सह्याद्रीचे वारे - ७२

वस्तुस्थिति अशी आहे कीं, इतरांकडे जशीं माणसें आहेत तशींच आपल्याकडेहि आहेत हें जरी खरें असलें तरी आम्हांला अभिमान वाटावा असें आमच्याकडील मनुष्यबळ आहे असें मला वाटतें. आणि हें आपण समजून घेतलें पाहिजे. छोटा शेतकरी, खेड्यापाड्यांतून काम करणारा शेतावरचा मजूर, गिरणींतून काम करणारा कामगार, स्वतःचे हात व स्वतःची छोटी अक्कल वापरणारा छोटा तंत्रज्ञ, हुशार पंडित, लक्ष्मणशास्त्री जोशी ज्यांचे प्रतिनिधि आहेत ते बुद्धिमान विचारवंत, छोटेमोठे इंजिनिअर, डॉक्टर हीं वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारीं सगळीं माणसें पाहिल्यानंतर मला असें वाटतें कीं, आमच्याजवळ जबरदस्त मनुष्यबळ आहे. आपलीं हीं साधनें पाहून आपण आपल्या नियोजनाचा विचार केला पाहिजे.

या दृष्टीनें शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मघाशीं श्री. बाळासाहेब देसाई यांनीं शिक्षणासंबंधींचा जो दृष्टिकोन सांगितला तो मला मंजूर आहे. त्याच्या पाठीमागचा विचार मला सांगावयाचा आहे. तो विचार असा आहे कीं, आपण शिक्षणाकडे जें पाहतों तें केवळ गरिबाच्या मुलाला शिक्षण मिळालें पाहिजे आणि श्रीमंताच्या मुलाला तें मिळालें नाहीं तरी चालेल अशा दृष्टीनें नाहीं. आमच्यामध्यें जें चांगलें आहे त्याला जास्तींत जास्त वाव मिळाला पाहिजे, अशा दृष्टीनें आपण शिक्षणाकडे पाहिलें पाहिजे. मी आपणांला सांगूं इच्छितों कीं, शिक्षणाकडे निव्वळ सामाजिक गरजेच्या दृष्टीनें मी पाहत नाहीं. माझ्या मतें शिक्षण हें आर्थिक विकासाचें एक मूलभूत साधन आहे. आमच्यामध्ये शक्ति निर्माण करण्याकरितां आमच्याजवळ मनुष्यबळाशिवाय दुसरें कांही साधन नसल्यामुळें आम्हांला या साधनाचा विकास करण्यासाठीं त्याला शिक्षणाची जोड द्यावयाची आहे. खेड्यांत बिजली नेऊन पोहोंचविल्याशिवाय ज्याप्रमाणें शेतीचा विकास होणार नाहीं, त्याचप्रमाणें आमचा नापीक पडलेला मनुष्यबळाचा हा जो मोठा थोरला साधनसंपत्तीचा भाग आहे. त्यांत शिक्षणाची बिजली नेल्याशिवाय नवसामर्थ्य निर्माण होणार नाहीं. शिक्षणाकडे पाहण्याचा माझा स्वतःचा हा असा दृष्टिकोन आहे. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगति करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, शेतीचें औद्योगीकरण करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शिक्षणाचा हा कार्यक्रम महाराष्ट्रांत महत्त्वाचा आहे.

मग हें शिक्षण कोणत्या प्रकारचें असावें हा विचार ओघानेंच येतो. हें शिक्षण म्हणजे निव्वळ आपल्या शाळा उघडल्या आहेत आणि मुलें शाळेंत जात आहेत, परंतु मुलें शाळेंत काय करतात हें आपल्याला माहीत नाहीं, अशी परिस्थिति नव्हे. तर या देशांतील किंवा या राज्यांतील समाजोपयोगी साधनांचा वापर करण्याइतकी शक्ति मुलामध्यें येईल अशा त-हेनें मुलगा शिक्षण घेतो कीं नाहीं हें पाहण्याचें काम आतां तुम्हांआम्हांला केलें पाहिजे. मी या प्रश्नाला फक्त येथें स्पर्श करतों आणि तो सोडून देतों. परंतु शिक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या आतांच्या संदर्भात अत्यंत क्रांतिकारक प्रश्न आहे असें मी म्हणतों. हा विचार माझ्या मनांत अलीकडे फार तीव्रतेनें येतो याचें कारण इतर साधनांचा वापर करण्याची आपली अपेक्षा कांहीं मर्यादेपर्यंतच आहे हें आपण समजलें पाहिजे.

आतां आपण शेतीच्या प्रश्नांकडे वळूं या. महाराष्ट्रांतील जमीन आपणां सर्वांना माहीत आहे. तिचें वर्णन मीं केलें पाहिजे असें नाहीं. सह्याद्रीच्या पलीकडची जमीन म्हणजे कोंकणांतला कातळ, तो आपल्या परिचयाचा आहे. नद्यांच्या कांठचा सुपीक भाग सोडला व पलीकडे गेलों म्हणजे कमी पावसाचा भाग सुरू होतो. मराठवाड्यांतील गोदावरीच्या कांठचा भाग चांगला आहे आणि विदर्भामध्यें काळी जमीन पुष्कळ व चांगली आहे. परंतु तेथें पाटबंधा-यांची शक्यता अतिशय कमी आहे. जिथें पाणी आहे तिथें तें वापरण्याची शक्यता कमी आहे आणि जिथें पाणी कमी आहे तिथें त्याची गरज जास्ती आहे; एवढेंच नव्हे तर तिथें पाणी मिळेल कीं नाहीं अशी शंका निर्माण झाली आहे. ही जमिनीची व पाण्याची मर्यादा आपणांला मुळांतच समजली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org