सह्याद्रीचे वारे - ५१

माझ्या मतें कोंकणच्या विकासाच्या दृष्टीनें ज्या दोनचार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचा उल्लेख करून मी माझें उद्घाटनाचें भाषण संपविणार आहें. प्रत्येक भागाच्या दृष्टीनें अशा कांहीं योजना असतात कीं, त्या योजना शेवटीं त्या भागांतल्या लोकांच्या भावनांच्या प्रतीकात्मक अशा झालेल्या असतात. म्हणून सर्वसाधारणपणें विकासयोजनांचा उल्लेख करण्याचा जरी माझा विचार नसला तरी दोनतीन महत्त्वाच्या गोष्टींसंबंधांने मला बोललें पाहिजे. त्यांतील पहिली महत्त्वाची गोष्ट कोंकणच्या रेल्वेसंबंधीं आहे, दुसरी कोंकणांतील जलवाहतुकीसंबंधीं आहे आणि तिसरी कोंकणांतील रस्त्यांसंबंधीं आहे. कोंकणच्या रेल्वेचा उल्लेख, निव्वळ सरकारची बाजू आपल्यापुढें मांडावी अशा दृष्टीनें मीं केलेला नाहीं. कारण कोंकणच्या विकासाकरितां जर कोणती महत्त्वाची गोष्ट आज होण्याची आवश्यकता असेल तर ती कोंकणच्या रेल्वेची आहे. रेल्वे वाहतूक आणि रस्त्यांची वाहतूक या बाबतींत कोंकणच्या दृष्टीनें जी एक प्रकारची बंदिस्त परिस्थिती निर्माण झाली आहे तिला वाट मोकळी करून मिळाल्यास कोंकणांत जी एक मूळ शक्ति आहे तिचा विकास व्हावयाला मार्ग सांपडेल, हा महत्त्वाचा मूळ विचार मला मान्य झाला आहे. आणि म्हणून कोंकणच्या रेल्वेबाबत जेव्हां जेव्हां संधि आली तेव्हां तेव्हां शासनामार्फत आणि व्यक्तिशःहि मी सतत प्रयत्न करीत आलों आहें.

कोंकणच्या बंदरांचाहि प्रश्न असाच महत्त्वाचा आहे. पुराच्या वेळीं जेव्हां मी कोंकणांत गेलों होतों त्यावेळीं खाड्या भरून गेलेल्या मीं पाहिल्या. आणि खाड्या भरल्या याचें कारण बंदरें भरलीं आहेत हें आहे. आज खाड्यांतून चिखल काढणें कितपत व्यवहार्य किंवा शक्य आहे याची मला शंका आहे. परंतु बंदरें चिखलापासून मुक्त झालीं पाहिजेत यासंबंधीं कुणाहि विचारी माणसाला शंका असण्याचें कारण नाहीं. म्हणून या कामासाठी योग्य मार्गाने आम्हीं प्रयत्नाला सुरुवात केली आहे.

तीच गोष्ट रस्त्यांची आहे. विकासाचा हाहि एक महत्त्वाचा मार्ग आहे. दिवा-दासगांव रेल्वे झाल्यानें रत्नागिरीचा प्रश्न संपूर्णपणें सुटेल असें मी मानत नाहीं. खरी गोष्ट अशी आहे कीं, रत्नागिरी जिल्ह्याचा भूगोल माझ्यापेक्षां तुम्हांला जास्त माहीत आहे. येथील हीं खोरीं त्या त्या खो-यामध्यें असलेल्या प्रत्येक गांवाशीं जोंपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांनी जोडलीं जात नाहींत, तोपर्यंत रत्नागिरीचें खरें मन मोकळें होणार नाहीं असें मला वाटतें. आणि म्हणून छोट्या छोट्या रस्त्यांच्या देणगीची, ज्याला नेटवर्क ऑफ रोड्स म्हणतात तिची, रत्नागिरीला फार आवश्यकता आहे. अर्थात् त्यासाठीं बरींच वर्षे प्रयत्न करावा लागेल.

आणि समुद्रकिना-यावरचा हा मच्छीमारीचा धंदा, तोहि विचार करण्यासारखा आहे. छोट्या छोट्या ठिकाणी यासारख्या इतर अनेक उद्योगधंद्यांची वाढ करतां येणें शक्य आहे. मोठ्या उद्योगधंद्यांचा विचार श्री. वर्दे यांनीं येथें मांडला. पुष्कळ धंद्यांचीं त्यांनीं नांवे सांगितलीं. ते यांतले तज्ज्ञ आहेत. ते त्यांचा विचार करतील. परंतु छोट्या छोट्या शहरांत उद्योगधंद्यांना लागणारीं साधनें पुरविण्याची गोष्ट महत्त्वाची आहे असें मी मानतों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org