सह्याद्रीचे वारे - २५

पण या विविधतेंतहि एकता आहे व असली पाहिजे. विविधतेनें जीवनाला जसें सौंदर्य येतें तसें एकतेंत जीवनाचें सामर्थ्य प्रतीत होतें. विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यांची भाषिक एकता तर आहेच, पण शिवाय लोकांच्या चालीरीती व परंपरा आणि सामाजिक संघटनेचें एकूण स्वरूप हेंहि कसें सारखें आहे याचीं वाटेल तेवढीं उदाहरणें देतां येतील. तसेंच महाराष्ट्राचा सांस्कृतिक व राजकीय इतिहासहि त्याची साक्ष देतो. प्राचीन काळीं विदर्भ व मराठवाडा हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानीं होते. शालिवाहन व चालुक्यांची राजधानी मराठवाड्यांतील पैठण येथें होती, तर वाकाटक या राजघराण्यानें महाराष्ट्राचा सर्व प्रदेश आपल्या छत्राखालीं आणला होता. वाकाटक हे विदर्भाचे राजे होते व त्यांची राजधानी चांद्याजवळ भांदक येथें होती. देवगिरीच्या यादवांच्या काळांत महाराष्ट्राची व मराठी भाषेची विशेष भरभराट झाली. मराठीचे आद्य व श्रेष्ठ कवि मुकुंदराज, ज्ञानेश्वर व नामदेव याच काळांत झाले. चक्रधर या महानुभावी पंथाच्या संस्थापकाचा एक शिष्य महींद्र व्यास यानें सुमारें ७०० वर्षांपूर्वीं लिहिलेल्या लीलाचरित्रांत महाराष्ट्राचें जें वर्णन केलें आहे त्याचा येथें उल्लेख करण्याचा मोह मला आवरतां येत नाहीं.

साठी लक्ष देश महाराष्ट्र । तेथिचे शिहाणे सुभटू ।
वेदशास्त्र चातुर्यांची पेठू । भरैली तिये देशीं ॥

ऐसे ते महाराष्ट्रराये सुंदरू । वरी महाराष्ट्रभाषाचतुरु ।
तेहीं वसविलें गंगावीरू । क्षेत्र त्र्यंबकूवेऱ्हीं ॥

पश्चिमे त्र्यंबकूपूर्व सागरवेऱ्हीं । द्वादश योजनें उभय गंगातीरीं ।
ऐसें तें गंगातट महाराष्ट्रीं । वसिजे पुण्यातन ॥

देश म्हणजे खंडमंडळ । जैसें फलेठाणापासौनि दक्षिणेसि
म-हाटी भाषा जेतुलां ठाइं वर्ते तें एक मण्डल ।।

तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवट असे । ऐसें एक खंडमंडळ ।
मग उभय गंगातीर तेहि एक खंडमंडळ । आन तयापासौनि
मेधकरघाट तें एक मंडळ ।।

तयापासौनि आवघे वराड तेंहि एक मंडळ ।
पर आघवीचि मिळौनि महाराष्ट्रचि बोलिजे ।।

यापुढच्या काळांत राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र जरी भंगला तरी संत कवींनीं महाराष्ट्राची सांस्कृतिक एकता सतत टिकवून ठेविली. संत कवींच्या कार्यांचें हें मर्म आपण ध्यानांत घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरापासून तों तुकारामापर्यंत सुमारें चारशें वर्षे संतांनीं वारकरी सांप्रदायाच्या द्वारें सामाजिक समतेच्या तत्त्वांचा प्रसार करून सर्व मराठी जनतेचें ऐक्य साधलें. संतांची ही शिकवण महाराष्ट्र कधीहि विसरणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org