सह्याद्रीचे वारे -८१

आज तुमच्या-आमच्या पुढचा, देशाच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणून ज्याला आपण मानतों आणि ज्याचा उल्लेख मीं थोड्याच वेळापूर्वी केला, तो प्रश्न म्हणजे ग्रामीण जीवन आणि नागरी जीवन, खेड्यांतील जीवन आणि शहरांतील जीवन, यांच्यामधलें जें वाढतें अंतर आहे तें कमी करणें हा आहे. तें कमी करण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे गांवांची सध्यां जी आर्थिक रचना आहे ती अशा रीतीनें बदलली पाहिजे कीं त्यामुळें, शेतीसारख्या गांवांतील प्रमुख धंद्याची आणि शेतीशीं संलग्न असलेल्या गांवांतील छोट्या छोट्या धंद्यांची गतिमानता आणि त्यांच्यांतला जिवंतपणा आज जो कमी झाला आहे व त्यामुळें त्यांच्यांत जो एक प्रकारचा निकसपणा आला आहे तो सर्व जाऊन हे धंदे सकस कसे होतील, जे लोक हे धंदे करतात त्यांच्या जीवनांत समृद्धि आणण्यासाठीं ते उपयोगी कसे पडतील या दृष्टीनें आपणांस आज प्रयत्न करावयाचे आहेत. हें सर्व घडवून आणण्याचें काम आपल्या देशानें आज महत्त्वाचें मानलें आहे.

शेतीसंबंधीं जें नवीन नवीन संशोधन आज होत आहे त्याचा उपयोग आपली शेती करूं शकेल अशा दृष्टीनें शिक्षण देण्याचा प्रयत्न आपणांला करतां येईल. जुन्याच पद्धतीनें अनेक शतकें आपण शेती करीत आलों. त्यामुळें शेतीचा हा धंदा पाठीमागें पडला. आज शेतीचा संबंध नव्या शोधांशीं, शेती करण्याच्या नव्या नव्या पद्धतींशीं जर जोडावयाचा असेल तर हें नवें शास्त्र शेतीच्या धंद्याशीं नेऊन भिडविण्याचें काम आपणांस केलें पहिजे. या कामामध्यें आम्हांला शिक्षणाचा उपयोग करून घेतां येईल. या त-हेचें शिक्षण हें ग्रामीण शिक्षणाचा एक प्रकारचा परिपाकच होय असें आपण मानलें पाहिजे. प्रश्न कोणत्या गोष्टीला ग्रामीण शिक्षण म्हणावे याचा नाही. ग्रामीण शिक्षणाचे हेतु आम्ही काय मानतो, ग्रामीण जीवनाचें स्वरूप आम्ही स्वतःच्या मनाशीं काय ठरवितों यावर ग्रामीण शिक्षण म्हणजे काय हें ख-या अर्थानें शेवटी ठरणार आहे. ग्रामीण जीवनाचें स्वरूप काय असावें, त्याचा नागरी जीवनाशीं संबंध काय असावा या प्रश्नाचें आम्ही आपल्या मनाशीं जर निश्चित उत्तर देऊं शकलों, तर ग्रामीण शिक्षणाचा प्रश्न हळूहळू यशस्वी रीतीनें आपण सोडवूं शकूं असें मला वाटतें. खेड्यांतील ज्या कोट्यवधि जनतेचें जीवन मंगलमय करावें असा हेतु मनाशीं ठेवून आपलें राष्ट्र पुढें पुढें जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्या जनतेचें कल्याण करण्याचें एक साधन ह्या दृष्टीनें ग्रामीण शिक्षणाच्या प्रश्नाकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करूं या, एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करीन.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org