सह्याद्रीचे वारे - २६

नव्या महाराष्ट्र राज्यांत ही एकता आपण अधिक दृढ केली पाहिजे. आज आपण देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचीं मोठमोठीं कामें हातीं घेतलीं आहेत. महाराष्ट्रांत गेलीं चारपांच वर्षे राज्यपुनर्रचनेचा प्रश्न सतत तेवता राहिल्यानें जनतेचें मन विचलित राहिलें व त्यामुळें विकास कार्याकडे द्यावें तेवढें लक्ष तिनें दिलें नाहीं, ही वस्तुस्थिति आहे. परंतु या कार्याची आतां हेळसांड होऊं न देतां लोकांनी त्यावर आपलें जास्तींत जास्त लक्ष केंद्रित केलें पाहिजे. भाषिक राज्याची स्थापना हें साधन असून जनतेचा सर्वांगीण विकास हें साध्य आहे. या बाबतींत दुमत होण्याचें कारण नाहीं. एखाद्या प्रश्नासंबंधीं मतभेद असणें यांत वावगें कांहीं नाहीं, आणि मतभेद असेल म्हणचे चर्चा, वाद या गोष्टीहि आल्या. लोकांच्या जागरूकतेचें व कोणतीहि गोष्ट पारखून घेण्याच्या चोखंदळ वृत्तीचेंच तें द्योतक आहे असें मी समजतों. परंतु वादामधून तत्त्वबोध झाला पाहिजे. नाहींतर त्या वादाला कांहीं अर्थ उरणार नाहीं. मतभेद केवळ मतभेदांसाठींच असूं नयेत. तसे ते असले तर त्यांनी वैयक्तिक वा पक्षीय हेव्यादाव्यांचें स्वरूप येतें आणि त्यांने कार्यहानि होते. विकास कार्याच्या द्वारें लोककल्याण साधावयाचें या ध्येयासंबंधीं अर्थातच मतभेद असण्याचें कारण नाहीं. मार्गासंबंधीं मतभेद होऊं शकतील हें मी मान्य करतों. पण असे मतभेद लोकशाहीच्या मार्गानेंच सोडविले पाहिजेत. या दृष्टीनें विभाग, जिल्हा, तालुका व गांव या पातळीवर निरनिराळ्या संस्था स्थापन करण्यांत आल्या आहेत. जनतेच्या विकासाला प्राधान्य द्यावयाचें ही भूमिका एकदां मान्य झाल्यानंतर या मतभेदांतूनहि सहकार्याचें क्षेत्र वाढवितां येईल असा माझा विश्वास आहे.

ज्या नव्या महाराष्ट्र राज्याच्या स्वागताचा सोहळा आपण साजरा करीत आहोंत त्यासंबंधीं महाराष्ट्रांतील जनतेंत जास्तींत जास्त मतैक्य आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाहीं. कांहीं जण मात्र थोडासा विरोधी सूर काढीत आहेत. हा विरोधी सूर काढणा-या माझ्या मित्रांना माझी प्रेमाची विनंती आहे कीं, लोकशाहीचा कौल मान्य करून महाराष्ट्रांतील आम जनतेच्या हिताच्या दृष्टीनें त्यांनीं आपला विरोध आतां सोडून द्यावा व नवमहाराष्ट्राच्या उभारणीच्या कार्यात सहभागी व्हावें. तीन वर्षांपूर्वी सर्व मराठी प्रदेश एकत्र आल्यानंतर आपण परस्परांच्या कितीतरी जवळ आलों आहोंत. मुंबईचा माणूस आतां नागपूर-नांदेडचा विचार करूं लागला आहे, तर अमरावती-अकोल्याच्या माणसाला सांगली-कोल्हापूर हे आपल्यापैकींच आहेत असें वाटूं लागलें आहे. वाहतुकीचीं साधनें वेगाचीं झालीं कीं अंतर कमी होतें हें जसें सत्य आहे, त्याचप्रमाणें ममत्वाच्या भावनेनें अंतर कमी होतें हा अनुभव गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला अधिकाधिक येत आहे. बराच काळ दूर राहिल्यामुळें सुरुवातीला थोडेसे संशयाचें वातावरण, थोडीशी दूरपणाची भावना राहणें हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण समजूतदारपणानें व जाणीवपूर्वक हा संशयाचा आडपडदा दूर सारला पाहिजे. महाराष्ट्र आज एकसंध होत आहे त्याचें फार मोठें श्रेय विदर्भ व मराठवाड्यांतील नेते व विचारवंत यांनीं या दिशेनें केलेल्या प्रयत्नासं आहे यांत मुळीच शंका नाहीं. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एकीकरणाचें हें कार्य संपलें अशी चूक कोणीं करूं नये. एक महत्त्वाचा टप्पा आपण गांठला. पण आपल्याला अजूनहि पुढें वाटचाल करावयाची आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा यांना एकरूप करण्याची जबाबदारी केवळ शासनानेंच पार पाडावयाची आहे अशी अपेक्षा सर्वस्वी चुकीची ठरेल. साहित्य संस्था, शिक्षण संस्था, सांस्कृतिक व सामाजिक कार्य करणा-या संस्था यांनी शासनापेक्षांहि हें कार्य अधिक भरीवपणें करतां येईल असें माझें मत आहे. त्या दिशेनें होत असलेल्या प्रयत्नांची मला अर्थातच जाणीव आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org