सह्याद्रीचे वारे -८५

लोकशाही शक्तीचा प्रभावी अविष्कार

ह्या दीक्षान्त समारंभप्रसंगीं अभिभाषण करण्यास पाचारण करून माझा हा सन्मान केल्याबद्दल, मी तुमच्या विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि कार्यकारी मंडळाचे सभासद यांचे मनःपूर्वक आभार मानतों. दीक्षान्त समारंभांत उपदेशपर भाषण करणें हें खरोखरी माझ्यासारख्याचें काम नाहीं. मंत्री या नात्यानें, उपदेश करण्यापेक्षां उपदेश ऐकण्याचीच मला अधिक संवय होती. आणि मुख्य मंत्री या नात्यानें तर उपदेश ऐकण्याचें हे काम मला किती तरी अधिक मोठ्या प्रमाणावर करावें लागतें. लोकशाहीच्या ह्या जमान्यांत स्वपक्षाच्या आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या वृत्तपत्रांतून आणि व्यासपीठावरून अनाहूत उपदेशाचा अखंड प्रवाह वाहत असतो. इतकें कशाला सल्लागार, सल्लागार समित्या व सल्लागार मंडळें यांचा जो प्रचंड गराडा मंत्र्यांच्या भोवतीं पडलेला असतो तोच फक्त तुम्हीं लक्षांत घेतला तरीहि या समारंभासाठीं आपण ही जी निवड केलेली आहे ती करण्यांत आपली चूक झाली कीं काय अशी शंका तुमच्या मनांत आल्यावाचून राहणार नाहीं. दुसरें असें कीं उपदेश कोणींहि केलेला असो, तो शंभर टक्के स्वीकारणें नेहमींच शक्य नसतें आणि पुष्कळ वेळां शहाणपणाचेंहि नसतें, हें आपल्याला अनुभवानें माहीत होतें. तेव्हां अशा या समारंभांत उपदेशपर भाषण करण्याची सर्वसाधारणपणें जी प्रथा असते ती मीं पाळली नाहीं तर तें तुम्ही समजूं शकाल अशी मी आशा करतो.

उपदेश करण्याचें मी टाळतों याला याहूनहि अधिक महत्त्वाचें आणखी एक कारण आहे. आपल्या देशांतील परिस्थिति आज झपाट्याने बदलत आहे आणि या बदलणा-या परिस्थितींतले कित्येक बदल तर इतक्या मूलग्राही व दूरगामी स्वरूपाचे आहेत कीं पुढील पंधरा-वीस वर्षांत कोणती परिस्थिति उद्भवेल आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीं आपल्याला केवढें बौद्धिक व नैतिक बळ वापरावें लागेल याचें भविष्य मांडणारा माणूस खरोखरच फार धाडसी म्हटला पाहिजे. कोणींसें म्हटलें आहे कीं विसाव्या शतकांत पहिल्या महायुद्धानंतर सामाजिक परिवर्तनास जी प्रचंड गती मिळाली तशी मानवी इतिहासांतील दुस-या कोणत्याहि कालखंडांत मिळालेली नाहीं. आणि याचें भरपूर प्रत्यंतर आपल्याला आपल्या अनुभवावरून प्रत्यही येतच असतें. तेव्हां, मित्रहो, तुम्हांला कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावें लागेल, कोणत्या अडचणींशीं मुकाबला करावा लागेल, कोणती परिस्थिति हाताळावी लागेल याचा कानमंत्र मी तुम्हांला देऊं शकणार नाहीं. त्यासाठीं तुमच्या या महान् विद्यापीठाकडून तुम्ही जें शिकलां त्यावरच तुम्हांला सतत विसंबून राहावें लागेल. आणि ज्या उज्ज्वल ध्येयवादाचा पाठपुरावा करून अलिगड विद्यापीठानें पूर्वी देशांतील बौद्धिक चळवळीच्या क्षेत्रांत श्रेष्ठ असें स्थान मिळविलें तो ध्येयवाद जर तुम्हीं संपूर्णपणें आणि योग्य रीतीनें आत्मसात् केला असेल तर तुम्हांला चिंता करण्याचें कांहींच कारण नाहीं.

मी असें म्हणतों याला कारण आहे. माझ्या मतें तुमच्या विद्यापीठाच्या या ध्येयवादामागची प्रेरणा मूलतः समाजसुधारणेचीच होती आणि शिक्षणानेंच सर्व सामाजिक व आर्थिक दोषांचें निर्मूलन होईल अशा प्रकारची शिक्षणासंबंधीं ठाम निष्ठा या ध्येयवादांत होती. तेव्हां, साहजिकपणेंच या ध्येयवादानें सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा व दुराग्रह यांच्याशीं मुकाबला करण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धिप्रामाण्य, समंजसपणा व सहिष्णुता या आपल्या नवजात लोकशाहीच्या दृष्टीनें आज अत्यंत आवश्यक असलेल्या मूल्यांचा पाठपुरावा केला. या विद्यापीठाचे थोर व वंदनीय संस्थापक सर सय्यद अहमद खान यांना त्यांच्या या वैचारिक भूमिकेमुळें स्वधर्मीयांची अप्रियता, विद्वेष व कटुता सहन करावीं लागलीं. परंतु ज्या धैर्यानें त्यांनी या परिस्थितीला तोंड दिलें व तिचा मुकाबला केला तें धैर्य, त्यांच्या ठिकाणीं असलेली अढळ निष्ठा व श्रेष्ठ दर्जांचे नैतिक सामर्थ्य यांतूनच निर्माण होऊं शकलें. मुसलमान समाजाला शेवटीं त्यांच्या शिकवणुकीचें महत्त्व पटलें, हा त्या पायाशुद्ध शिकवणुकीचा मोठाच गौरव समजला पाहिजे. आणि म्हणून त्या थोर पुरुषाच्या पवित्र स्मृतीचा आपणांस मान राखावयाचा असेल तर त्याची ही शिकवण आपण कधींहि नजरेआड होऊं देतां कामा नये.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org