सह्याद्रीचे वारे - ३०

आज सकाळी मुंबईस धर्मगुरूंच्या प्रार्थनेचे आशीर्वाद घेऊन येथें येण्याकरितां मी निघालों तेव्हां शिवनेरींनें माझें मन भरून गेलें. महाराष्ट्राच्या तीन कोटि जनतेच्या मनांत आज शिवनेरी आहे. तिची आठवण झाली नाहीं असें जागतें मराठी मन आज महाराष्ट्रांत सांपडणार नाहीं. त्या सर्वांना या नव्या महाराष्ट्र राज्याचा गाडा चालवावयाचा आहे. या आनंदोत्सवांत आपण धुंद असतांना कोणाच्या मनांत काय तक्रारी आहेत त्या मला माहीत आहेत. मंजूर आहेत त्या तक्रारी, पण त्याच त्या कुरकुरी करीत राहून भागणार नाहीं. नव महाराष्ट्राच्या निर्मितीकरितां आपण आतां प्रतिज्ञाबद्ध आहोंत. या आनंदोत्सवाची स्मृति म्हणून या राज्याची जी मुद्रा आम्हीं निश्चित केली आहे, तिच्यावर

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते

हीं शिवाजी महाराजांनीं निवडलेलीं वाक्यें आम्हीं घेतलीं आहेत. याचा अर्थच हा कीं ही राजसत्ता लोककल्याणाकरतां राबणार आहे. आपणांला आतां सामान्य जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करावयाच्या आहेत. त्यांना शिक्षणाची भूक आहे. दोन वेळां त्यांना सुखानें, मानानें घास खावयाचे आहेत. आणि ही गरज पूर्ण करावयाची जिम्मेदारी आपण घेतली आहे. जनतेच्या या आशाआकांक्षांच्या पूर्तीचा क्षण आपणांला जवळ आणावयाचा आहे. हा प्रवास सोपा नाहीं. पण प्रवास चालू झाला आहे. दमल्यासारखें वाटलें आणि मैलाचा दगड पाहून उशी करून झोपलांत तर कायमचे झोपाल. तसें होतां कामा नये. या महाराष्ट्राला आतां महत्त्वाचीं कामें करावयाचीं आहेत.

महाराष्ट्रांत आज असलेल्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहांचा परिणाम महाराष्ट्राच्या भवितव्यावर होणार आहे. आज महाराष्ट्रांत अनेक पक्षोपपक्ष आहेत. ते पक्ष राहिले पाहिजेत. ते पक्ष राहूं नयेत असें मी म्हणणार नाहीं. लोकशाहीचें राजकारण चालविण्यासाठीं अनेक पक्ष असावे लागतात. पण फार पक्ष असणें हें देखील हितावह नाहीं. मी तर असें म्हणेन कीं, पुढचीं अनेक वर्षे, निदान तिसरी पंचवार्षिक योजना पूर्ण होईपर्यंत तरी, पक्षोपपक्षांच्या राजकारणाचा गोंधळ येथें माजूं नये. प्रत्येक पक्षास स्वतःचें असें खास राजकारण असतें. परंतु येत्या कांहीं वर्षात तीन कोटींच्या महाराष्ट्रापुढें फक्त एकच राजकारण आहे आणि तें म्हणजे सर्वांगीण विकास साधण्याचें राजकारण. महाराष्ट्रनिर्मितीसाठीं शिवशक्ति निर्माण झाली आहे तर ती कायम टिकविली पाहिजे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनींच पुढें सरसावलें पाहिजे. कोणीहि मागें राहतां उपयोगी नाहीं. विकासकार्याच्या मोहिमेवर निघालेले आपण सिंहगड चढून आलों आहोंत. या गडावरून पळून जाण्याचा कोणी प्रयत्न करीत असतील तर त्यांना सांगावेंसें वाटतें कीं, कोंडाण्यावर जसे सूर्याजीनें मागचे दोर कापले होते तसेच आता येथून पळून जाण्याचे दोर केव्हांच कापून, तोडून टाकण्यांत आले आहेत. आतां परिस्थितीचें आव्हान घेऊन पुढेच गेलें पाहिजे. लढूं किंवा मरूं या ईर्षेनेंच आतां आपल्याला पुढें जावयाचे आहे. तोच मार्ग आतां आपल्यापुढें शिल्लक उरला आहे. आतां आपल्याला परत फिरतां येणार नाहीं. आपल्या कर्तृत्वाला, आपल्या शहाणपणाला हें आव्हान आहे. तें आपण स्वीकारलेंच पहिजे. आजपर्यंत आपण अनेक सबबी सांगून वेळ मारून नेत होतों. पूर्वी आपण म्हणत असूं कीं, परकीय सत्ता आहे, हात बांधलेले आहेत. नंतर म्हणूं लागलों कीं, सर्व मराठी भाषिक एकत्र नाहींत, गुजरातशीं हात जखडलेले आहेत, त्यामुळें आमची कुचंबणा होते. आतां तेहि हात मोकळे झाले आहेत. आतां महाराष्ट्राच्या कल्याणाचा सिंहगड तुम्हांला स्वतःच्या कर्तृत्वावर जिंकावयाचा आहे. संकटें असतील पण त्यांना समोर जाऊन झेलल्याशिवाय तीं संपत नाहींत. त्यांना पाठ दाखविली कीं तीं अधिकच पाठीशीं लागतात. म्हणून या संकटांवर आपण आतां मात केली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org