सह्याद्रीचे वारे - ४७

कोंकणच्या विकासाचा प्रश्न

आजच्या या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगीं, कोंकण विभागाच्या प्रतिनिधींनी मला बोलाविण्याइतका माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें. आणि बोलाविल्यानंतर कामाची सुरुवातहि फारच चांगली केली आहे. शासनाच्या प्रतिनिधीकडून थैली घेण्याकरितां त्याला बोलावतात, पण आपण थैली देऊन सुरुवात केली आहे याबद्दल मी आपणांस मनःपूर्वक धन्यवाद देतों.

योजनेच्या क्षेत्रांतला एक विधायक प्रयत्न, आणि अत्यंत महत्त्वाचा प्रयत्न म्हणून आजच्या या परिषदेचें महत्त्व माझ्या दृष्टीनें फार आहे. आणि ह्या प्रसंगी बॅ. नाथ पै यांच्यासारख्या नव्या कोंकणाचा प्रतिनिधी आज मार्गदर्शन करण्याकरतां येथें आला आहे ही सुद्धां माझ्या दृष्टीनें अतिशय स्वागतार्ह अशी घटना आहे.

कोंकण विकासाचा प्रश्न हा जसा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तसाच तो कांहींसा दुखावलेला प्रश्न आहे याची मला जाणीव आहे. आणि म्हणून या विकासाच्या प्रश्नाकडे जास्तींत जास्त विधायक दृष्टीनें आणि वास्तवतेच्या भूमिकेवरून पाहण्याचा आपण प्रयत्न करावयास पाहिजे. आपण मंडळी या परिषदेमध्यें आपल्या सर्व प्रश्नांचा विचार याच भूमिकेवरून कराल व त्याच्या पाठीमागें ही विधायक दृष्टि ठेवाल अशी मला आशा आहे आणि तसा माझा विश्वासहि आहे.

कोंकणचा प्रश्न पाठीमागें कां पडला या प्रश्नाची मीमांसा कदाचित् अभ्यासकाला योग्य वाटण्याचा संभव आहे. इतिहासकाराच्या दृष्टीनेंहि कदाचित् तो महत्त्वाचा विषय ठरण्याचा संभव आहे. परंतु आज आणि उद्यां यांच्याशीं ज्यांचा संबंध आहे अशा मंडळींना मी एवढीच नम्र विनंति करीन कीं, या मीमांसेमध्यें जाण्यापेक्षा कोकण विकासाचा प्रश्न व्यवहार्यतेच्या भूमिकेवर निश्चितपणानें आणि वेगानें कसा सोडवितां येईल, याचा विचार करण्याची दृष्टि आपण आपल्यासमोर ठेवावी.

आजकाल हिंदुस्तानच्या विकास योजनांचा विचार करतांना, अनेक वेळां वास्तवता व विधायक वृत्ति या दोन भूमिकांचा विचार करण्याचा प्रसंग येतो. योजनांचा विचार करणा-या सर्वच मंडळींना सर्व ठिकाणीं, मला वाटतें, या दृष्टीनें विचार करावा लागत असेल. मी कांही या विषयांतला तज्ज्ञ नाहीं, म्हणून या गोष्टीसंबंधीं मी येथें कांहीं बोलूं इच्छीत नाहीं. परंतु आज या देशामध्यें योजनांचा विचार करणारी जी मंडळी आहेत, त्यांचा विचार अधिकाधिक वस्तुस्थितिनिष्ठ असा होऊं लागलेला आहे यांत शंका नाहीं.

पहिल्या आणि दुस-या पंचवार्षिक योजनांनीं आपली सफर जरी पुरी करीत आणली असली, तरी योजनेचा विचार आणि आचार ही गोष्ट आपल्या देशामध्यें नवीन अशीच आहे. तरी सुद्धां ही सफर करीत असतांना त्यांतल्या कांही ठाम गोष्टींचा विचार देशाकडून निश्चितपणें स्वीकारला जातो आहे. या बाबतींत येणारा अनुभव व त्यांतून निर्माण होणा-या कांहीं नवीन गोष्टी आपणांस स्वीकाराव्या लागत आहेत आणि शिकाव्याहि लागत आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org