सह्याद्रीचे वारे - १९

जेथें कार्यकर्त्यांचा संच आणि मेळावा आहे अशी ही भूमि आहे. त्याच या भूमींत शिकलों, झगडलों, चर्चा केल्या आणि वाद केले. त्यांतून एक प्रवृत्ति, एक पिंड तयार झाला. आणि अशा ज्या पिढीतून व ज्या कार्यकर्त्यांच्या संचांतून मी निर्माण झालों आहें त्यांचे हे ऋण आहे. म्हणून हें नवनीत तयार झालेंच असेल तर तें त्या दुधातूंन निर्माण झालेलें आहे. त्यांच्यामध्यें मला परत विलीन झालें पाहिजे; त्यांचें ऋण मला परत केलें पाहिजे. आणि म्हणून दक्षिण साता-यांतील आणि उत्तर साता-यांतील या सर्व कार्यकर्त्यांना मी नम्र अभिवादन करतों. मला आपण बोलावलेंत, आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानें अनेक सद्भावना व्यक्त केल्यात. त्या सद्भावना घेऊन मी येथून परत जाणार आहें.

पण तुम्हीं सांगितली ती गोष्ट खरी आहे. माझें काम अजून संपलेले नाहीं. कठीण काम अजून पुढेंच आहे. तें महाराष्ट्राच्या रचनेपासून सुरू होणार आहे. पहिली गोष्ट सोपी होती असें मला आतां वाटतें. नवीन जें काम सुरू होणार आहे त्यासाठी मीं सांगितले त्याप्रमाणें अनेक विचारी माणसें माझ्या नजरेसमोर आहेत. काँग्रेसच्या बाहेरहि जीं चांगलीं माणसें आहेत त्यांचेंहि सहकार्य मिळवावयाचें आहे. कारण लोकशाहीच्या कारभारामध्यें असें एक महत्वाचें सूत्र आहे कीं नुसतें न्यायानें वागून भागत नाहीं, तर न्याय होत आहे अशी भावना निर्माण करावी लागते. लोकांना वाटलें पाहिजे कीं सर्व न्यायानें चाललें आहे आणि तसें झालें तरच चालतो लोकशाहीचा कारभार. म्हणून विरोधी पक्षांतहि जीं चांगलीं कर्तृत्ववान, हुशार, बुद्धिवान माणसें आहेत, त्यांनाहि हें पटवून देऊन पुढें चालावयाचें आहे. हें कठीण काम आतां सुरू होणार आहे. अर्थात् तें पार पाडण्याची जिम्मेदारी कांही माझी एकट्याची आहे असें मी मानीत नाहीं. परंतु निदान सल्लामसलत देण्याचें काम तरी मला करावे लागणार आहे.

मी आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो की गेल्या मार्च महिन्यामध्यें, मनाच्या एका मोठ्या कठीण परिस्थितींत मी होतो. मी माझें ऑपरेशन करून घेणार होतों. राजकीय दृष्ट्याहि जाणूनबुजून, पण विचारपूर्वक मी अशा परिस्थितींत शिरलों होतों की, तो माझा मलाच चक्रव्यूह वाटावयाला लागला होता. अशा त्या वेळी माझ्या मनांत विचार आला की माझ्यासाठी प्रार्थनेची जरुरी आहे. म्हणून मीं ठरवलें कीं माझ्या आईजवळ एक-दोन दिवस काढावेत. निवांत, मुंबईच्या दुनियेपासून अगदीं दूर. वर्तमानपत्रें, चर्चा, वाटाघाटी, राजकारण या सगळ्या दंगलीपासून अगदी दूर. पण तें मी शेवटीं करूं शकलो नाहीं. मित्र, स्नेही, इष्टमित्र यांनी गर्दी केली. आणि त्याला समारंभाचें रूप आलें. त्यावेळी झट्दिशीं माझ्या तोंडांतून ही वाक्यें बाहेर पडलीं, ''मी चक्रव्यूहांत आहें असें मला वाटतें. चक्रव्यूहांत शिरण्याची अक्कल शिकलों आहे. पण बाहेर कसें पडावयाचे तें त्या आईलाच माहीत आहे, म्हणून मी आईकडे आलों आहें.'' आज कुणाचाहि भेद न करतां तो चक्रव्यूह संपलेला आहे असें दिसतें.

मी आज याच पार्श्वभूमीवर या नव्या राज्याची भूमिका आपणांला सांगतो. नवीन राज्य आलेलें आहे, असें म्हणायला आतां हरकत नाहीं. आपण भाषेसंबंधी नाहीं ना कांहीं तक्रार करणार ? कारण अजून ते कायद्यांने यावयाचें आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांच्या वेळी कांहीं मर्यादा आम्ही आमच्या मनाशीं ठरवून ठेवल्या होत्या. मला असें वाटतें कीं ज्याला निव्वळ तत्त्वचिंतन करावयाचें असेल त्यानें  दैनंदिन राजकारणाच्या फंदांत पडूं नये.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org