सेवन करणारे व्यसनी लोक यांच्या प्रश्नांचा आणि त्याचप्रमाणें हरिजन, गिरिजन व माजी गुन्हेगार यांसारख्या समाजांतील प्रश्नांचा समावेश होतो, तर दुस-या प्रकारात बालक व युवक कल्याण, ग्रामीण पुनर्रचना, समाजविकास, कुटुंबनियोजन, वगैरे प्रश्नांचा अन्तर्भाव होतो.

समाजकल्याणाचें ध्येय स्वीकारल्यानंतर मीं आत्तांच ज्यांचा उल्लेख केला त्या समाजसेवेच्या निरनिराळ्या क्षेत्रात सरकार जोमानें कार्य करीत आहे. पूर्वी शिक्षण व सार्वजनिक आरोग्य या दोन क्षेत्रांपुरतेंच सरकारचे कल्याणकारी कार्य, बहुतांशीं मर्यादित होतें. पण आतां इतर अनेक क्षेत्रांत हें कार्य सुरू करण्यांत आलेलें आहे. १९५३ सालीं स्थापन झालेलें मध्यवर्ती समाजकल्याण मंडळ आणि त्यानंतर राज्यांमध्यें स्थापन झालेल्या त्याच्या शाखा हा कल्याणकारी ध्येयाच्या मार्गावरील एक महत्त्वाचा असा टप्पा आहे. खाजगी सामाजिक संस्थांना आर्थिक आणि इतर प्रकारचें साहाय्य देऊन आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या समाजसेवेंत गुंतलेल्या संस्थांच्या कार्यांत एकसूत्रीपणा आणून समाजकल्याण मंडळानें गुंतलेल्या संस्थांच्या कार्यात एक प्रकारचा पद्धतशीरपणा आणला आहे. याशिवाय निरनिराळीं सरकारी खाती सुद्धां, थोड्याफार प्रमाणात समाजकल्याणविषयक कार्य करीत असतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org