सह्याद्रीचे वारे - ४१

शासनयंत्रणेबाबत जे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासंबंधीं येथें सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता नाहीं. गेल्या कांहीं दिवसांत मीं अनेकदां सांगितलें आहे कीं, उत्तम व चोख अशी शासनयंत्रणा निर्माण करणें हें महाराष्ट्र राज्यापुढील एक महत्त्वाचें उद्दिष्ट आहे. या बाबतींत पूर्वीच्या मुंबई राज्यांतील कांहीं उत्तम परंपरांचा वारसा आपणांकडे आला आहे. त्या परंपरा तशाच पुढें चालू ठेवण्याचा व शक्य झाल्यास त्यांत भर घालण्याचा आमचा निर्धार आहे. शासनयंत्रणेंतील कार्यक्षमता व सचोटी अबाधित राखून स्थानिक कर्तृत्वाला व उपक्रमशीलतेला जास्तीत जास्त उत्तेजन देण्याचा सरकारचा विचार आहे. ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांची वाढ करणें, सत्ता व अधिकार यांचें वाढत्या गतीनें विकेंद्रीकरण करणें या गोष्टींकडेहि सरकार सदैव लक्ष पुरवील. शासनाची कार्यक्षमता कायम ठेवून स्थानिक कर्तृत्व व उपक्रमशीलता यांस चालना देण्याच्या दृष्टीनें योजना तयार करण्याच्या कामींहि आपल्या या परिसंवादाची बरीच मदत होईल अशी मी अपेक्षा करतों.

यापुढें आपणांला जे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडवावयाचे आहेत त्यांच्याकडे पक्षीय किंवा वर्गीय दृष्टीनें पाहण्याचें आपण शक्य तों सोडून द्यावयास हवें. विकास, सामाजिक एकात्मता आणि सामाजिक न्याय हीं सर्व राजकीय पक्षांना मान्य अशींच उद्दिष्टें आहेत. मतभेद असलेच तर ते लहानसहान तपशिलाच्या बाबींसंबधीं असूं शकतील, किंवा हीं उद्दिष्टें साध्य करण्याकरितां किती वेगानें पावलें टाकावींत यासंबंधीं सुद्धां असूं शकतील. परंतु हे मतभेद कांहीं गंभीर स्वरूपाचे म्हणतां येणार नाहींत. म्हणून सर्व राजकीय पक्षांनीं व निरनिराळ्या मतप्रणालींच्या पुरस्कर्त्यांना राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कार्यात सहकार्य देण्याचें आपसांत मान्य करावयास पाहिजे. निदान ज्या गोष्टी वादग्रस्त नाहींत त्यांच्या बाबतींत तरी हें घडून यावयास पाहिजे.

या परिसंवादाचें उद्घाटन करण्याचे आपण मला निमंत्रण दिलें त्याबद्दल मी आपला आभारी आहें. आपल्या चर्चेमधून बरेंच उपयुक्त मार्गदर्शन मिळेल असा मला विश्वास आहे. आतांपर्यंत कांहींशी एकांडी, अलिप्त व आत्मसंतुष्ट वृत्ति असलेल्या बुद्धिजीवी वर्गाला राष्ट्रीय पुनर्रचनेच्या कामीं प्रवृत्त करण्याचें कार्य यासारख्या परिसंवादानें साधेल, अशी मला आशा आहे. अशा प्रकारें या वर्गाचें सहकार्य मिळाल्यास पुनर्रचनेच्या या कार्यास जोराची चालना मिळून त्याचा विकास होईल असा मी विश्वास प्रकट करतों व आपल्या परिसंवादास सुयश चिंतितों.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org