सह्याद्रीचे वारे - २८

भाग्यवती शिवनेरी

लोकहो, आज मी माझें परमभाग्य समजतों कीं, महाराष्ट्राच्या परमेश्वराला प्रणाम करण्यासाठीं येथे येण्याची मला संधि मिळाली. आजच्या या सुवर्णदिनीं आपणां सर्वांच्या तर्फे नव्या महाराष्ट्र राज्यास श्रीशिवप्रभूंचे शुभाशीर्वाद मागण्यासाठीं मी येथें आलों आहे. ज्या या पवित्र क्षेत्रीं शिवप्रभु अवतरले तेथें येऊन महाराष्ट्राच्या या पुण्यश्लोक दैवताला मुजरा करणें हें माझें प्रथम कर्तव्य आहे. आजच सकाळी मुंबईस मी प्रमुख अशा निरनिराळ्या धर्मगुरूंचा आशीर्वाद घेऊन येथें आलों. मघां मी या गडावर बालशिवाजी आणि मातोश्री जिजाबाईंच्या प्रतिमेचें उद्घाटन केलें आणि आतां श्रीशिवछत्रपतींना मुजरा करून मी नव्या महाराष्ट्र राज्याची घोषण करीत आहें. हा अपूर्व सोहळा पाहण्यासाठीं तुम्ही निरनिराळ्या भागांतील माझे मराठी बांधव प्रचंड संख्येनें येथें एकत्र जमलां आहांत. या पवित्र आणि अपूर्व प्रसंगानें आज माझें मन अनेक विचारांनी आणि भावनांनीं भरून आले आहे.

युगायुगांतून येणारा आजचा हा दिवस आहे. तीनशे वर्षांपूर्वी तो एकदा आला, आणि या शिवनेरींत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. केवळ एका व्यक्तीचा, एका बालकाचा तो जन्म नव्हता, तर त्या बालकाच्या रूपानें महाराष्ट्राचा नवा इतिहास जन्माला येत होता. शिवजन्माने आमचा हा इतिहास त्या वेळीं या गडावर सुरू झाला. त्याच या पवित्र ठिकाणीं, विसाव्या शतकांतील नव्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासास सुरुवात व्हावी हा अपूर्व योगायोग आहे. शिवाजी महाराज एकदांच जन्मले, तसाच विसाव्या शतकांतील हा महाराष्ट्र आतां जन्मास येत आहे. प्रतिभावंत लेखक आणि कवि यांच्या लेखण्या ज्या क्षणाचें वर्णन करण्यास पुढें सरसावतात तो हा क्षण आहे. महाराष्ट्राच्या जीवनांतला हा मोलाचा क्षण आहे. आज आपलें अनेक वर्षांचे स्वप्न साकार झालें आहे. महाराष्ट्र राज्याच्या रूपानें आज एक नवें कर्तृत्व जन्माला येत आहे. मानव मनांत कांही आशा बाळगतो, स्वप्नें पाहतो, त्यासाठीं रात्रंदिवस धडपड करून असीम त्याग करतो, खडतर तपश्चर्या करीत असतो. परमेश्वर असा एक क्षण निर्माण करतो कीं, त्यामुळें मानवाची ती आशा सफल होते. तो तृप्त होतो. अशा तृप्तीचा क्षण आज छत्रपतींच्या पुण्याईनें आपल्या जीवनांत निर्माण झाला आहे. त्याचा आनंद आपण या क्षणीं उपभोगूं या, आणि या आनंदामागोमाग येणा-या जबाबदा-या पार पाडण्यासाठीं आपण सिद्ध होऊं या. एक किल्ला जिंकला, आतां दुसरा किल्ला जिंकण्यासाठी विकासाची घोडदौड सुरू करूं या. कारण या विकासांतूनच महाराष्ट्राचें भवितव्य आकारास येणार आहे.

भारताचें राज्य जें निर्माण झालें त्यामागें अनेकांच्या भावनांचा संगम झालेला आहे. स्वतंत्र्य भारताचें राज्य एक - दोन शतकांकरितां निर्माण झालेलें नाहीं. पूर्वीच्या काळीं राजे आले आणि गेले, पातशाह्या आल्या आणि गेल्या, परकीय सत्ता आली आणि गेली, पण भारताचें राज्य तसेंच जाण्यासाठीं जन्माला आलेलें नाहीं. आज भारतांत चाळीस कोटि लोकांचे जें राज्य निर्माण झालेलें आहे, ते भारतीयांच्या मनांत स्वातंत्र्याचा अभिमान जोंपर्यंत जागृत आहे तोंपर्यंत टिकणार आहे आणि म्हणून मी म्हणतों कीं हें स्वतंत्र भारताचें राज्य यावच्चंद्रदिवाकरौ टिकणारें आहे. जसा भारत एकदांच आणि कायमचा निर्माण झाला तसा महाराष्ट्रहि एकदांच निर्माण होत आहे. आजपासून पुढें अनंत काळापर्यंत भारताशीं समरस होऊन सांगणार आहे की, आमच्या मराठी जीवनांत जें जें कांहीं चांगलें आहे, मंगल आहे, तें तें भारताच्या सुखसमृद्धीसाठीं, संरक्षणासाठीं सेवेसाठीं आम्ही देणार आहोंत. जी अपूर्णता, जे दोष असतील ते आम्ही आमच्यापाशीं ठेवणार आहोंत. आम्ही प्रथम भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीय आहोंत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org