सह्याद्रीचे वारे - ६०

आज आपण तिस-या पंचवार्षिक योजनेच्या उंबरठ्यावर उभे आहोंत. नव्या प्रयत्नांच्या उंबरठ्यावर उभे आहोंत. आपलें नवें राज्यहि आज नव्या प्रवेशद्वाराशीं उभें आहे. आपल्या सर्व साधनांचा, आपल्या सर्व सामर्थ्यांचा आणि आपल्या मर्यादांचाहि अंदाज घेऊन आपल्याला आतां पुढें जावयाचें आहे. अशा वेळीं सिंहावलोकन करणें आणि पूर्ण झालेल्या कार्याची मोजणी करणें याची फार आवश्यकता आहे. आणि त्या हेतूनेंच मी आज येथें आलों आहे.

मी माझ्या कल्पनेप्रमाणे आपल्यापुढें हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण विदर्भाच्या वेगवेगळ्या भागांतले विचारवंत आणि कर्तबगार कार्यकर्ते आहांत. आपण हातीं घेतलेलें कार्य ही एक राष्ट्रीय समस्या आहे व ती राष्ट्रीय दृष्ट्या सोडविणें हें आपणां सर्वांचे कर्तव्य आहे ही भावना सदैव मनांत बाळगून आपण आपल्या कार्यास लागूं या. आपण या भावनेनें कार्य केलें तरच महाराष्ट्र मोठा होईल. आणि महाराष्ट्र मोठा होईल तो केवळ स्वतःसाठी नव्हें तर राष्ट्राला मोठें करण्यासाठीं. तो राष्ट्राचा सदैव एकनिष्ठ सेवकच राहील. महाराष्ट्र ही भावना कधीहि विसरणार नाहीं, दुस-यांनाहि तो कधीं तो विसरूं देणार नाही. आमचे सगळे प्रयत्न या महान् देशाच्या उत्थानासाठीं आहेत ही भावना आपण जागृत केली पाहिजे. महाराष्ट्राचे उपासक या दृष्टीनें आपण या सर्व प्रश्नांकडे पाहिलें पाहिजे आणि सेवकाच्या भावनेनेंच आपण या महान् कार्याला हात घातला पाहिजे. मी हें सर्व अशासाठीं सांगतों आहें कीं, या महान् कार्यातींल आपलें स्थान आपल्या सदैव लक्षांत राहावें, त्याची आपणांस सदैव जाणीव असावी.

मला आशा आहे कीं, हे जे विचार मीं आपल्यापुढें मांडले त्यांचा आपण विचार कराल. कदाचित् आपण तो तसा केलाहि असेल, कारण आपण सर्वजण विचारवंत कार्यकर्ते आहांत. मीं आपल्याला कांहीं नवीन सांगितलें अशांतला भाग नाहीं. मीं फक्त माझे विचार माझ्या पद्धतीनें आपल्यासमोर मांडले. त्यांचा विचार करून आपण विकासाच्या कामाला लागा एवढीच विनंती आहे.

विदर्भांतील ही विकास परिषद महाराष्ट्र राज्यांत विकासाला साहाय्यभूत होणारी एक महान् संस्था ठरावी अशी प्रार्थना करून मी माझें भाषण संपवितो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org