सह्याद्रीचे वारे - ४९

विकास योजनेंत त्याला मिळणारें शिक्षण ही एक मोठी मानवी प्रक्रिया असून तिला फार महत्त्व आहे. या दृष्टीनें अलीकडेच ऐकलेली एक मजेदार गोष्ट आपणांस मला सांगावीशी वाटते. ही गोष्ट भूदान कार्यकर्त्यांनीं मला सांगितली असून तिच्यांत शिकण्यासारखें बरेंच आहे. हे कार्यकर्ते शेतीच्या उत्पादनाचीं व सहकारी शेतीचीं तत्त्वें समजावून देण्याकरितां एका मागासलेल्या भागांत गेले होते. तेथें गेल्यानंतर एकदोन दिवसांच्या श्रमांनी त्यांनीं एक छोटीशी सभा घेतली. डोंगरपठाराला ही सभा बसली होती. सभेला सुरुवात होतांच सहकारी शेतीचीं तत्त्वें आणि शेतीच्या उत्पादनाचीं महत्त्वाचीं मूल्यें त्यांनीं सभेंतल्या लोकांपुढे सांगावयाला सुरुवात केली. सकाळची वेळ होती. इतक्यांत त्या कोवळ्या उन्हामध्यें त्या डोंगरपठारावरून दोनचार ससे पळत असतांना सभेंतील लोकांनी पाहिले. आणि त्याबरोबर सहकारी तत्त्वांचा आणि शेतीच्या उत्पादनाच्या विचार सोडून देऊन ते सगळे लोक त्या सशांच्या पाठीमागें पळत सुटले. कारण त्यांनीं असा विचार केला कीं, हें घेतलेलें सहकारी तत्त्व आणि यांतून वाढणारें शेतीचें उत्पादन हें पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी केव्हांतरी पदरात पडणार आहे. आज संध्याकाळची मेजवानी ह्या सशांच्यावरच होणार आहे. लहानशीच गोष्ट आहे. परंतु तींत पुष्कळसें तथ्य आहे. कारण शेवटीं आम्ही ज्यांच्यामार्फत काम करणार आहोंत त्यांना त्या कामामध्यें कसा रस निर्माण होईल हा प्रश्न योजनेच्या बाबतींत फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचा विचार कोंकणच्या लोकांच्या दृष्टीपुढें दिसत नाहीं. कोंकणचा माणूस ही कोंकणची खरी संपत्ति असून त्याच्याकडे, मीं आतांच जी गोष्ट सांगितली तिच्यांतील तत्त्व लक्षांत घेऊन, आपण आतां आपली दृष्टि वळविली पाहिजे.

कोंकणच्या कांठीं हेलावणारा महासागर आणि त्याचा किनारा ही तुमची दुसरी मोठी संपत्ति आहे. तुमच्या पूर्वेस उभा असलेला सह्याद्रि हा त्याच्या पठारावरच्या लोकांच्या संपत्तीचें साधन होऊन बसला आहे. परंतु त्यांनें आणून दिलेला भरपूर पाऊस हा निदान रत्नागिरीच्या बाबतींत तरी कधीं कधीं कांही लोकांना शापासारखा वाटतो. कारण त्यामुळें जमीन वाहून जाते व पाठीमागें फक्त कातळ शिल्लक राहतात, खडकाळ जमीन शिल्लक राहते. त्यामुळें रत्नागिरीमध्यें शेतीचा व्यवसाय हा फक्त नाममात्र व्यवसाय राहिलेला आहे.

ही जी कोंकणची साधनसंपत्ति आहे आणि या ज्या अडचणी आहेत त्या ध्यानांत घेऊन कोंकणच्या विकासाचा आपण विचार केला पाहिजे. ह्या परिषदेनंतर आपण निव्वळ योजनांची  अनेक पानांची एक यादीच तयार केली तर आपण आपलें काम संपूर्णपणें केलें असें मी म्हणणार नाहीं. अर्थात् योजनेच्या कामामध्यें योजनांची यादी हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण त्याशिवाय माणसाला आपण काय केलें पाहिजे तें समजत नाहीं. परंतु विकासाची जीं महत्त्वाचीं साधनें असतात त्यांची वाढ करण्याच्या दृष्टीनें आपण काय केलें पाहिजे हा महत्त्वाचा विचार योजना करणा-या माणसांच्या पुढें असतो. आणि त्या दृष्टीनें आपण आपल्यापुढें, 'वर्किंग पेपर्स' असा ज्याचा आपण उल्लेख केला, असे कांहीं पेपर्स मांडले पाहिजेत. आपल्याजवळ जीं साधनें आहेत त्या साधनांपैकीं कोणत्या महत्त्वाच्या साधनांचा उपयोग आपल्या कोंकणच्या विकासासाठीं होणें शक्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org