सह्याद्रीचे वारे - ५६

हेंच मी मघाशीं पाटबंधा-यांच्या संबंधांत सांगितलें. आपल्या राज्यांतील निरनिराळ्या विभागांच्या परिषदांनीं आणि त्या त्या विभागांतील अधिका-यांनीं हातीं घेतलेलीं एखादी योजना मागें पडल्यास, ती तशी मागे कां पडली हे शोधून काढलें पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. आपल्या विभागांतील हातीं घेतलेल्या कामांत दिसून आलेली अपूर्णता विकास परिषदेच्या सभेंत व्यक्त केली कीं, आपली जबाबदारी संपली असें आपण मानतां कामा नये. यांत समाधान असलें तरी तें तात्पुरतें आहे. परंतु एवढ्यानें काम पुरें होणार नसून गेल्या पांच वर्षात विकासविषयक ज्या जबाबदा-या आपण अंगावर घेतल्या त्या कां पार पडल्या नाहींत याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर हा अधिकारी चांगला नाहीं, तो अधिकारी बरा नाहीं, हा लोकांचे ऐकत नाहीं, तो आमचें ऐकत नाहीं, अशा प्रकारची उधळ टीका करणेंहि योग्य नाहीं. ही वरवरची टीका झाली. जोंपर्यंत आपण एकमेकांवर विश्वास ठेवीत नाहीं किंवा परस्परांशी सहकार्य करीत नाहीं तोंपर्यंत देशाच्या भवितव्याबद्दल न बोललेलेंच बरें. एखादा सरकारी अधिकारी अत्यंत कर्तबगार असूनहि, त्याच्यामध्यें बिनसरकारी माणसांप्रमाणें दोष असूं शकतील. अखेरीस अधिकारी हाहि माणूसच आहे. तेव्हां त्याच्याहि स्वभावामध्यें दोष असणें स्वाभाविक आहे, हें लक्षांत घेऊन परस्परांनीं परस्परांवर विश्वास टाकला पाहिजे.

ही अशी वेळ आहे कीं, आपण आतां आपल्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे. विकास कामाच्या बाबतींत आपली प्रगति कां झाली नाहीं ? विहिरींच्या बाबतींत आम्ही अपेक्षेप्रमाणें प्रगति कां करू शकलों नाहीं ? शिक्षणाच्या बाबतींत प्रगति झाली असेल तर ती कां झाली आणि झाली ती इतकीच कां झाली ? या प्रश्नांची उत्तरें आपण शोधलीं पाहिजेत. आपण प्रगति कां करू शकलों नाहीं हें तपासतांना आपण केलेली प्रगति कां करूं शकलों हेंहि तपासलें पाहिजें. अशी तपासणी केवळ विभागाच्या दृष्टिनेंच नव्हे तर सबंध राज्याच्या दृष्टिनेंहि उपयुक्त ठरणार आहे. अर्थात् तपासणी करणें किंवा आढावा घेणें हें वाटतें तितकें सोपें काम नसून तें एक मोठें शास्त्र आहे. कांहीं अधिका-यांना तपासणीचे अधिकार हवे असतात. पण काय तपासलें म्हणजे चूक सांपडेल, काय विचारलें म्हणजे परिस्थितीची बरोबर कल्पना येईल, हें तपासणी करणा-याला समजलें पाहिजे. केवळ तपासणीचे अधिकार मिळाल्यानें ह्या गोष्टी जशा समजत नाहींत, तसेंच वरवर पाहणी करूनहि त्या कळत नाहींत. त्या समजण्यासाठीं कामाच्या अंतर्गत पद्धतीची माहिती करून घेण्याचा अधिका-यांनी परिपाठ ठेवला पाहिजे. योजनांच्या बाबतींतहि हें लागू असल्याकारणानें त्याकरितां एक पद्धत निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोंत.

मला एक गोष्ट स्पष्ट करावयाची आहे ती ही कीं, या वर्षाचे आणखी कांही महिने आपल्याला प्राथमिक तयारींत घालविणें आवश्यक आहे. दुस-या पंचवार्षिक योजनेचा जो भाग आपण पार पाडला आहे त्याची पाहणी करणें आणि जे पुरा करूं शकलों नाहीं त्याचीं कारणें शोधून काढणें हा या प्राथमिक तयारीचा पहिला भाग आहे, आणि तिस-या पंचवार्षिक योजनेच्या पूर्वतयारीचा विचार करणें हा दुसरा भाग आहे. विकास कार्याच्या बाबतींत कमिशनर डॉ. शेख यांना अतिशय आस्था आहे. हें काम वेगानें पुरें झालें पाहिजे यासाठीं त्यांचे प्रयत्नहि असतील. विदर्भाला त्यांच्यासारखा विकासाच्या कामांत लक्ष घालणारा अधिकारी मिळाला आहे. तेव्हां त्यांच्या मार्गदर्शनाखालीं विदर्भाच्या विकास योजना जलद गतीनें पु-या होतील अशी मी आशा करतों. त्या तशा झाल्या नाहींत तर डॉ. शेख यांना दोष न देतां विकासाच्या यंत्रणेंतच कांहीं दोष आहे असें मी समजेन. म्हणूनच मीं जें मघाशी सांगितले तेंच पुन्हा एकदां सांगतो कीं, हें दुस-या पंचवार्षिक योजनेचें शेवटचें वर्ष फार महत्त्वाचें आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org