सह्याद्रीचे वारे - २४

विविधतेंतील एकता

महाराष्ट्रांत आज सर्वत्र शिवजयंती उत्साहानें साजरी होत आहे. ज्याला आपण अर्वाचीन महाराष्ट्र म्हणतों त्याची उभारणी करण्याचें श्रेय शिवाजी महाराजांकडेच जातें. शिवाजी महाराजांचें मोठेपण हें त्यांचा अतुल पराक्रम, त्यांची राजकारणपटुता, त्यांचें विशुद्ध चारित्र्य या थोर गुणांत जेवढें आहे तेवढेंच किंबहुना त्याहूनहि अधिकांशानें शासनकार्यांतील त्यांची विधायक दृष्टि व कर्तव्यपरायणता यांत आहे असें मला वाटतें. महाराष्ट्राच्या स्वराज्याची ते उभारणी करूं शकले ती मुख्यतः या गुणांमुळेंच. शिवाजी महाराजांचे अमात्य रामचंद्र नीळकंठ यांनीं 'आज्ञापत्रांत' महाराजांचें जें बहारदार वर्णन केलें आहे तें या दृष्टीनें पाहण्यासारखें आहे. ''तस्करादि अन्यायी यांचें नांव राज्यांत नाहींसें केलें. देशदुर्गादि, सैन्यादि बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.'' या वर्णनावरून शिवाजी महाराजांच्या कार्यक्षम व लोकाभिमुख राज्यकारभाराची कल्पना येईल. शौर्य व धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टि या गुणांची जोड मिळाल्यानेंच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले.

यंदाच्या शिवजयंतीचें महत्त्व तर अधिकच आहे. कारण आजपासून आपण महाराष्ट्र राज्यस्थापनेचा उत्सव साजरा करीत आहोत. अशा रीतीनें पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांचे प्रथमच एक सबंध राज्य निर्माण होते आहे. हें सर्व कसे घडत गेलें याचा इतिहास आपल्यापुढें अगदीं ताजा आहे. किंबहुना या घटना अद्याप इतिहासजमा झालेल्या नाहींत असेंच म्हणणे अधिक रास्त ठरेल. तेव्हां त्यांचा मी येथें पुनरुच्चार करीत नाहीं. भारतांतील इतर राज्यांप्रमाणें आपलें पण भाषिक राज्य असावें अशी मराठी लोकांची इच्छा होती व लोकशाहीच्या तत्त्वानुसार भारतीय संसदेनें मराठी जनतेच्या या इच्छेस मान देऊन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेस अनुमति दिली आहे.

आणखी तीन दिवसांनी अस्तित्वांत येणारें आपलें हें महाराष्ट्र राज्य विविधतेनें नटलेलें आहे. ही विविधता निसर्गाच्या रचनेंत जशी आहे तशी माणसांत सुद्धा आहे. उत्तरेस सातपुडा आणि पश्चिमेस सह्याद्रि यांचीं उत्तुंग शिखरें व त्यांच्या उतरणीवरील घनदाट जंगलें यांनीं या भागांस भव्योदत्त सौंदर्य प्राप्त झालें आहे, तर वर्धा-वैनगंगेच्या खो-यात जागोजाग असलेली जलाशयें व पळसाच्या लाल फुलांनी डंवरलेलीं रानें मनाला प्रसन्नता आणतात. कोंकणचा किनारा अथांग पश्चिम सागराचें दर्शन घडवितो, तर गोदेच्या पाण्याने पुनीत व समृद्ध झालेली मराठवाड्याची भूमि महाराष्ट्राच्या तेजस्वी भूतकाळाची व संस्कृतीची आठवण करून देते. नागपूरच्या परिसरांत भारतांतच केवळ नव्हे तर सर्व आशियांत उत्तम म्हणून नांवाजलेली संत्री पिकतात, तर रत्नागिरीकडे भारतांत ज्याच्या तोडीचा दुसरा आंबा नाहीं तो हापूस आंबा अमाप पिकतो. विदर्भ-मराठवाड्याच्या काळ्याभोर जमिनींत कापूस भरघोस फुलतो, तर नगर-सोलापूर-कोल्हापूर भागांत पिकणारा रसदार ऊंस सर्वांचे तोंड गोड करतो. निरनिराळ्या भागांतील लोकांच्या बाबतींतहि ही विविधता आहे. कोंकणपट्टींतील माणसाचे अनुनासिक उच्चार ऐकून देशावरच्या माणसाला मौज वाटते, तर खानदेश-व-हाडचा माणूस एक विशिष्ट हेल काढून बोलूं लागला कीं सांगली कोल्हापूरकडील माणसांच्या चेह-यावर स्मिताची रेषा न झळकली तरच आश्चर्य. पण या विविधतेंतच महाराष्ट्रांतील जीवनाचें सौंदर्य सांठलेलें आहे. अशी विविधता नसेल तर जीवन नीरस व रंगहीन होईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org