सह्याद्रीचे वारे -७६

आमच्या शेतीचा मूलभूत प्रश्न

या समारंभासाठीं आठवण ठेवून आपण मला इतक्या दूर बोलावलें त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहें. तीन वर्षांपूर्वी परभणीला आलों असतांना, या कृषि महाविद्यालयाला मीं धावती भेट दिली होती. यानंतर आपल्या महाविद्यालयानें पुष्कळ प्रगति केली आहे. म्हणून या कृषि महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीच्या समारंभाचें निमंत्रण जेव्हां आपण मला दिलें तेव्हा तें स्वीकारण्याचा मला मोह झाला. कारण या निमित्तानें परभणीला येण्याची एक संधि लाभेल आणि या विभागांतील मतप्रवाहांचाहि थोडासा संपर्क साधेल असें मला वाटलें; आणि म्हणून मीं आपलें निमंत्रण स्वीकारलें आणि आज येथें आपल्यामध्यें आलों.

मला एका गोष्टीचा आनंद आहे कीं मराठवाड्याच्या विकासाच्या कामाला गति मिळावी अशी तुमची, माझी, सर्वांची इच्छा आहे. त्याच्यासाठीं प्राथमिक स्वरूपाच्या ज्या कामांची गरज आहे अशा कामांपैकी हें एक काम आहे. विकास ही कांहीं एकाच क्षेत्रापुरती मर्यादित गोष्ट नसून ती सर्वंकष अशी गोष्ट आहे. एका क्षेत्रामध्यें प्रगति झाली म्हणजे विकास होतो असें नाहीं. सर्वच क्षेत्रांमध्यें संतुलित प्रगति म्हणजे विकास अशी विकासाची मी व्याख्या करतो. आणि म्हणून कांही प्राथमिक संस्थांची, कांही मूलभूत शैक्षणिक प्रयत्नांची विकासासाठीं आवश्यकता असते. या दृष्टीनें पाहिलें तर मराठवाड्याच्या विकासामध्यें कृषि-प्रशिक्षणाची, शेतीविषयक अधिक प्रगत अशा ज्ञानाची आवश्यकता होती आणि आहे. त्यासाठींच हें कृषि महाविद्यालय आतां सुरू झालें आहे. या कृषि महाविद्यालयाला शोभेल, असें एक मोठें थोरलें घर आपण देतों आहोंत. कृषि महाविद्यालयाची एक निराळी वसाहत स्थापन होणार असून जमिनीची किंमत धरून जवळजवळ साठ लाखांचा खर्च, या महाविद्यालयासाठीं आपण करतों आहोंत. लाखांचा प्रश्न मी गौण मानतों. परंतु हें जें काम होत आहे तें अतिशय महत्त्वाचें असें काम आहे. तेव्हां मला आशा आहे कीं या महाविद्यालयामध्यें शिकणारे विद्यार्थी मराठवाड्याच्या नव्या रचनेंत कांहीं नव्या परंपरांची भर घालतील.

मीं सांगितलें कीं मराठवाड्यांत होणारें अशा प्रकारचें हें पहिलेंच महाविद्यालय असून त्याच्यावर कांही जबाबदा-या आहेत. अर्थात् या महाविद्यालयामध्यें मराठवाड्यांतूनच सगळे विद्यार्थी येतील असें मी धरून चालत नाहीं. त्यामध्यें बाहेरचेहि कांहीं विद्यार्थी येतील आणि बाहेरच्याहि महाविद्यालयांमध्यें मराठवाड्यांतील कांहीं विद्यार्थी जातील असें मी मानतों. मराठवाड्यांतील प्रत्येक गोष्ट मराठवाड्याचकरितां आणि मराठवाड्याच्या बाहेरची गोष्ट मराठवाड्याच्या बाहेरच्याच लोकांकरितां असा हिशेब आपण ठेवतां कामा नये. थोडीशी देवाणघेवाण असलेली बरी. परंतु मराठवाड्यांतील ह्या कृषि महाविद्यालयाचा फायदा मराठवाड्यांतील विद्यार्थी जास्त घेतील यांत कांहीं शंका नाहीं. आणि म्हणून त्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे कीं त्यांनी येथें कांहीं नव्या परंपरा सुरू केल्या पाहिजेत.

श्री. मोहिते ह्यांनी आतां सांगितलें कीं मी शेतीच्या महात्त्वासंबंधीं येथें बोलेन. परंतु कृषि-पंडितांच्या पुढें कृषीचें महत्त्व मी कोण सांगणार ? खरें म्हणजे कृषीचें महत्त्व तुमच्यापासून मीं समजावून घेतलें पाहिजे. मी शेतकरी परंपरेचा आहें. मी आतां शेतकरी राहिलों नसलों तरी मला शेतकरी परंपरेचा अभिमान आहे. शेतकरी परंपरा राहिली पाहिजे. माझा मूळ पिंड शेतक-याचा आहे हें मी कांहीं नाकारीत नाहीं. पण मी आज शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून नसल्यामुळे कायदेशीर रीत्या मला शेतकरी म्हणवून घेतां येणार नाहीं याची मला जाणीव आहे. तेव्हां शेतीसंबंधींची माहिती आपल्याकडूनच मीं घेतली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org